विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्यामुळे जगाची वाटचाल ही नव्या युगाच्या दिशेने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण, प्रगत तंत्रज्ञानाचे फायदे जितके आहेत तितके तोटेही आहेत. सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानले जाते. यामध्ये सर्वाधिक आघाडी घेतली आहे ती चीनने! कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जगाचे स्वास्थ्य बिघडवण्यात चीन काहीच कसर सोडत नसल्याचे दिसत आहे. अनेक चिनी अॅप जगभरात उपलब्ध आहेत. त्यातही ती मोफत उपलब्ध होत असल्याचे त्याकडे सर्वांचा ओढा वाढणे हे साहजिक असले तरी त्याचे धोके जाणून घेण्याची गरज आहे.
आता चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चॅटबॉट डीपसीकने जगभरातील एआय मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. हे अॅप मोफत आणि सहज संगणक आणि मोबाईलवर अपलोड होत असल्याने अन्य एआय कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेसारख्या बड्या राष्ट्रांनेही या डीपसीकचा धसका घेतल्याचे समोर आले आहे. अशातच अमेरिकन संसद आणि काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे. डीपसीकचे धोके लक्षात घेऊन यावर इटली आणि आयर्लंड या देशांनीही बंदी घातली आहे.
भारतातही केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या कर्मचार्यांना चॅटजीपीटी आणि डीपसीकसारखे एआय मॉडेल वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कर्मचारी आता मंत्रालयाने दिलेले संगणक, लॅपटॉप आणि टॅब्लेटसारखे डिवाईस वापरू शकणार नाहीत. आता अमेरिकेत एआयच्या जलद विकास हा राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासकीय आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी संसदेने जारी केलेल्या सर्व उपकरणांमध्ये डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे. इतकेच नाही तर कर्मचार्यांना अधिकृत फोन, संगणक आणि टॅब्लेटवर डीपसीक अपलोड करण्यावर अमेरिकेने बंदी घातली आहे. डीपसीक एक एआय चॅटबॉट आहे. केवळ त्याला आज्ञा दिल्यानंतर त्याचे निकाल समोर येतात. चॅटजीपीटी, मेटा आणि अन्य एआय मॉडेल करू शकणारी सर्व कामे डीपसीक करू शकते. तेही कोणतेही शुल्क न आकारता हे विशेष! डीपसीक हे एआय कोडिंग आणि गणितासारखी गुंतागुंतीची सर्व कामेही अचूकपणे पूर्ण करते. डीपसीक हे जगभरातील कोणासाठीही अगदी सहज, पूर्णपणे मोफत आणि मुक्तपणे मिळते.
चीनचे हे मॉडेल अगदी कमी खर्चात तयार केले आहे. खरेतर एनव्हीडिया, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यासारख्या अमेरिकन बड्या कंपन्यांनी एआय मॉडेल्स तयार करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी डीपसीकचा धसका घेतला आहे. डीपसीक हे एआय मॉडेल चीनने केवळ 48.45 कोटी रुपयांमध्ये विकसित केले आहे. हे अॅप डीपसीकचे अॅप संकेतस्थळ आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरून सहजपणे डाऊनलोड केले जाऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात येत्या काही दिवसांत डीपसीकवर जगभरात बंदी घातली नाही तर नवल वाटू नये!