आशिष शिंदे
गेल्या काही दशकांत संगणकाची क्षमता आभाळाला भिडली खरी; पण त्याच्याशी संवाद साधणारा मॉनिटर मात्र आजही टेबलावर पाषाणासारखा एकाच जागी खिळून उभा आहे. तासन्तास काम करताना मान किंवा कंबर दुखू लागली, की आपण अंग मागे टाकतो, खुर्ची सरकवतो किंवा स्वतः वाकतो. म्हणजे निर्जीव स्क्रीन हलत नाही, तर माणसालाच स्क्रीनच्या सोयीनुसार आपले शरीर हलवावे लागते. या चुकीच्या बसण्यामुळे होणारी पाठदुखी, मानेचे विकार आणि डोळ्यांवरचा ताण हा आज प्रत्येक संगणक वापरणाऱ्याचा नित्य आजार बनला आहे. माणसाला यंत्राच्या तालावर नाचवणाऱ्या याच त्रासाला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये थेट माणसाच्या हालचालीनुसार स्वतःची जागा बदलणारा जगातील पहिला ‘रोबोटिक टर्मिनल मॉनिटर’ अवतरला आहे. हा केवळ साधा पडदा नसून याला चक्क सहा अक्षांवर फिरणारा एक प्रगत रोबोटिक हात जोडलेला आहे. जो तुमचा चेहरा, बसण्याची ढब आणि हाताचे इशारे अचूक ओळखून स्क्रीन थेट तुमच्या डोळ्यांसमोर आणतो.
तंत्रज्ञान विश्वात नुकताच सादर झालेला हा २७ इंचांचा ४ के मॉनिटर म्हणजे निव्वळ काचेचा पडदा नसून, त्याला चक्क एका सहा अक्षांवर फिरणाऱ्या प्रगत रोबोटिक हाताची ताकद लाभली आहे. तुम्ही खुर्चीत मागे रेललात तर हा स्क्रीन स्वतःहून तुमच्या जवळ येतो, तुम्ही उठून उभे राहिलात तर तो स्वतःची उंची वाढवून तुमच्या डोळ्यांसमोर येतो आणि तुम्ही थोडे बाजूला सरकलात तरी काही सेकंदांत तुमचा चेहरा ट्रॅक करून तो योग्य कोनात झुकतो. प्रथमच रोबोटिक्स आणि संगणक पडद्याचा असा अचूक मेळ घालून माणसाच्या कामाच्या टेबलाला थेट जिवंतपणा बहाल करण्यात आला आहे.
या उपकरणाची रचना अत्यंत सूक्ष्म आणि मानवी सुरक्षेचा विचार करून करण्यात आली आहे. तब्बल ७४७ मिलिमीटरपर्यंत हात लांब करण्याची क्षमता असलेल्या या रोबोटिक मॉनिटरमध्ये थ्री डी सेन्सर्स, एचडीआर कॅमेरे आणि मोशन सेन्सर्सचे जाळे विणण्यात आले आहे. टेबलावर काम करत असताना स्क्रीनसमोर पाण्याचा ग्लास, कॉफीचा मग किंवा एखादी फाईल आडवी आली, तरी त्या वस्तूला धक्का न लावता हा स्क्रीन सुरक्षित मार्ग शोधून स्वतःची जागा बदलतो. अगदी काम करताना अचानक वीज गेली तरीही हा भला मोठा पडदा जोराने आपटत नाही तर यात बसवलेल्या बॅकअप बॅटरीच्या सहाय्याने तो अतिशय अलगद आणि सुरक्षितपणे मूळ जागेवर विसावतो.
या रोबोटिक स्क्रीनचे खरे सौंदर्य दडले आहे ते याच्या हातवारे (जेस्चर) आणि आवाजावर चालणाऱ्या कार्यपद्धतीत. जर तुम्हाला आडवा असणारा स्क्रीन उभ्या स्वरूपात म्हणजेच पोर्ट्रेट मोड करायचा असेल, तर केवळ हाताचा इशारा करून किंवा तोंडाने सूचना देऊन तुम्ही तो क्षणात फिरवू शकता. कामाचा वेग वाढवण्यासाठी या मॉनिटरमध्ये इन बिल्ट एआय एजंट प्रणाली देण्यात आली आहे. यामुळे कीबोर्ड किंवा माऊसला सतत स्पर्श न करता केवळ आवाजाच्या इशाऱ्यावर ईमेल पाठवणे, व्हर्च्युअल मिटिंग सुरू करणे, ब्राऊझरवर माहिती शोधणे किंवा एआय टूल्स चालवणे शक्य होते. जागतिक बाजारात हे क्रांतिकारी रोबोटिक उपकरण सुमारे २,४९९ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे २ लाख ३९ हजार रुपयांच्या आसपास आहे.