सिनेमातला ‘यमला जट’! (Pudhari Photo)
संपादकीय

Dharmendra Biography | सिनेमातला ‘यमला जट’!

धर्मेंद्र आपली मुळे कधी विसरला नाही. तरीही तो सतत काळाबरोबर राहिला. त्याला अनेक शेर पाठ होते. अत्यंत खुल्या व मोकळ्या मनाने, दिलदारपणे कसे वागावे आणि जगावे, हे धर्मेंद्रकडे पाहून समजते.

पुढारी वृत्तसेवा

धर्मेंद्र आपली मुळे कधी विसरला नाही. तरीही तो सतत काळाबरोबर राहिला. त्याला अनेक शेर पाठ होते. अत्यंत खुल्या व मोकळ्या मनाने, दिलदारपणे कसे वागावे आणि जगावे, हे धर्मेंद्रकडे पाहून समजते.

बाबूमोशाय

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय चित्रपटसृष्टीवर पहिली काही वर्षे दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 1960 चे दशक शम्मी कपूरने, सत्तरच्या दशकाच्या आगेमागे सुपस्टार राजेश खन्ना आणि त्यानंतर अमिताभ बच्चनने लाखो तरुण-तरुणींची मने जिंकली. परंतु मुख्यतः दिलीपकुमारच्या प्रेमात असलेल्या धर्मेंद्रने 1960 साली हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून, किमान 35 वर्षे नायक म्हणून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आणि त्यानंतरही चरित्र अभिनेता म्हणून तो टिकून राहिला.

देखणेपणाच्या बाबतीत देव आनंदनंतर धर्मेंद्रचाच क्रमांक लागतो. 1950-60च्या दशकांत स्टंटपट किंवा सी ग्रेड चित्रपट मोठ्या संख्येत बनत आणि त्यामध्ये दारासिंग, रंधवा यासारखे पैलवान नट काम करत. परंतु मुख्य धारेतील चित्रपटसृष्टीत धर्मेंद्रसारखी शरीरसंपदा असलेला नट झाला नाही. पंजाबमधील गावखेड्यात वाढलेल्या धर्मेंद्रच्या व्यक्तिमत्त्वात एक गावरान रगेलपणा होता. पंजाबी जाट कुटुंबात जन्म असल्यामुळे धर्मेंद्र परंपरावादी होता. दिलीपकुमारचे चित्रपट बघून तो अत्यंत प्रभावित झाला. फिल्मफेअरच्या एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईत आला. त्यात निवड झाल्यानंतरही त्याला सुरुवातीला काम मिळाले नाही. त्यामुळे तो पंजाबला परतला.

निर्माता सुबोध मुखर्जी यांनी त्याला पुन्हा मुंबईला बोलावून घेतले. मात्र त्यांच्या ‘लव्ह इन सिमला’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आर. के. नय्यर यांनी आम्हाला नायक हवा आहे, फुटबॉलपटू नव्हे, असे म्हणून त्याला परत पाठवले. त्यानंतर स्टुडिओच्या चकरा मारण्यात काही काळ गेल्यावर धर्मेंद्रला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा चित्रपट मिळाला. सुरुवातीच्या काही चित्रपटांत त्याने दुय्यम वा नकारात्मक भूमिकादेखील केल्या. शम्मी कपूरच्या ‘बॉयफ्रेंड’ या चित्रपटातला पोरगेलासा धर्मेंद्र ओळखूदेखील येत नाही. ‘आयी मिलन की बेला’ या चित्रपटाचा नायक राजेंद्रकुमार होता आणि धर्मेंद्र त्यात खलनायक होता. ‘फूल और पत्थर’ या चित्रपटातील शाका या गुंडाच्या भूमिकेत धर्मेंद्रने प्रथमच आपली ओळख निर्माण केली.

‘आयी मिलन की बेला’, ‘आये दिन बहार के’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘शिकार’ आणि ‘समाधी’ या चित्रपटांमध्ये धर्मेंद्रची आशा पारेखबरोबर जोडी जमली. ‘लोफर’, ‘दो चोर’, ‘राजा जानी’, ‘कहानी किस्मत की’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने शहरी, चलाख नायकाच्या भूमिका केल्या. ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटात धर्मेंद्र हा अशिक्षित ट्रक ड्रायव्हर असतो आणि परिस्थितीमुळे त्याला इन्स्पेक्टरच्या भूमिकेत जावे लागते. या सिनेमात धर्मेंद्रने हास्य अभिनयाची आपली अनोखी अदा पेश करून तुफान लोकप्रियता संपादन केली. त्यातील ‘मैं जट यमला पगला दीवाना’ या गाण्यातील धर्मेंद्रचा डान्स इतका लोकप्रिय झाला होता की, एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये हेमा मालिनीनेही त्याची नक्कल करून दाखवली होती.

‘तुम हसीं मैं जवाँ’ या चित्रपटापासून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी जवळपास तीसेक चित्रपटांतून नायक-नायिका म्हणून काम केले. राज कपूर - नर्गिस या जोडीप्रमाणेच प्रेक्षकांची पडद्यावरील ही मनपसंत जोडी होती. धर्मेंद्रने हेमाबरोबर विवाह केला आणि तो कधी लपवूनही ठेवला नाही. हे दोघे पुढे राजकारणातही आले. ‘हकीकत’ हा युद्धपट किंवा ‘धरमवीर’, ‘रझिया सुलतान’, ‘सल्तनत’ यांसारख्या पोशाखीपटांत आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे धर्मेंद्र शोभून दिसला.

धर्मेंद्रला अभिनेता म्हणून खरे व्यक्तिमत्त्व बहाल करून दिले, ते बिमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जी यांनी. ‘बंदिनी’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘गुड्डी’, ‘चैताली’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटांमधील धर्मेंद्रचा अभिनय अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त आहे. या चित्रपटांतील धर्मेंद्रच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आणि ठसठशीत आहेत. अभिनय कशाशी खातात, याची कल्पनाही नसलेला धर्मेंद्र बिमलदा आणि हृषीदांच्या चित्रपटांत मनाला अधिक स्पर्श करून जातो. ‘गुड्डी’मध्ये धर्मेंद्रने धर्मेंद्रचीच भूमिका केली होती आणि त्यात आजकाल राजेश खन्नाचा जमाना सुरू झाला आहे, असा संवादही त्याच्या तोंडी आहे!

‘शोले’, ‘राम बलराम’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभने कमालीचा आणि धमालीचा अभिनय केला आहे. ‘शोले’साठी अमिताभचे नाव धर्मेंद्रनेच सुचवले होते. राजेंद्रसिंग बेदी यांच्या ‘फागुन’ या चित्रपटात वहिदा रेहमानसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसह काम करताना धर्मेंद्र कुठेही कमी पडला नाही.

मल्टिस्टारर चित्रपटांचा जमाना सुरू झाल्यावर धर्मेंद्रने अशा चित्रपटांतही स्वतःची एक जागा निर्माण केली. लेखक, सैनिक, पोलिस ऑफिसर, शेतकरी, इंजिनिअर, कैदी अशा कोणत्याही भूमिकेत धर्मेंद्र शोभून दिसायचा. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसूनही त्याने आपण एक बर्‍या दर्जाचा अभिनेता आहोत, हे सिद्ध करून दाखवले. राजेंद्रकुमार, मनोजकुमार, विश्वजित, जॉय मुखर्जी यांसारखे अनेक नट फार वर्षे टिकले नाहीत. परंतु धर्मेंद्र कैक वर्षे नायक म्हणून आणि नंतर चरित्र अभिनेता म्हणून टिकून राहिला.

धर्मेंद्रने आपल्या मुलांसाठी का होईना, पण चित्रपटनिर्मिती सुरू केली आणि सनी देओल वा बॉबी देओल हे नायक म्हणून पुढे प्रस्थापित झाले. ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘जॉनी गद्दार’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हे गेल्या काही वर्षांतील धर्मेंद्रचे गाजलेले चित्रपट. ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटाचे तीन भाग त्याने सादर केले.

भरपूर पैसा कमावल्यानंतरही धर्मेंद्रने स्वतःचे साधेपण टिकवून ठेवले. मुंबईतदेखील आपल्या भावांच्या कुटुंबांसमवेत एकत्र कुटुंबात तो राहात असे. धर्मेंद्र आपली मुळे कधी विसरला नाही. तरीही तो सतत काळाबरोबर राहिला. धर्मेंद्रला शेरोशायरीचा नाद होता आणि अनेक शेर त्याला पाठ होते. तो स्वतःही शेर करायचा. अत्यंत खुल्या व मोकळ्या मनाने आणि दिलदारपणे कसे वागावे आणि जगावे, हे धर्मेंद्रकडे पाहून समजते. पंजाबच्या या यमला जटाला जिवंतपणी माध्यमांनी मारलेदेखील होते. परंतु शेवटी प्रत्येक जन्माची अखेर ही होतच असते. बाहेरून पोलादी असलेला धर्मेंद्र आतून हळवा होता. धर्मेंद्रच्या जाण्यामुळे एका जिंदादिल जीवनाची अखेर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT