देशात सार्वत्रिक बेपर्वाई सर्वत्र दिसते. सार्वजनिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही ठिकाणी त्याचे प्रत्यंतर येते. प्रकल्प पूर्ण केले जातात, अनेकदा त्यात दिरंगाई होते, पूर्ण झाले तरी त्यांची देखभाल नीट होत नाही. सार्वजनिक मालमत्तेचा वापर करताना अनेकदा लोकांचेही भान सुटते. रविवारी मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून झालेली दुर्घटना हे त्याचेच एक ठळक उदाहरण. यात चार पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 18 जण जखमी झाले. 38 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने त्यांचा जीव वाचू शकला. 1993 मध्ये हा लोखंडी पूल बांधण्यात आला होता.
नदी ओलांडण्यासाठी पुलाचा वापर केला जात होता. त्यावरून स्कूटर, मोटारसायकलही जात होत्या. अलीकडेच हा पूल जीर्ण झाला आणि कोसळला. खरे तर 30-32 वर्षांतच हा पूल इतका जीर्ण झाला कसा, हा प्रश्नच आहे. पुलाची अशी ‘अवस्था’ असल्यामुळे एकच दुचाकी येऊ शकेल, एवढीच त्याची क्षमता. पावसाळी पर्यटनासाठी पूलावर मोठ्या संख्येने पर्यटक आले, पाणी आणि निसर्गाचा आनंद लुटत असताना पूल चाळीसहून अधिक पर्यटक, त्यांची वाहने यांना घेवून क्षणार्धात वाहत्या नदीत कोसळला! अचानक झालेल्या या घटनेने गोंधळ उडाला. अनेकांनी प्रयत्न करून काहीजणांना वाचवण्यात यश आले. वास्तविक पूल जुना झाल्याचे राज्य सरकारला ठाऊक होते. पुलाची अवस्था वाईट लाी असून त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी सरकारकडे वारंवार विनंती केली होती. गेली आठ वर्षे कित्येकदा तक्रारी करूनही पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली नाही. साधी डागडुजीही झाली नाही.
मागणीकडे डोळेझाक केली गेली. शेवटी त्याचे पर्यवसान या अपघातात झाले. त्यासाठी आता कोणाला जबाबदार धरणार? संबंधित खात्याला, खात्याच्या अधिकार्यांना की स्थानिक लोकप्रतिनिधींना? हा पूल धोकादायक असल्याचा सूचना फलक पुलाच्या बाजूला लावण्यात आला असला, तरीही तेथे पोलीस का नव्हते, हा प्रश्नच आहे. हा पूल जर धोकादायक होता, तर तेथे अडसर लावून संपूर्ण प्रवेशबंदी का करण्यात आली नाही? मरणाच्या दारात पर्यटकांना का ढकलले गेले? आता या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे; मात्र काही दिवासंपूर्वी बारामतीत पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली असताना, अजित पवार तेथे तातडीने गेले होते; पण इंद्रायणी दुर्घटनेनंतर मात्र ते त्याच दिवशी घटनास्थळी आले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. त्याचे काय ते उत्तर अजित पवार देतीलच. ते येण्या न येण्याने प्रश्न सुटणार नसला तरी राजकीय संवेदनशीलतेचा प्रश्वन उरतोच. त्या जागेवर नवा पूल उभारून आणि राज्यातील अशा मोडक्या पुलांवरील संभाव्य दुर्घटना टाळून ते दाखवतील, अशी आशा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्यातील जुन्या पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधीही अशा तसेच शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पुलांचे परीक्षण झाले आहे. त्यावर उपाययोजना त्याही वेळेवर झाल्या तरी अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतील. इंद्रायणी नदीवरी या पुलाच्या नवीन बांधकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते; पण राज्य अर्थसंकल्प मांडण्यात येऊन बरेच दिवस उलटून गेले. तरीही याबाबतची वर्क ऑर्डर निघण्यास विलंब लागावा, हे गंभीर आहे.
राज्यातील शेकडो पुलांची दुरवस्था असून, त्यांची यापूर्वीच दुरुस्ती करण्याची गरज होती. दर पावसाळ्याच्या आधी अशाप्रकारचे जोखमीचे पूल कोणते, त्यांची तपासणी होऊन ते दुरुस्त झाले पाहिजेत अथवा तेथे ये-जा करण्यास बंदी तरी करण्यात आली पाहिजे. शिवाय अशा जुन्या पूल, साकवांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. संबंधित बांधकाम खाते, पोलिस यांच्यावर वाहतूक सुरक्षेचे काम सोपवले पाहिजे. एवढ्या साध्या साध्या गोष्टी सरकारला का जमत नाहीत? या प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीच्या दुसर्या बाजूला असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांसाठी रहदारीसाठी हा एकच पूल आहे. याचा अर्थ, त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज होती. स्वत:च्या सुरक्षेची कोणतीच पर्वा न बाळगता दिसत असूनही या धोक्याच्या दिशेने धाव घेणार्या पर्यटकांचीही चूकही मोठी आहे, असे म्हणावे लागेल. पूल कमजोर आहे, हे माहीत असतानाही पर्यटक पुलावर छायाचित्रे काढण्यासाठी जात आणि थांबत, तेथे रील्स करत बसत. केवळ एक दुचाकी जाईल, एवढीच जागा असताना, दोन्ही बाजूंनी वाहने घेऊन जाणे, रेटारेटी करणे, हेही चुकीचेच आहे.
पावसाळ्यात माळशेज, ताम्हीनी, लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर आदी पर्यटनस्थळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी लोक जातात; पण ज्यावेळी मुसळधार पाऊस असतो, अथवा पूरसद़ृश स्थिती असते, तेव्हा जाऊ नका, असे सांगूनही लोक तिथे जातात. लोणावळ्याजवळ भुशी डॅमसारख्या ठिकाणी लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात. समुद्रात वा नदीच्या पाण्यात खोलवर जाऊ नका, असे सांगूनही ते ऐकत नाहीत. डोंगरकड्याच्या टोकावर सेल्फी काढताना पाय घसरून दरीत कोसळतात. माथेरानला धबधब्यात अशाच घटनेत तिघांचा बळी गेला. अशा अनेक घटना गेल्या दोन-तीन वर्षांत घडल्या. तरीही लोकांना अती उत्साहास आवर घालता येत नसेल, तर अशी नवनवी संकटे उद्भवणारच. ती टाळणे इतकेच हाती असते. त्यासाठी शासकीय बेफिकिरी थांबली पाहिजे आणि सर्वसामान्यांनीही, खास करून, तरुणाईने संयमाने वागले पाहिजे. एक माणूस जेव्हा नाहक जीवानिशी जातो, तेव्हा त्याचे अख्खे कुटुंबच संकटात सापडते. म्हणूनच प्रत्येकाने स्वातंत्र्याचा अनुभव घेताना जबाबदारीची जाणीवही ठेवली पाहिजे.