संपादकीय

तेजस्वी कर्मयोद्धा

Arun Patil

लक्षद्वीप बेटावर विकास कामांना सुरुवात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच तिथे जाऊन आले. समुद्रकिनार्‍यावर आणि समुद्राच्या आत भटकंती करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. असा निवांतपणा पंतप्रधानांना क्वचितच मिळत असावा. सलग दहा वर्षे एकही सुट्टी न घेता अहोरात्र काम करणारा पंतप्रधान मिळाला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर झुंज देत असताना, विकास, विकास आणि केवळ विकासाचा ध्यास घेतलेला हा माणूस देशाला जगात पाचव्या क्रमांकावर आणून ठेवण्यात यशस्वी झाला आहे, हे नक्की.

तुम्ही अधूनमधून आराम करत जा. खूप खूप काळजी वाटते. अहोरात्र विरोधकांचे टीकेचे बाण तुमच्या दिशेने झेपावत असतात. तुमचे व्यक्तिमत्त्व नकोसे वाटणारे असंख्य तुमच्यासाठी कुठे घात लावावा, याचा सतत विचार करत असतात. सातत्याने देशभरात होत असलेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही सतत प्रचारात व्यस्त असता. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचे नियोजन आणि त्यादृष्टीने पक्ष करत असलेल्या संघटनावरही लक्ष असते.

परदेश दौरा करून आल्यानंतर म्हणजे साधारणत: पाच-सहा तास विमानात बसल्यानंतर कोणाही व्यक्तीला दोन-तीन दिवस तरी जेट लॅग लागतो; पण तुमच्यात काहीही फरक पडत नाही. 18 तासांच्या सलग विमान प्रवासानंतर राजधानीमध्ये विमान उतरल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही ठरलेल्या मिटींगांना हजर असता. तुम्हाला एवढी ऊर्जा तुम्हाला मिळते तरी कुठे कुठून? तुमच्या या ऊर्जेने आणि तुम्ही करत असलेल्या अहोरात्र कष्टामुळे आम्ही थक्क होऊन जातो. शेकडो वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सोडवून तुम्ही जी कामगिरी केली आहे, त्याला शत शत नमन! सर्वात मोठे राम मंदिर अयोध्येत होत आहे आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठी मशीद ही अयोध्येत तयार होत आहे, हे तुमचे नियोजन चकित करणारे आहे. मंदिरासंबंधी चर्चा होत असताना सर्वात मोठ्या मशिदीची चर्चा फारशी झाली नाही; पण या मशिदीचा शुभारंभ करण्यासाठी जगातील सर्वोच्च मौलवींना आमंत्रित केले आहे.

अशा पद्धतीने विचार करत देशाचा रथ वायूवेगाने प्रगतीच्या मार्गावर चालविताना कधी कधी तुमचीच काळजी वाटते सर. थोडा तरी आराम करत जा. लक्षद्वीपला गेल्यानंतर आलेल्या बातम्या पाहिल्या तर तुम्ही तिथे आराम करण्यासाठी गेला नव्हता, तर लक्षद्वीपचे पर्यटनासाठी मार्केटिंग करण्यासाठी गेला होतात, हे सहज लक्षात येते. भारतीय लोक अंदमान-निकोबारला नियमित जात आहेत. परंतु, लक्षद्वीप हे तसे बर्‍यापैकी दुर्लक्षित झालेले बेट आहे. तिथे जाऊन तुम्ही भारतीय लोकांना पर्यटन यादीमध्ये लक्षद्वीपचा समावेश करा, असे आवाहन केले आहे.

राम हा आस्थेचा विषय आहेच, परंतु त्याचबरोबर राम जन्मभूमी ही जगभरातील हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे, हे ओळखून तुम्ही जे कार्य केले आहे, त्याला तोड नाही. सरदार पटेल यांचा भव्य पुतळा गुजरातमध्ये उभारल्यानंतर त्यावर अशीच टीका झाली होती. परंतु, पुतळ्यावर झालेला खर्च मात्र सहा महिन्यांत पर्यटकांच्या गर्दीने भरून निघाला आणि आज शेकडो कोटी रुपये त्या माध्यमातून गुजरात सरकारला मिळत आहेत, हेही अफलातून नियोजन तुमचेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT