Cockroach Janta Party Protest | डिजिटल आंदोलन (Pudhari File Photo)
संपादकीय

Cockroach Janta Party Protest | डिजिटल आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

क्रॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) नीट व सीबीएसई परीक्षांच्या पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर दिवसभर धरणे धरले, निदर्शने केली, घोषणा दिल्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सीजेपीची कल्पनाच मुळात भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या टीपणीतून झाली. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या अभिजित दीपकेने सोशल मीडियावर सीजेपीची कल्पना मांडली व त्याला अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर तर सव्वा दोन कोटी फॉलोअर्स मिळाले. इन्स्टाग्राम किंवा एक्सवर स्थापन केलेल्या सीजेपीचे काय होणार, असा प्रश्न आजही अनेकांना आहे. अभिजित दीपके अमेरिकेहून शनिवारी सकाळी दिल्लीला आला.

दिल्ली विमानतळावरून तो थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यावर गेला आणि त्याने जंतर-मंतरवर धरणे धरण्याची परवानगी मागितली. दिल्ली पोलिसांनीही त्यांच्या संघटनेला धरणे कार्यक्रमासाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी काही तासांपुरती परवानगी दिली. गेल्या अनेक वर्षांत असे प्रथमच घडले असावे. सीजेपी हा काही नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. आगामी काळामध्ये ही संघटना राजकीय पक्ष म्हणून काम करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिजितने केवळ तीन प्रवक्ते जाहीर केले आहेत आणि ते तिघेही तरुण उच्चशिक्षित आहेत. हे प्रवक्ते आणि जंतर-मंतरवरील आंदोलन याशिवाय या संघटनेने सोशल मीडियातून त्यांचे सदस्य होण्यासाठीचे जे निकष जाहीर केलेत एवढेच सध्या समोर आलेले आहे; पण हे आंदोलन लक्षवेधी ठरले. सध्या पेपरफुटीमुळे पंचवीस लाख तरुणांचे भवितव्य अंधारात आहे, त्याचा संताप जंतर-मंतरवरील निदर्शनातून दिसून आला.

नीट व सीबीएसईच्या परीक्षा या प्रतिष्ठेचा मानल्या जातात. मग, सातत्याने पेपर का फुटतात, परीक्षा रद्द का होतात, पुन्हा पुन्हा परीक्षा देणे यातून विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण येतो, त्याचे काहीच मोल नाही का? पेपरफुटीनंतर आजवर कोणावर कठोर कारवाई झाली आहे? पेपर फुटीनंतर यंदा पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आजवर शिक्षा होऊन कोणीतरी तुरुंगात गेले आहे का? वारंवार पेपरफुटीच्या घटना होतात म्हणून सीजेपी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत आहे. जंतर-मंतरवरील एका दिवसाच्या धरणे आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही किंवा त्यांना राजीनामा द्या, असे कोणी सांगितलेले नाही. मग, पुढील आठवडाभरात तरी ते राजीनामा देतील कशावरून? पस्तीस वर्षांचा अभिजित हा मूळचा मराठवाड्यातील. पत्रकारितेचे शिक्षण पुण्यात घेतले व बोस्टन येथे पदवी मिळविण्यासाठी तो गेला. मध्यंतरी तो दोन वर्षे आम आदमी पक्षात जनसंपर्क विभागात काम करीत होता. त्यालाही एवढी अपेक्षा नव्हती की, सीजेपीच्या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळेल.

पेपरफुटी किंवा बेरोजगार तरुणांवर उच्चपदस्थांनी झुर‌ळ म्हणून टीकाटीपणी करणे याचा तरुणाईला राग येणे समजता येईल; पण इन्स्टाग्राम किंवा एक्ससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कोणत्या संघटनेची किंवा पक्षाची स्थापना कशी होऊ शकते? विशेष म्हणजे, कोणी कोणाला पाहिलेले नसताना लाखो तरुण सीजेपीला प्रतिसाद देतात, हेच मोठे आश्चर्य आहे. पाच आठवड्यांपूर्वी नीटचे पेपर फुटले, तीन आठवड्यापूर्वी सीबीएसईतील गैरकारभार समोर आला. सरन्यायाधीशांच्या टीकाटीपणीला काही आठवडे लोटले. त्यानंतर जंतर-मंतरवर सीजेपीच्या आंदोलनाला किती लोक जमतात, याचीच सर्वांना उत्सुकता होती. दिल्ली पोलिसांनी अभिजित जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरला तेव्हा त्याला ताब्यात घेतले नाही किंवा अटक केली नाही. त्याच्या हातात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुखपृष्ठ असलेल्या 'माय ऑटोबायोग्राफी' हे पुस्तक होते. ते पुस्तक उंचावतच अभिजित विमानतळावरून बाहेर आला. विमानतळावर आपल्या स्वागताला कोणी गर्दी करू नये, असे त्याने आवाहन केले होते. पोलिसांना सहकार्य करावे तसेच पोलिसांना फुले देऊन त्यांचे स्वागत करावे, असेही त्याने म्हटले होते. आपल्याला सरकारशी किंवा पोलिसांशी पंगा घ्यायचा नाही. हे त्याने स्पष्ट केले होते. जंतर-मंतरवर हजारो लोकांनी गर्दी केली होती. त्यातही सुशिक्षित तरुणांची संख्या प्रचंड होती. त्यांनी घोषणा दिल्या; पण आंदोलनात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी सीजेपी ठाम आहे, असे वारंवार सांगितले गेले. सीजेपीच्या आंदोलनाने विरोधी पक्षांना विशेषत काँग्रेस पक्षाला खूप आनंद झाला. हजारोंच्या संख्येने तरुणाई आंदोलनात उतरत आहे म्हणजे आपल्याला सरकार विरोधात नवे हत्यार मिळाले आहे, असा विरोधी नेत्यांचा समज झाला. जे आपण करू शकत नाही, ते सीजेपी करत आहे म्हणून काँग्रेस पक्ष खूश दिसला. देशात गेल्या बारा वर्षांत भाजपने जे अमर्याद यश मिळवले आहे, त्याचा हेवा विरोधी पक्षाला वाटतो आहे. मोदींची लोकप्रियता उत्तुंग आहे. २२ राज्यांत भाजपप्रणीत एनडीएची सत्ता आहे. सर्वसामान्य जनता व मतदार भाजपबरोबर आहे. प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्ष संपत आहे किंवा संकुचित होतो आहे. सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याची क्षमता आज कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाही. म्हणूनच सीजेपी जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देऊन टाकला.

सीजेपीने अजून तरी राजकीय पक्षांना दूर ठेवले आहे. कोणी राजकीय झेंडे आणू नयेत, अशी त्यांची सक्त ताकीद आहे, तरीही आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे दाखविण्याची स्पर्धा विरोधी पक्षांत दिसून आली. सीजेपीचे आंदोलन पोलिसांनी व सरकारने संवेदनशीलपणे हाताळले. पेपरफुटीची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येत असून आजवर १३ जणांना अटक झाली आहे. पेपरफुटीची पाळेमुळे खणून काढण्यात येत आहेत. नीट यंत्रणेतही काही बदल केले आहेत. शिक्षण व प्रशासनातील तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. सीजेपीचे आंदोलन हा केवळ पेपरफुटीविरोधातील संतापाचा उद्रेक आहे की नव्या राजकीय चळवळीची नांदी, हे येणारा काळच ठरवेल; मात्र या आंदोलनाने एक गोष्ट स्पष्ट केली, तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आता कोणत्याही सरकारला परवडणारे नाही. सोशल मीडियातून उभा राहिलेला हा आवाज किती काळ टिकतो आणि कोणती दिशा घेतो, याकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT