युवराज इंगवले
भारतीय प्रशासन सेवेतील नोकरी प्रतिष्ठेची मानली जाते. ती मिळवण्यासाठी अनेक ध्येयवादी विद्यार्थी अजोड मेहनत घेतात. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे उच्चपदस्थ अधिकारी पद मिळाल्यानंतर जीवनशैली तर बदलतेच त्याचसोबत विचारांची दिशाही बदलते. पण, हे पद मिळनूही केवळ स्वाभिमानासाठी एखादा अधिकारी राजीनामा देत असेल तर..! असाच प्रकार उत्तर प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी १३ वर्षांच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. २०१३ बॅचच्या अधिकारी असलेल्या मित्तल यांनी उत्तर प्रदेशातील तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. एका कार्यक्रमाला स्थानिक आमदाराला बोलविले नाही आणि त्यातून त्यांची बदली झाली. त्यामुळे मित्तल यांचा स्वाभिमान दुखवल्याने राजीनामा दिल्याची चर्चा असली तरी त्यांनी त्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मित्तल यांचा राजीनामा अद्याप उत्तर प्रदेश सरकारकडे औपचारिकरीत्या प्राप्त झाला नसल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
मूळच्या हरियाणातील रेवाडी येथील असलेल्या मित्तल यांनी आयआयटी दिल्ली येथून बीटेकचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आयआयएम बंगळूर येथून एमबीएची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये नोकरी केली. तेथे व्यावसायिकदृष्ट्या चांगले यश मिळूनही त्यांच्या मनात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना होती. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि नागरी सेवा परीक्षेची (यूपीएसी) तयारी सुरू केली. २०१२ मध्ये त्यांनी यूपीएसी परीक्षा पहिल्यांदा दिली. या प्रयत्नात त्यांची भारतीय पोलिस सेवेसाठी (आयपीएस) निवड झाली. मात्र, त्यांना आयएएस व्हायचे असल्याने पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
२०१३ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली आणि ६८वा क्रमांक मिळवत आयएएसला गवसणी घातली. आयएएस अधिकारी म्हणून मित्तल यांनी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर, मिर्झापूर आणि देवरिया या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. मिर्झापूरच्या जिल्हाधिकारीपदाच्या काळात त्यांच्या कामाची विशेष चर्चा झाली. हिलियातील दुर्गम भागातील लहुरियादह गावात स्वातंत्र्यानंतर सुमारे ७५ वर्षांनी प्रथमच नळाद्वारे पाणी पोहोचवले. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण म्हणून त्यांच्या कामाकडे पाहिले गेले. देवरिया येथे कार्यरत असताना त्यांनी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. त्यानंतर निर्णायक प्रशासकीय कारवाई करण्यासाठीही त्या ओळखल्या गेल्या.
राजीनाम्याच्या घोषणेत मित्तल यांनी त्यांच्या विविध प्रशासकीय अनुभवांबद्दल भावनिक भाष्य केले. त्या म्हणतात की, देवरियाने मला शिकवले की योग्य गोष्टीच्या बाजूने उभे राहणे हा पर्याय नसून कर्तव्य आहे. मिर्झापूरने मला शिकवले की अशक्य ही वस्तुस्थिती नसून केवळ एक मत आहे. सरकारी कामाच्या काळात गरजू कुटुंबे, दिव्यांग आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रशासनाच्या कामामागील मानवी बाजू जाणवली. शिक्षण, आत्मविश्वास आणि जगाच्या कोणत्याही भागात ताठ मानेने उभे राहण्याची क्षमताही देशाने दिली असल्याचे सांगत, देशाचे ऋण फेडण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले.