मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
संपादकीय

महाराष्ट्राचे अष्टपैलू नेतृत्व

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व अशी आहे. त्यांचा राजकीय प्रवास, निर्णय क्षमता आणि विकासाचा ध्यास यामुळे त्यांनी वेगळी छाप निर्माण केली आहे. आज (२२ जुलै) त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि परममित्र देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! जीवेत शरद: शतम्! महाराष्ट्राला बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेत्यांची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेचे पाईक असलेले देवेंद्र फडणवीस हे अतिशय उमदे व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यासू, हजरजबाबी, धोरणी, दूरदृष्टी असलेला आणि त्याचबरोबर संवेदनशील नेता म्हणजे देवेंद्रजी. माझ्या दृष्टीनं ते एका मोठ्या सक्सेस स्टोरीचे महानायक आहेत. देवेंद्रजी राजकारणातलं चालतेबोलते विद्यापीठच आहे. आम्ही एक तपाहून जास्त काळ एकमेकांसोबत काम करतो आहोत. या काळात राजकीय पटलावर अनेक बदल झाले; पण बदलले नाही ते आमचे मैत्र!

देवेंद्रजी विद्यार्थी दशेपासून चळवळींच्या वातावरणात वाढलेे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड पगडा आहे. नागपूरसारख्या शहराच्या महापौरपदाच्या कार्यकाळापासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीने भरारी घेतली. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ विराजमान झालेल्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत आलेला आहे. या भरारीसाठी त्यांनी जीवापाड मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर माता-पित्यांचे संस्कार, गुरुजनांचे आशीर्वाद, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि स्नेहीजनांचे पाठबळ यांच्यामुळे त्यांच्या यशकीर्तीची पताका डौलाने फडकते आहे.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या आशीर्वादाने मी प्रथम विधानसभेत पोहोचलो. तेव्हापासून देवेंद्रजींची भाषणे ऐकतो आहे. ते ज्या ठामपणे, सुस्पष्ट मुद्द्यांसहीत, आकडेवारीनिशी त्यांचे म्हणणे मांडत, त्याचे सर्वांनाच अप्रूप वाटेे. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करण्याचे, अशक्य ते शक्य करण्याचे प्रसंग आले, तेव्हा त्यांच्यातील या सुस्पष्टतेचा पुन्हा परिचय झाला. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा भूमिकांत मीही त्यांच्यासोबत काम करीत आलो आहे. महाराष्ट्राच्या भल्याचा विचार हा आमच्या मैत्रीतील समान धागा. त्यातूनच आम्ही विकासाचे लक्ष्य निश्चित करून जोरदार वाटचाल करीत आहोत. या वाटचालीत चढउतार येतातच. सगळे दिवसही सारखे नसतात; पण आमच्यात मतभेद, विसंवाद याला अजिबात थारा नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आमचा एकमेकावरील विश्वास आणि संवाद! आम्ही आपापली मतं अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे एकमेकांसमोर मांडत असतो; परंतु त्यात वैयक्तिक नव्हे, तर राज्याचा विकास आणि लोककल्याणच केंद्रस्थानी असते. आम्हा दोघांमध्ये वितुष्ट निर्माण व्हावे, यासाठी अनेक जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत; पण आम्ही त्या सर्वांना पुरून उरलोय.

बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन यांनी ज्या नैसर्गिक युतीची मुहूर्तमेढ रोवली, तिला आधुनिक काळात खऱ्याअर्थाने पुढे नेण्याचे काम आम्ही एकत्रपणे करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघेही विकसित भारताच्या गाथेत महाराष्ट्राचे योगदान अधिकाधिक असावे, यासाठी वचनबद्ध आहोत.

२०१९ मध्ये शिवसेनेच्या तत्कालीन नेत्यांनी वैचारिक तडजोड करून सत्तेच्या खुर्चीसाठी शिवसेना-भाजप युतीला तडा दिला; परंतु अडीच वर्षांतच आम्ही त्यांना बाजूला सारून पुन्हा महाराष्ट्रात लोकांच्या मनातले ‘महायुती’ सरकार स्थापन केले. देवेंद्रजींनी या संघर्षमय आणि आव्हानात्मक परिस्थितीत मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे, तर माझ्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी पक्षादेश म्हणून शिरसावंद्य मानला. ही त्यांची अजोड कर्तव्यनिष्ठा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. त्यांनी नेहमीच पदापेक्षा ‘कर्तव्या’ला महत्त्व दिले. राज्याच्या हितासाठी त्यांनी घेतलेले मोठे निर्णय आणि दाखवलेला मोठेपणा त्यांच्या परिपक्व नेतृत्वाची साक्ष देतो. एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना अधिक जवळून होते. देवेंद्रजींबाबतही माझा अनुभव असाच आहे. लोकांना त्यांच्यातला अभ्यासू नेता दिसतो; पण त्यांच्यातला संवेदनशील माणूस, सहकाऱ्यांचा विचार करणारा मित्र आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा संघटक जवळून अनुभवला की, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणखी मोठं वाटतं.

राजकारणात कितीही मोठे संकट आले, तरी अत्यंत शांत डोक्याने आणि संयमाने त्यावर तोडगा काढण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यामागे अभ्यासाइतकाच आत्मविश्वासही कारणीभूत आहे. विधिमंडळात विरोधकांच्या आरोपाला पुराव्यांसह आणि आकडेवारीसह चोख उत्तर देण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कायदा आणि नियमांचा त्यांचा अभ्यास थक्क करणारा आहे. त्यांच्या स्मरणशक्तीचं मला अनेकदा आश्चर्य वाटतं. काही महिन्यांपूर्वी एखाद्या बैठकीत झालेली चर्चा, एखाद्या जिल्ह्यातील प्रकल्पाची टक्केवारी किंवा एखाद्या अधिकाऱ्याला दिलेली सूचना, हे सगळं त्यांना सहज आठवतं. देवेंद्रजींची आणखी एक जमेची बाजू म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावं, यासाठी त्यांनी डिजिटल प्रणालींना प्रोत्साहन दिलं. चांगल्या कामांसाठी त्यांनी समोरच्याचे कौतुक केले आणि प्रसंगी कानही पकडले. त्यांच्या या स्पष्टपणामुळे प्रशासनात उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते.

देवेंद्रजीच्या डोक्यात महाराष्ट्राच्या विकासाची स्पष्ट रूपरेषा तयार आहे. गतिमान प्रशासन, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि उद्योग हे त्यांच्या कार्यपद्धतीचे सहा पैलू आहेत. नागपूर ते मुंबईदरम्यानचा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण. या प्रकल्पाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि आम्ही सर्वांनी मिळून ते प्रत्यक्षात आणले. तसाच विचार त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठीही केला. ‘जलयुक्त शिवार’ योजना ही ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरली आहे. राज्यभरातील मेट्रोचे जाळे असो, रस्ते आणि पूल यांची उभारणी असो की महाराष्ट्राला ऊर्जासंपन्न आणि उद्योगस्नेही करण्याचा त्यांचा विचार असो, हे सारेच महाराष्ट्राला पुढे नेण्यातले महत्त्वाचे टप्पे आहेत. ४८ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे जुने वीज बिल माफ करण्याची घोषणा करून त्यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. आपण केवळ उद्योग-पायाभूत सुविधा यामध्येच निर्णय घेणारे नसून शेतकरी आणि एकूणच ग्रामीण विकासासाठी ठोस पावले उचलणारे आहोत, ते त्यांनी दाखवून दिलं. एवढं मोठं कर्तृत्व, पद आणि जनमानसातील लोकप्रियता असूनही देवेंद्रजी पाय जमिनीवर ठेवून जगतात. त्यांच्या या साधेपणामुळेच ते मला सख्ख्या भावासारखे वाटतात. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. अशा अष्टपैलू, संवेदनशील आणि निष्कलंक नेत्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच! त्यांच्यासारखा अहोरात्र काम करणारा, महाराष्ट्राच्या जनतेशी नाळ जोडलेला नेता राज्याला मिळणे हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्राच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्याची उत्तम साथ मिळो आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास सदैव दरवळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! त्यांच्या भावी राजकीय प्रवासाला आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी उदंड शुभेच्छा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT