Terror Plot Foiled | दहशतवादी सावट (Pudhari File Photo)
संपादकीय

Terror Plot Foiled | दहशतवादी सावट

पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी संबंधित नऊ हस्तकांना दिल्ली पोलिसांनी पकडले आणि दिल्ली व मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेला. दिल्ली पोलिसांची दक्षता व सुरक्षा दलाच्या गुप्तचर यंत्रणेची सतर्कता यामुळे देशावर होऊ घातलेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट टळले. केवळ मुंबई, दिल्लीतच नव्हे, देशातील अन्य शहरांतील महत्त्वाच्या ठिकाणांवरही दहशतवादी हल्ले करण्याची योजना होती.

अणू प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, विमानतळ, रेल्वेस्थानके आदींवर दहशतवादी हल्ले झाले असते, तर देशात मोठा हाहाकार उडाला असता. अशा हल्ल्यात किती लोकांचे बळी गेले असते, याची कल्पनाही करणे कठीण आहे. देशावरील दहशतवादी हल्ले रोखण्यात पोलिस व सुरक्षा दलाला यश मिळाले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. देशात मुंबई व दिल्ली ही दोन्ही महानगरे अत्यंत महत्त्वाची आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच शिवाय देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात, तर दिल्लीची त्याहीपेक्षा जास्त आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. या दोन्ही महानगरांत वित्तीय संस्था, राष्ट्रीय बँका, उद्योग समूहांची कार्यालये आहेत. दिल्लीत संसद भवन, दूतावास व राजकीय पक्षांची मुख्यालये आहेत. या दोन महानगरांत यापूर्वी अनेकदा दहशवादी हल्ले झाले आहेत. शेकडो निरापराध लोकांचे अशा हल्ल्यात बळी पडले आहेत.

संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला व मुंबईवर कसाब व त्याच्या टोळीने समुद्रमार्गे येऊन केलेला दहशतवादी हल्ला या घटनांनी जगाला हादरा बसला होता. या दोन्ही हल्ल्यांत सर्व दहशतवादी हल्लेखोर ठार झाले. एकाला फाशी झाली; पण मुंबई व दिल्ली ही महानगरे आजही आयएसआयच्या रडारवर आहेत, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दिल्ली व मुंबईवर दहशतवाद्यांचे आत्मघाती हल्ले होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. बॉम्बस्फोट घडवून व गोळीबार करून अशांतता व घबराट माजविण्याचा मोठा कट आखला गेला होता. राजकीय व अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असलेल्या व देशाला अर्थशक्ती देणार्‍या या दोन महानगरांत दहशतादी हल्ले केल्यानंतर देशाच्या स्थैर्याला धोका पोहोचू शकतो, अशा पद्धतीने या हल्ल्यांची आखणी करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वीच पुणे आणि झारखंडमधील साहिबगंज येथून दोन गुन्हेगार तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. शार्प शूटर म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या संपर्कात आयएसआयने आखलेल्या कटातील काही दहशतवादी होते, असे चौकशीत आढळून आले.

देशात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरुणांची भरती करण्याचे कामही चालू होते. हल्ले घडविल्यानंतर लाखो रुपयांची मोठी रक्कम देण्याचे आमिष त्यांना दाखवले जात होते. दहशतवादी टोळीतील नऊ जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये मुंबई-दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील जागांचे फोटो दिल्ली पोलिसांना आढळून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची चौफेर प्रगती चालू आहे. जगातील टॉप फाईव्ह अर्थव्यवस्थांमध्ये देश येत असून आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल चालू आहे. अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. इंधनाचे दर वाढत आहेत; पण तुलनेने भारतात जनजीवन सुरळीत आहे. नेमके हेच पाकिस्तानला खूपत असावे.

भारतात अशांतता व अस्थिरता निर्माण व्हावी, यासाठी आयएसआय गेली अनेक वर्षे कारवाया करीत आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात घुसवून हल्ले, रक्तपात घडविण्याचे कारस्थान चालू आहे. दिल्ली पोलिसांच्या जागरूकतेमुळे हा कट उघडकीस आला व मुंबई व दिल्लीवर हल्ले होण्यापूर्वीच नऊ दहशतवादी जेरबंद केले गेले. पुलवामा व पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रावर एअर स्ट्राईक करून तेथील असंख्य अड्डे उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला धडकी भरेल अशी भारतीय सेनेने कारवाई केली; पण त्यानंतरही भारतात घुसून, दहशतवादी हल्ले करून अस्थिरता व अशांतता घडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चालूच आहे.

मुंबई, दिल्ली अशा महानगरांत पाकिस्तानी व बांगला देशी घुसखोर वर्षानुवर्षे राहत आहेत. देशात नेमके किती घुसखोर आहे, याची निश्चित आकडेवारी कोणी सांगू शकत नाही; मात्र मुंबई, दिल्ली, कोलकाता या महानगरांत तसेच पश्चिम बंगाल, आसाम व इशान्येकडील राज्यांत घुसखोरांची संख्या मोठी आहे. आसाम व पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून तेथील घुसखोरांमध्ये घबराट पसरली आहे. आता आपल्याला भारतात संरक्षण मिळणार नाही, याची त्यांना खात्री पटली आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून बेकायदा बांधकामे, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे, अनधिकृत झोपडपट्ट्या हटविण्याचे काम देशभर चालू आहे. उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये तर बुलडोझर चालवून बेकायदा बांधकामे पाडली जात आहेत.

मुंबईत रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्येही हे गुन्हेगार वर्षानुवर्षे आश्रय घेत आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे रेल्वेस्थानकात रेल्वे रुळाला लागून मोठी झोपडपट्टी होती. गरीबनगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाप्रचंड बेकायदा झोपडपट्टीला काँग्रेसच्या काळात कोणाची हात लावण्याची हिम्मत झाली नव्हती. आता केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. बेकायदा बांधकामे व घुसखोरांच्या विरोधात कठोर कारवाई ही भाजपची भूमिका आहे. गरीबनगर हे गुन्हेगारांचे मोठे केंद्र बनले होते. गरीबनगर साफ झाले म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता, अशी माहिती मुंबई पोलिसांना तपासात मिळाली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवादाविरोधातील लढा सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्याचवेळी सुरक्षा यंत्रणांची सतर्कता, नागरिकांचे सहकार्य आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी यांच्याद्वारेच मुंबई, दिल्लीसारख्या महत्त्वाच्या शहरांचे सुरक्षित आणि स्थिर भविष्य सुनिश्चित करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT