सचिन अडसूळ
जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षीच लोकसंख्येच्या वाढीमुळे निर्माण होणार्या आव्हानांवर विचार करण्याची आणि त्याचवेळी उपलब्ध संधींचा उपयोग कसा करायचा यावर चर्चा करण्याची संधी देतो. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, गेल्या काही दशकांपासून आपल्या प्रचंड मानव संसाधनांचा उपयोग करून विविध क्षेत्रांमध्ये स्थान निर्माण करत आहे. राष्ट्रनिर्मितीत तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो.
संयुक्त राष्ट्राने 1989 मध्ये या दिवसाची सुरुवात लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केली. भारतासारख्या देशात, जिथे लोकसंख्या सतत वाढते आहे, हा विषय अधिक महत्त्वाचा बनतो. विशेषतः भारतातील तरुण वर्गाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वाढती लोकसंख्या ही जरी आव्हानात्मक वाटत असली तरी तिचा योग्य वापर केल्यास ती भारतासाठी एक मोठी संधी ठरू शकते. भारताची लोकसंख्या सध्या 140 कोटींहून अधिक आहे आणि यातील मोठा वाटा हा तरुणांचा आहे. देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे, ज्यामुळे भारताला ‘युवा देश’ म्हणून ओळखले जाते. या तरुणाईने देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात तसेच शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवसंशोधन या क्षेत्रांमध्ये आपली छाप पाडली आहे. स्टार्टअप्सच्या वाढत्या संख्येपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान उद्योगांमधील नेतृत्वापर्यंत भारतीय तरुणांनी आपल्या कर्तृत्वाने देशाला नवी ओळख दिली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जगभरात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बंगळूर, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरांनी जागतिक आयटी केंद्र म्हणून नावलौकिक मिळवला आहे. याशिवाय भारतातील तरुण उद्योजकांनी नवीन स्टार्टअप्सद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. यामुळे केवळ आर्थिक विकासालाच चालना मिळाली नाही, तर सामाजिक बदलांचाही पाया रचला गेला आहे. शिक्षण क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे. आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांनी जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळ तयार केले आहे, जे आज जगभरातील अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहे.
मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे काही आव्हानेही समोर येत आहेत. कौटुंबिक नियोजन, महिलांचे सशक्तीकरण, शिक्षणाचा प्रसार, किशोरवयीन आरोग्यविषयक जनजागृती हे घटक लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शासन व स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये अधिक सक्रिय सहभाग सहभाग घेत सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कौशल्य विकास, शिक्षणाचा प्रसार आणि आरोग्य सुविधांचा विस्तार यावर भर दिल्यास ही आव्हाने संधीत रूपांतरित होऊ शकतात. भारत सरकारने ‘स्किल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या योजनांद्वारे तरुणांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनांनी तरुणांना स्वावलंबी बनवण्यास आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्यास प्रोत्साहन दिले आहे. ग्रामीण भागातील तरुणही कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत क्रांती घडवत आहेत.
भारतातील तरुण वर्ग हा देशाचा सर्वात मोठा आधार आहे. त्यांच्या शिक्षण, कौशल्य आणि नवनिर्मितीच्या जोरावर भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक देशांसाठी लोकसंख्यावाढ ही एक मोठी समस्या मानली जाते. विशेषतः जेव्हा संसाधनांचे वाटप आणि पर्यावरण संतुलनाचा विचार केला जातो. परंतु, या जागतिक आव्हानामध्येही, भारत लोकसंख्येचा सदुपयोग करून प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व आणि क्षमता सिद्ध करत आहे.