विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा महत्त्वाची मानली जाते. या गुणांच्या आधारावर त्यांच्या करिअरचा पाया उभा राहतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरलेला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, गेल्यावर्षीपेक्षा तो 1.49 टक्क्यांनी कमी आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवल्यामुळे त्याचा निकालावर स्पष्ट परिणाम जाणवत आहे. याचा अर्थ, राज्यात कॉपी करण्याचे प्रमाण भरपूर आहे. कॉपी करून मिळवलेल्या यशाला कोणताही अर्थ नसतो, हे शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.
यावेळी नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण 5.07 टक्के अधिक आहे. अर्थात, मुली दहावी काय, बारावी काय, नेहमीच बाजी मारत असून, याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मराठीस अभिजात दर्जा मिळाला असून, या पार्श्वभूमीवर मराठी विषयात प्रावीण्य मिळवणार्यांचे शासनातर्फेही खास कौतुक झाले पाहिजे. वसईच्या ऋषी वाल्मीकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेस बसलेले 76 वर्षीय गोरखनाथ मोरे हेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी लेखी परीक्षा तर दिलीच शिवाय तोंडी परीक्षाही चांगल्याप्रकारे दिली होती. शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते, हे खरे! यंदा व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआयचा निकालही गेल्यावर्षीच्या तुलनेत घटला.
विज्ञान व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण फारसे बदलेले नाही. कोकण विभागाचा निकाल सलग 14व्या वर्षी सर्वाधिक असून, अन्य विभागांनी या यशाच्या पॅटर्नचा अभ्यास केला पाहिजे. कोकण विभागात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय चांगला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रोत्साहन मिळते. कोकणात पारंपरिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे आणि पां. वा. काणे या तीन ‘भारतरत्न’प्राप्त व्यक्ती कोकणातीलच. एकेकाळी शिक्षणाच्या लातूर पॅटर्नचे खूप कौतुक होत असे; पण यावेळी लातूरचा निकाल सर्वात कमी लागला.
एखाद्या पॅटर्नची प्रशंसा झाल्यानंतर काही व्यापारी प्रवृत्ती त्याचा फायदा घेतात. शिवाय शिक्षणात कोणताही शॉर्टकट नसतो. शिक्षणाचे अतिव्यापारीकरण धोकादायक असते. गेल्यावर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर विभागाने यावेळी दुसर्या स्थानावर मजल मारली असली, तरी निकालात 0.60 टक्क्याने घसरण झाली; पण कोल्हापुरातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 6.21 टक्क्यांनी जास्त असून, हे अभिनंदनीयच! कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के यशस्वी झाले. मुंबई विभागाने तिसरा क्रमांक पटकावला असून, त्यातही रायगडने बाजी मारली. रायगडमधील वाढलेल्या पायाभूत सोयी आणि शैक्षणिक सोयी-सुविधा आणि अध्यापन कौशल्यावर दिलेला भर याचा हा परिणाम आहे; मात्र मुंबई विभागात दक्षिण मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला, हे धक्कादायक आहे.
दक्षिण मुंबई ही शहरातील मुख्यतः धनिकवनिकांची वस्ती. कला शाखेचा निकाल 5.36 टक्क्यांनी घटला असून, ही चिंतेची बाब आहे. मुंबईत 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षासाठी नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चुरस निर्माण होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांवर वर्षभर मेडिकल, इंजिनिअरिंग अशा विविध प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाचेही ओझे असते. केवळ बारावीत उत्तम गुण मिळवणे पुरेसे ठरत नाही, हेही एक वास्तव आहे. जीवनात कला, साहित्य, सामाजिक शास्त्रे यांना महत्त्व असून, त्या क्षेत्रातही उत्तम करिअर होऊ शकते, हे बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था आजही कमी पडते, हे लक्षात घेतले पाहिजे.
यंदाही मुलींनी लख्ख यश मिळवत मारलेली बाजी उल्लेखनीय ठरली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते. पित्याच्या हत्येच्या दुःखात पोळून निघालेली त्याची कन्या वैभवी ही न्याय मागण्यासाठी जनतेसोबत अनेकदा रस्त्यावरील मोर्चांतही उतरली होती. एवढ्या संकटकाळातही या लेकीने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के मिळवून कमाल करून दाखवली. आज तुझे वडील असते, तर त्यांना आनंद झाला असता, तू अशीच प्रगती करत राहावेस, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पत्राद्वारे दिल्या. मुंबईतील घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील गायत्री पन्हाळकर हिने मराठी विषयात 100 गुण पटकावत या विषयात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने मन लावून अभ्यास केला. तसेच नियमितपणे वृत्तपत्र वाचन सुरू ठेवले. सर्व शाखांमधील एकूण 1 लाख 15 हजारांच्या आसपास विद्यार्थी नापास झाले. मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले वा मुलगा नापास झाला, तर पालक निराश होतात. काही मुले आत्महत्या करतात, तर अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. अपयशाचा बाऊ न करता ते पचवण्याची तयारीही ठेवली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, अलर्ब्ट आईनस्टाईन, विन्स्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, रामानुजन, जे. कृष्णमूर्ती, कुसुमाग्रज, यशवंतराव चव्हाण, आर. के. लक्ष्मण, गुलजार, शांता शेळके अशी अनेक थोर माणसे कोणत्या ना कोणत्या विषयात नापास झालेली होती.
शालेय वा महाविद्यालयीन जीवनात प्रतिकूलता येऊनही त्यांनी प्रयत्नपूर्वक त्यावर मात केली. आपापल्या क्षेत्रात व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. ज्यांना कमी गुण मिळाले वा जे नापास झाले, त्यांनीही सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवला पाहिजे. आत्मविश्वास सर्वात मोठे शस्त्र असते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हवाई दलाच्या परीक्षेत नापास झाले होते; पण त्यांनी आपले स्वप्न काही सोडले नाही. शास्त्रज्ञ म्हणून ते जगद्विख्यात झालेच शिवाय राष्ट्रपती झाल्यानंतर ते सर्वोच्च कमांडर बनले आणि त्यांनी विमान उडवण्याचे 6 महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय हवाई दलाचे सुखोई विमान त्यांनी उडवले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आयुष्याला सुंदर वळण देता येते, हाच विद्यार्थ्यांनी घ्यायचा धडा आहे.