तानाजी खोत
शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1926 मध्ये जन्मलेल्या डेव्हिड अॅटनबरो यांचा 8 मे हा वाढदिवस. त्यांचे जीवन म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात क्रांतिकारक शतकाचा चालता बोलता इतिहास आहे. लेस्टरमधील मातीत जीवाश्म शोधण्यापासून सुरू झालेला त्यांचा पृथ्वीची गोष्ट सांगण्याचा प्रवास 1952 मध्ये ‘बीबीसी’त पोहोचला आणि तिथून जागतिक प्रसारणाचा चेहरामोहराच बदलला. जेव्हा दूरचित्रवाणी हे माध्यम बाल्यावस्थेत होते, तेव्हा डेव्हिड यांनी जगाच्या कोपर्यातील निसर्गाचे वैभव लोकांच्या दिवाणखान्यात आणले.
त्यांच्या ‘झू क्वेस्ट’ या सुरुवातीच्या मालिकेने पहिल्यांदाच वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जगासमोर आणले, जे त्यावेळी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. मात्र, त्यांचे खरा प्रवास 1979 मध्ये ‘लाईफ ऑन अर्थ’ ने सुरू झाला. हा केवळ एक माहितीपट नव्हता, तर जीवशास्त्राची समज बदलून टाकणारा 15 लाख मैलांचा एक महाप्रवास होता. पुढील पाच दशकांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी, वनस्पती आणि अथांग महासागर अशा विविध विषयांवरील त्यांच्या ‘लाईफ’ मालिकेने जागतिक स्तरावर एक आदर्श निर्माण केला. त्यांचा तो संथ, लयबद्ध आणि आश्वासक आवाज निसर्ग इतिहासाचा जणू श्वास बनला.
दशके सरली तशी अॅटनबरो यांची भूमिकाही बदलत गेली. केवळ एक ‘गोष्ट सांगणारा’ माणूस आता निसर्गावर होणार्या अन्यायाचा ‘साक्षीदार’ बनला होता. आपल्या उत्तरार्धात ‘अवर प्लॅनेट’ आणि ‘अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट’ सारख्या मालिकांमधून त्यांनी तटस्थ राहणे सोडून एक प्रखर पर्यावरणवादी म्हणून भूमिका घेतली. हवामान बदल आणि नष्ट होणारी जैवविविधता यावर त्यांनी जगाला जाब विचारला. त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध झाले: ‘ज्याची आपल्याला काळजी वाटत नाही, त्याचे आपण संरक्षण करणार नाही; आणि ज्याचा आपण कधी अनुभवच घेतला नाही, त्याची आपल्याला काळजी वाटणार नाही.’
निसर्गासाठी त्यांचे योगदान शब्दातीत आहे. प्राचीन समुद्री राक्षसांपासून (अॅटनबोरोसॉरस) ते अगदी लहान परजीवी कीटकांपर्यंत 40 पेक्षा जास्त प्रजातींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांना दोनदा ‘नाईटहूड’ने सन्मानित करण्यात आले. यूएनचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा किताब मिळाला आणि वयाच्या 100 व्या वर्षीही त्यांनी ‘ब्ल्यू प्लॅनेट’ साठी आपला आवाज देऊन आपली सक्रियता सिद्ध केली. सर डेव्हिड अॅटनबरो यांच्या कामातून निसर्गाबद्दलची जाणीव जागृत झाली नाही तर पृथ्वीबद्दल वाटणारी आत्मीयताही वाढली. वयाच्या 100 व्या वर्षीही ते जगाचे ‘नैतिक मार्गदर्शक’ आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की, आपण या ग्रहाचे मालक नसून, त्याचे ‘रक्षक’ आहोत. त्यांच्या या शतकभराच्या कार्याचा लेखा जोखा म्हणजे त्यांनी सजीव सृष्टीला लिहिलेले एक प्रेमपत्रच आहे; पण आशा ही आहे की, मानवी समूहाने हे प्रेमपत्र एकत्रितपणे सर्वांनी मिळून ते वाचायला शिकावे.