वामनराव : काय चिंतामणराव, झाली का सगळी दिवाळीची खरेदी? फराळ, सजावट, कपडेलत्ते...?
चिंतामणराव : अहो, बाजार आणेपर्यंत जीव मेटाकुटीला आला. सण म्हटला की खर्च आलाच. महागाईने लक्ष्मीपूजनाआधीच खिशाचे दिवाळे काढलेय. फक्त फटाके आणायचे राहिलेत.
वामनराव : मग राहू द्या की! एखादं वर्ष फटाके नाही आणले तर दिवाळीचा सूर्य पश्चिमेला उगवणार आहे का? तेवढीच प्रदूषणमुक्त दिवाळी.
चिंतामणराव : अहो, आमचंही तेच ठरलं होतं. पण मुलांच्या हट्टापुढे पालकशाही चालत नाही. त्यामुळे गुपचूप फटाके आणणार. मधल्या खोलीत लपवून ठेवणार. बाहेर मात्र पर्यावरणपूरक दिवाळीचा प्रचार!
वामनराव : म्हणजे घरात फटाक्यांचा साठा आणि बाहेर पर्यावरणाचा पाढा. ही दुटप्पी दिवाळी! हल्ली फटाक्यांवर अभिनेते, समाजसेवक सगळे बोलताहेत. पण हे फटाके येतात कुठून, माहीत आहे?
चिंतामणराव : बहुतेक चीनमधून!
वामनराव : सजावट, पणत्या, खेळणी, आकाशकंदील आणि फटाके तिकडून येते...
चिंतामणराव : तारनळे, फुलबाजे, ॲटमबॉम्ब, लक्ष्मी तोटे, भुईचक्र... मुलांना तर प्रत्येक प्रकारात आनंदाचा स्फोट दिसतो.
वामनराव : आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे पहिला फटाका वाजवणारा मुलगा स्वतःला गल्लीचा राष्ट्रपुरुष समजतो.
चिंतामणराव : (हसत) खरंय हो!
वामनराव : पण चिंतामणराव, फटाके गुपचूप आणून बाहेर सांगणार फटाकेमुक्त दिवाळी? म्हणजे तुमच्या घरात दिवाळी दोनदा साजरी होणार... एकदा मुलांसाठी फटाक्यांनी आणि दुसऱ्यांदा शेजाऱ्यांसाठी पर्यावरणाच्या भाषणांनी!
चिंतामणराव : (ओशाळून) आता तुम्हीच सांगा, काय करायचं?
वामनराव : फटाके वाजवायचे तर वाजवा; पण पर्यावरणाच्या नावाने फुसका बार उडवू नका! हल्ली प्रदूषणासोबत बेगडी पर्यावरण प्रेमाच्या ढोंगीपणाचा धूर जास्त पसरतोय. फटाक्यांमुळे प्रदूषण होते; पण फटाके घरात लपवून बाहेर पर्यावरणाचे प्रवचन देणाऱ्यांमुळे ढोंगाचं प्रदूषण होतं! आणि त्यावर अजून प्रदूषण नियंत्रण मंडळालाही उपाय सापडलेला नाही!
चिंतामणराव : (ओशाळून) वामनराव, डोळ्यांत अंजन घातलंत! यंदा प्रदूषणाबरोबर ढोंगाचाही धूर निघणार नाही.
वामनराव : ही खरी दिवाळी! मनातला खोटेपणा जाळला की माणूस स्वच्छ होतो!