Major Mohit Sharma | धुरंधर : मेजर मोहित शर्मा Pudhari Photo
संपादकीय

Major Mohit Sharma | धुरंधर : मेजर मोहित शर्मा

पुढारी वृत्तसेवा

अक्षय निर्मळे

सध्या धुरंधर चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. चित्रपटातील रणवीर सिंगची भूमिका ज्या भारतीय गुप्तहेरावर बेतलेली आहे, असे सांगितले जाते ते म्हणजे शहीद मेजर मोहित शर्मा. त्यांची खरी कहाणी या सिनेमापेक्षाही अधिक थरारक, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारी आहे. सिनेमॅटिक लिबर्टीत अशा जीवनकथांचे रूपांतर केवळ मनोरंजनात होणे धोकादायक ठरते. 2009 मध्ये शहिद झालेले मेजर मोहित शर्मा पुन्हा चर्चेत आले आहेत कारण, त्यांची कहाणी केवळ पराक्रमाची नसून ती मूल्ये, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठतेची साक्ष देणारी आहे.

हरियाणातील रोहतक येथे मध्यमवर्गीय कुटुंबात 1978 मध्ये मोहित यांचा जन्म झाला. गाझियाबाद येथे प्राथमिक शिक्षण, नंतर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) दाखल झाले. 1999 मध्ये पाच मद्रास रेजिमेंटमध्ये आणि काही काळ काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा केली. तेथील कामगिरीसाठी त्यांना सेना मेडल आणि लष्करप्रमुखांचे प्रशस्तीपत्र मिळाले.

त्यानंतर वन पॅरा (स्पेशल फोर्सेस) या अत्यंत खडतर प्रशिक्षणातून आलेल्या कमांडो विभागात ते सक्रिय झाले. हा विभाग सर्वात धोकादायक, गुप्त आणि कठीण मोहिमांसाठी कार्यरत असतो. या पथकात त्यांचे टोपण नाव ‘धुरंधर’ होते, असे सांगितले जाते. शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या ‘इंडियाज मोस्ट फियरलेस 2’ या पुस्तकात मेजर मोहित शर्मा यांनी वेषांतर करून शत्रू गोटात जाऊन पार पाडलेल्या थरारक मोहिमेचा किस्सा सविस्तर सांगितला आहे. 2004 मध्ये वाढलेली दाढी, खांद्यापर्यंत रुळणारे केस, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, काश्मिरी युवकासारखे वेशांतर करून मोहित यांनी इफ्तिकार भट्ट अशी नवी ओळख घेतली.

भारतीय सैन्याने भावाला मारले आणि त्याचा सूड घेणार असल्याचे सांगत पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये ते भरती झाले. काश्मीर खोर्‍यातील कुप्रसिद्ध अबू तोरारा आणि अबू सबजार या हिजबुलच्या कमांडरचा विश्वास संपादन केला. त्यांनी भारतीय सैनिकांवर शोपियाँत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला. त्यासाठी मोहित यांना दोन आठवडे ट्रेनिंग दिले; पण मिशनच्या आदल्याच रात्री मोहित यांनी तोरारा आणि सबजार या दोघांना गोळ्या घातल्या. ते पुन्हा मेजर मोहित शर्मा म्हणून भारतीय सैन्यात परतले.

2009 मध्ये कुपवाडात घनदाट जंगलातून घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांशी मोहित यांच्या पथकाची चकमक झाली. छातीत गोळी लागलेल्या अवस्थेतही त्यांनी सहकार्‍यांची सुरक्षितता सुनिश्चित केली. शेवटपर्यंत कमांड सांभाळली आणि चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांना मरणोत्तर सर्वोच्च शांतता शौर्य पुरस्कार अशोकचक्र प्रदान करण्यात आले. त्यांची पत्नी ऋषिमा सारिन यादेखील लेफ्टनंट कर्नल असून त्यांना दोन मुले आहेत. चित्रपटातून प्रेरणा मिळू शकते; पण वास्तवातील शौर्य समजून घेणे अधिक गरजेचे आहे. मोहित शर्मा अशा व्यक्तींच्या कथा केवळ पडद्यापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्या समाजाच्या सामूहिक जाणिवेत खोलवर रुजायला हव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT