मुंडेंची अखेर गच्छंती!  Pudhari File Photo
संपादकीय

मुंडेंची अखेर गच्छंती!

पुढारी वृत्तसेवा

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या अटकेनंतर त्याच्या काळ्या कारनाम्यांची रोज नवी प्रकरणे उघड होत असताना आणि विधिमंडळात विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडायची रणनीती आखली असताना अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. राष्ट्रीय माध्यमांतूनही त्याची प्राधान्याने दखल घेतली गेली. होत असलेल्या आरोपांमुळे ते नैतिकद़ृष्ट्या जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील, याची सारेच वाट पाहात होते. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचा विषय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर सोपवला होता. अजित पवारही मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहात असावेत. मुळातच हे गुन्हेगारीचे प्रकरण. त्यात कोणाचे, कोणी आणि कसे समर्थन करायचे? नुकतेच सीआयडीने विशेष मोका न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करून, त्यात वाल्मीक कराडचा उल्लेख ‘आरोपी क्रमांक एक’ म्हणून केला. त्याच्याच इशार्‍यानुसार ही हत्या करण्यात आली. ‘आवादा’ कंपनीकडून खंडणी उकळताना देशमुख आडवे आले, तर त्यांना कायमचा धडा शिकवा, असा संदेश वाल्मीकने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिल्याचा आरोप आहे. देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ कॉल सुरू होता आणि त्याची क्लिप आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर शेअर केली होती. याच डिजिटल पुराव्याचा आधार घेऊन, देशमुख यांचा खून करणारी एक टोळी होती, या निष्कर्षापर्यंत सीआयडी पोहोचली. देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समाजमाध्यमांतून समोर आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. या घटनेत मुंडेंकडे बोट दाखवले जात होते ते त्यांचा जवळचा कार्यकर्ता वाल्मीक कराडमुळेच. तो बीड जिल्ह्यात मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जात होता. मुंडे यांच्या निवडणूक काळातील प्रचाराचे व्यवस्थापन त्यांच्या अनुपस्थितीत वाल्मीकच्या खांद्यावर होते.

वाल्मीकने ‘आवादा’ या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. यावरून कंपनी प्रशासन आणि वाल्मीकमध्ये वाद होते. यातून वाल्मीकचे सहकारी आवादा कंपनीत गेले आणि त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षारक्षकाला मारहाण केली. हा सुरक्षारक्षक मस्साजोगमधील असल्याने सरपंच संतोष देशमुख ‘आवादा’ कंपनीत गेले होते. तेथे संतोष आणि गावकर्‍यांनी वाल्मीकच्या टोळीच्या लोकांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर वाल्मीकने या भांडणाचा सल मनात ठेवून आपल्या टोळीतील गुंडांकरवी देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या घडवली, असा हा थरारक आणि एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा घटनाक्रम. ‘आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी होती. न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि माझी प्रकृती ठीक नसल्याने, वैद्यकीय कारणास्तवही मी मंत्रिमंडळातून पदाचा राजीनामा दिला आहे’, असे मुंडे यांनी राजीनाम्यानंतर म्हटले आहे. वाल्मीक हा आपल्या बदमाश सहकार्‍यांमार्फत काय काय उद्योग करत होता, याची मुंडे यांना कल्पनाच नव्हती काय, असा प्रश्न विचारला जात होता, हे विसरता येणार नाही. देशमुख हत्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा का द्यावा, असा पवित्रा मुंडे यांनी घेतला होता. ते राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती अजित पवार यांनीच करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले होते. पण पुरावे आल्यानंतरच मी निर्णय घेईन, असे अजित पवार सांगत राहिले.

खरे तर मस्साजोग खून प्रकरणात मुंडे यांचा स्पष्ट सहभाग होता, असा आरोप कोणीही केला नव्हता. पण ज्यांना अटक केली ते सर्व आरोपी हे मुंडे यांच्या वर्तुळातील होते. म्हणून ते मंत्रिपदी असले तर ते प्रशासन व पोलिसांवर दबाव आणू शकतील, या कारणाने तसेच नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. ती मागणी भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनीही जाहीरपणे केली होती. महाराष्ट्रात यापूर्वी भ—ष्टाचाराचे व अन्य काहीही आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. पण सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य काहीजणांनी मुंडे यांच्यावर भ—ष्टाचाराचे आरोप केले आणि अनेक पुरावे समोर आणले. त्यानंतरही त्यांनी पदत्याग केला नाही. बीडचे पालकमंत्रिपद मुंडे यांच्याकडे न देता अजित पवार यांनी ते स्वतःकडे घेतले. किमान हा तरी आपला अपमान आहे, असे समजून मुंडे यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. अनेक मोर्चे, उपोषणे, सत्याग्रह होऊनही मुंडे खुर्ची सोडायला तयार नव्हते. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना, उपक्रम आणि कार्यक्रम हे झाकोळले जात होते. यामुळे महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेवर डाग आला होता. त्यामुळे मुंडे यांची गच्छंती अटळ होती. नैतिकता विचारात घेऊन मुंडे यांनी पदत्याग केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पण ही नीतिमत्ता इतकी उशिरा कशी जागी झाली? आता मुंडे यांच्या कारकिर्दीत झालेल्या सर्व गैरप्रकारांची एसआयटी नेमून चौकशी व्हायला हवी. मुंडे यांना देशमुख प्रकरणात सहआरोपी करण्याच्या मागणीत पुरेसे तथ्य असल्यास त्याचाही विचार केला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार वसुली प्रकरणामुळे बदनाम झाले होते. गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत विविधांगी प्रकल्प आणून चौफेर विकास करण्याच्या योजना फडणवीस यांनी आखल्या आहेत. काही संशयास्पद प्रकल्पांना स्थगिती देऊन आपण पारदर्शी व स्वच्छ कारभार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. अशावेळी मंत्रिमंडळातील सर्व सहकार्‍यांची प्रामाणिक साथ असेल, तरच हे प्रकल्प साकार होऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT