पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र असले, तरी ते कधीही स्वतःच्या बुद्धीने कारभार करत नाही. ते सुरुवातीपासूनच चीनचे हस्तक म्हणून काम करत आले आहे. भारताच्या विरोधात कारवायांमागे हेच पाठबळ लपून राहिलेले नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही त्रेधातिरपीट उडत असताना, चिनी शस्त्रे, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांची मदत पाकने घेतली. चीन आणि अमेरिकेकडून मदत मिळाली की, पाकिस्तान अधूनमधून फुत्कार सोडतो. पहलगामनंतर भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून टाकला. तेव्हापासून तो भारतासमोर पाण्यासाठी सतत गयावया करत होता. ‘भारत पाककडून एक थेंबही पाणी हिसकावू शकत नाही. भारताने अशी कोणतीही कृती केली, तर तुम्हाला असा धडा शिकवला जाईल की, तुम्ही नेहमी तो लक्षात ठेवाल,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या पार्श्वभूमीवर केली आहे. वास्तविक, सिंधू पाणीवाटप करार भारताने स्थगित केला, त्यासही तीन महिने उलटून गेले. तरी तो काहीही करू शकलेला नाही. उलट ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतासमोर गुडघे टेकण्याची वेळ पाकवर आली.
पुन्हा कोणतीही आगळीक केल्यास, कल्पनाही केली नसेल, अशी किंमत मोजावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ समाप्त झालेले नाही, असेही बजावले आहे. भारतासमोर दोन-चार दिवसांपलीकडे युद्ध खेळण्याची ताकदच पाकिस्तानमध्ये नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देऊन स्थानिक जनतेला खूश करणे, या एकमेव हेतूनेच शरीफ असली बदमाशी करताहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानची 5 लढाऊ विमाने पाडली होती, अशी माहिती भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी दिली आहे. हवाई दलाच्या ताफ्यात अलीकडेच एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम दाखल झाली. यामुळे पाकिस्तानी विमानांना भारताच्या हद्दीत प्रवेश करणे आणि लांब पल्ल्याचे ‘ग्लाईड बॉम्ब’ फेकणे शक्य होणार नाही. तेव्हा पुन्हा कुरापत काढल्यास, भारताची विमाने पाकिस्तानात बॉम्बफेक करतीलच; पण पाकची विमाने भारतीय हद्दीत आल्यास, ती मातीत मिळवण्याची ताकद भारताकडे आहे, हे पाकिस्ताने लक्षात ठेवले पाहिजे. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर हेही सतत मुक्ताफळे उधळत असतात. ते दोन महिन्यांत दुसर्यांदा अमेरिकेच्या दौर्यावर गेले.
फ्लोरिडातील ताम्प येथे पाकिस्तानी जनसमुदायासमोर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत. आमचे अस्तित्व धोक्यात आले, तर आमच्यासोबत निम्म्या जगाला घेऊन उद्ध्वस्त होऊ!’ खरे तर, पाकिस्तान अगोदरच आर्थिक आणि राजकीयद़ृष्ट्या उद्ध्वस्त झालेलाच आहे. तेथील शरीफ सरकार हे लष्कराच्या टेकूवर उभे असून, ज्या पक्षाला (पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या पक्षाला विरोधात बसावे लागले आहे. गेली दोन वर्षे इम्रान खान यांना तुरुंगात डांबले आहे. लष्कराची कठपुतळी बनलेल्या मुस्लिम लीग-नवाज यांच्या अवैध सरकारकडे कोणतेच अधिकार नाहीत. खोटे अधिकार मिळवणे, हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम, असे इम्रान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात दोषी ठरलेल्या खुनी आणि दहशतवाद्यांनाही माझ्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत तुरुंगात ठेवण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
इम्रान यांनी पंतप्रधान असताना मुनीर यांना ‘आयएसआय’च्या प्रमुखपदावरून काढून टाकले होते. त्याचाच बदला आता ते घेत आहेत. शरीफ सरकारविरोधात ‘पीटीआय’ पक्ष देशव्यापी निदर्शने करत रस्त्यावर उतरला आहे. अशा आतून पोखरलेल्या देशाचा लष्करप्रमुख करत असलेल्या गर्जना हास्यास्पद म्हणाव्या लागतील. अणुहल्ल्याची धमकी देणारा हा बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, ‘आम्ही अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही, हे पुन्हा स्पष्ट करतो,’ अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुनीर यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. जेव्हा जेव्हा अमेरिका पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देते, तेव्हा तेव्हा त्यांचे खरे रंग समोर येतात. या देशात लोकशाही अस्तित्वात नसून, लष्कराचेच त्यावर नियंत्रण असल्याचा हा दाखला. अमेरिकेने मुनीर यांना पायघड्या घालून प्रोत्साहन दिल्यामुळे, अंतर्गत धुसफुस वाढणार असून, या देशात बंड अटळ आहे. या परिस्थितीत मुनीर पाकिस्तानचे अध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे. नागरी सत्तेऐवजी लष्कराच्या हातात अण्वस्त्रांच्या चाव्या आहेत, हेच यातून अधोरेखित होते.
काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नाही, असे तारेही मुनीर यांनी तोडले असून, पाकिस्तानची अजून जिरली नसल्याचे दिसते! पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबवण्यासाठी कुठलेही धरण भारताने बांधले, तर आम्ही ते उद्ध्वस्त करू, अशी धमकी मुनीर यांनी दिली आहे. नुसते तोंड चालवायचेच काम करायचे असल्यामुळे शरीफ यांनीही आता अतिरेकी भाषा वापरली. आपली सत्ता जाते की राहते, या भीतीच्या सावटाखाली ते आहेत; पण पाकिस्तानबाबत, ‘गरजेल तो बरसेल काय?’ असेच म्हटले पाहिजे. भारत मात्र सदैव कृतीतूनच उत्तर देत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. 1971 च्या युद्धात चीनप्रमाणे अमेरिकाही पाकिस्तानच्या पाठीशी उभी राहिली. या दोन्ही देशांनी पाक सरकारला लष्करी मदतीचे आश्वासन दिले होते. अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात करण्याची तयारी सुरू केली होती.
मात्र, भारताचा आक्रमक पवित्रा पाहून, शेवटी अमेरिकेला मवाळ भूमिका घ्यावी लागली आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष याह्याखान यांनी जनरल नियाझी यांना शरणागती स्वीकारण्याचे आदेश दिले, हा इतिहास झाला. मात्र, त्यानंतरही अमेरिकेने सातत्याने पाकिस्तानची पाठराखण केली आणि आर्थिक मदतीसह लष्करी मदत केली. त्यामुळे पाकिस्तान नेहमीच अमेरिकेच्या जोरावर उड्या मारत आला आहे. आजही त्यात बदल नाही; पण कोणत्याही देशाची प्रगती स्वत:च्या हिकमतीवर होत असते, हे पाकिस्तानने ध्यानात ठेवायला हवे.