काय रे मित्रा, आज असा उदास बसला आहेस. इतकं निराश होण्यासारखे काही घडले का आहे का?
अरे, तसे काही विशेष नाही; परंतु माझ्या भावाकडे वेगळाच किस्सा घडलेला आहे. मुलांच्या लग्नाचा प्रश्न किती बिकट झालेला आहे, हे तर तुला माहीतच आहे. मुलींचे लग्न अत्यंत सोपे आहे; परंतु मुलांचे लग्न होणे अत्यंत कठीण आहे. त्यात आपल्यासारख्या लहान गावांमध्ये मुली नांदायला येण्यासाठी तयार नाहीत. त्यांना पुणेच पाहिजे आणि विशिष्ट पॅकेजच पाहिजे. भावाचा मुलगा बत्तीस वर्षे वयाचा झाला तशी त्याला काळजी लागून राहिली होती. मुली येईनात आणि लग्न जुळेना, यामुळे तो पोरगापण नैराश्यामध्ये होता.
अरे, मग वधू-वर सूचक मंडळाकडे नाव नोंदवायचं. तिथे मिळतात भरपूर स्थळे. झालंच तर आपल्या समाजाचे वधू-वर मेळावे अटेंड करायचे. ठरलेच असते ना कुठे ना कुठेतरी.
हे बघ ते सगळे होऊन गेले आहे. अशात भावाला एक एजंट भेटला आणि त्याने कर्नाटक भागामध्ये एक चांगले स्थळ आहे, असे त्याला सुचवले. भाऊ भारावून गेला. एजंटने स्वतःसाठी दोन लाख मागितले आणि मुलीच्या वडिलांसाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगितले. भावाने दहा लाख रुपये कर्ज घेऊन सगळी तरतूद केली. शिवाय, लग्न मुलाकडेच म्हणजे माझ्या भावानेच करायचे होते. ठरल्याप्रमाणे एजंट भावाला आणि नवरदेवाला घेऊन मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत पडली, लग्नही ठरले. ठरल्याप्रमाणे एजंटला दोन लाख दिले. मुलीच्या वडिलांना पाच लाख दिले आणि भावाने मुलाचे लग्न वाजत-गाजत लावून दिले.
अरे, मग चांगले झाले ना. एकदाचे लग्न लागले हे महत्त्वाचे आहे. आता प्रॉब्लेम काय झालाय?
खरा प्रॉब्लेम तिथूनच पुढे सुरू झाला. सकाळी दहा वाजता लग्न लागलेली मुलगी घरामध्ये आली. सासूने तिला ओवाळून तिचे स्वागत केले. जेमतेम तीन-चार तास ती मुलगी घरी होती. इतक्या वेळात तिने स्वतःचे आणि सासूचे दागिने एका पिशवीत घातले आणि घरातून चक्क पोबारा केला.
अरे, काय सांगतोस काय? तुझ्या भावाला केवढा मोठा धक्का बसला असेल आणि त्या नवरदेवाची काय परिस्थिती झाली असेल? कोणीतरी भावाला सांगितले म्हणून सगळ्यांनी तिचा पाठलागपण केला. एव्हानापर्यंत ती बसमध्ये बसून गावाबाहेर पडली होती. आता भाऊ, भावाचा मुलगा आणि सगळेच नातेवाईक कपाळाला हात लावून बसले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. अरे, हे एकप्रकारचे रॅकेट आहे. अडचणीत असलेल्या नवरदेवांना हेरायचे, पैसे काढायचे आणि पळून जायचे. या सगळ्या घटनांमध्ये एजंट, मुलीचे वडील आणि मुलगीही सामील असते. जनतेने अशा प्रकराबाबत सावध राहायला हवे, हे मात्र निश्चित. भावाने पोलिसांत तक्रार केली आहे, बघायचे काय होते ते. तूर्त आमच्या हाती तेव्हढेच आहे.