दिव्यादिव्यांची ज्योत सांगते...
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगीया पाहे दिवाळी।
निरंतर॥
या शब्दांत ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीत ओव्यांद्वारे दिवाळीचे महत्त्व विशद केले आहे, तर संत जनाबाईंनी ‘आनंदाची दिवाळी, घरी बोलवा वनमाळी, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद’ अशा शब्दांत दिवाळीच्या दिवशी श्रीकृष्णाला, म्हणजे वनमाळीला घरी बोलावण्याचे आवाहन केले आहे. तुकोबांनी तर ‘साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ असे म्हटले आहे. शरद ऋतूत शेतीची कामे संपलेली असतात. घरे धन-धान्याने भरल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण ओसंडते. पाऊस पडून गेल्यामुळे निसर्गाने हिरवाईची शाल पांघरलेली असते. अशा प्रफुल्लित वातावरणात येणारा दिवाळी सण तितक्याच उत्साह आणि समृद्धीने भरलेला असतो. कवी केशवसुतांनी तर ‘दिवाळी शरद ऋतूची राणी’ असे म्हटले आहे. ‘वाहतो ही दूर्वांची जुडी’ या संगीत नाटकातील माणिक वर्मा यांच्या गीतातील ‘घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण’ या ओळीही या निमित्ताने आठवतील. सासरी गेलेल्या लेकीला दिवाळीच्या निमित्ताने मातेची होणारी आठवण वर्णन करणार्या त्या आहेत.
आजही हे गीत ऐकून संवेदनशील मनाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हा सोने-चांदी तसेच अन्य मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. 2023 मधील धनत्रयोदशीच्या दिवशी एक तोळा सोन्याचा दर 61 हजार रुपये होता. यंदा हाच दर 81 हजारांच्या पार गेला. याच काळात चांदीच्या दरातही 35 टक्क्यांची वाढ झाली. दर भडकलेले असूनही ग्राहक खरेदीसाठी सराफ बाजारात येत असले, तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत मागणीत दहा टक्क्यांची घट झाली. धनत्रयोदशीला विक्रमी विक्री झाली, ती वाहनांची. एप्रिल ते सप्टेंबर 2024 या सहा महिन्यांत रिझर्व्ह बँकेने तिच्या देशांतर्गत सोन्याच्या साठ्यात 102 टनांची भर घातली. बँकेच्या तिजोरीत असलेल्या सोन्याचे एकूण प्रमाण आता 510 टनांवर पोहोचले. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने भांडवली बाजारातील मुहूर्ताचे सौदे पार पडतील. आर्थिक सुबत्तेचे प्रतीक असलेल्या बाजारात मुहूर्ताला समभागांच्या विशेष खरेदीला महत्त्व असते. देशातील आघाडीचा कमोडिटी बाजार असलेल्या ‘एमसीएक्स’वरही सोने-चांदी, पोलाद, खनिज तेल, पॉलिमर आदी जिनसांच्या करारांचे मुहूर्ताचे सौदे आजच होणार आहेत. शनिवारी बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाचे खास महत्त्व.
पाडव्याला घरोघरी गृहोपयोगी आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाते. विक्रम संवत्सर सुरू होणार्या या दिवशी दानशूर अशी कीर्ती असलेल्या बळीराजाची पूजा केली जाते. शिवाय व्यापारी वर्षास आरंभ होत असल्यामुळे वहीपूजन किंवा दुकानांची, कारखान्याची पूजा करून नवीन वर्षाचे मांगल्यमय वातावरणात स्वागत केले जाते. घरोघरी पत्नी आपल्या पतीस ओवाळते. त्यामुळे उभयतांचे आयुष्य वाढते, असे मानले जाते. पाडव्याला पतीने पत्नीला सोने-नाणे, साडी किंवा एखादी छोटी-मोठी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आर्थिक हिशेबाच्या द़ृष्टीने व्यापारी पाडवा हा नववर्षाचा आरंभ मानतात. संपत्तीच्या प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून वर्षाची सुरुवात करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या, खतावणीच्या नवीन वह्या या दिवशीच सुरू होतात. त्यापूर्वी हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते. घरातील कचरा काढून, ‘ईडा पीडा टळू दे’ म्हणून तो कचरा फेकून दिला जातो. दीप, वस्त्रे यांचे दान केले जाते. या दानामागे दडलेला सेवाभाव आणि दीनदुबळ्यांना मदतीचा हात देण्याचा, त्यांना बरोबरीने येण्याच्या आवाहनाचा अर्थ दडला आहे. भगवान विष्णूंची एक पौराणिक कथा आहे. विष्णूंनी वामन अवतारात बळीला पाताळात ढकलून दिले; पण बळीच्या आजोबांच्या इच्छेनुसार, बळी हा पाताळातील राजा असेल आणि लोक त्याची पूजा करतील, असे वरदान त्याला दिले म्हणून बलिप्रतिपदा साजरी केली जाते. पाडव्याच्या कथेमध्ये लक्ष्मीदेवतेने भगवान विष्णूंच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी केलेली पूजा आणि विष्णूंनी आदर व्यक्त करत केलेली तिची स्तुती हे खरे सूत्र आहे. बळीला दिलेला सन्मान आणि स्त्री-पुरुषांचा एकमेकांबद्दलचा आदर हे यातील मर्म आहे.
आजच्या काळात स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व म्हणून मानले जात असले, तरी वास्तवात तसे घडताना दिसत नाही. स्त्रियांना आजही असंख्य घरांमधून दुय्यम वागणूक दिली जाते. त्यात भर म्हणून की काय, अत्याचाराचेही राजकारण केले जाते. एकूच समाजाच्या विविध घटकांमधील गैरसमज, असूया, विद्वेष, किल्मिषे ही निघून जायला हवीत आणि समाजात निरोगी वातावरण निर्माण व्हावे, अशी अपेक्षा पाडव्याच्या दिवशी व्यक्त केली पाहिजे. समाजात अनेक चांगल्याही गोष्टी घडत असतात, त्याकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय कंपन्यांनी 1 लाख 85 हजार कोटी रुपयांची विक्रमी निधी उभारणी केली. या आठवड्यात सोमवारी सेन्सेक्स 600 अंशांनी वधारला. काही नव्या कंपन्या पुढील काही दिवसांत भांडवल उभारणी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गुजरातमधील टाटा एअरबसच्या कारखान्यात सी-295 या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. एखाद्या खासगी कंपनीत तयार होणारे सी-295 हे देशातील पहिले विमान असेल. 70 वर्षांवरील ज्येष्ठांना आता केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत’ योजना लागू केल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. प्रत्येक भारतीयाने आनंदून जावे, अशा कितीतरी गोष्टी भवतालात घडत आहेत. विकासाच्या यात्रेतील हे प्रत्येक दीप आपल्याला प्रेरणा देत असतात, परस्परांवर प्रेम करायला शिकवतात. दिवाळीचा हा आनंद दशदिशांत पसरूदे, मनामनांत बंधुभावाचे, प्रेमाचे, मानवतेचे आणि विवेकाचे सहस्र दीप उजळूदेत. हे अखंड जीवन निरामय होऊदे, मानवी जीवनाचा अनंताकडून अनंताकडे सुरू असलेला प्रवास मंगलदायी होऊदे.