भारतामध्ये गेल्या काही वर्षांत नोंदवले गेलेले तापमान हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक राहिले आहे. सध्याचा उन्हाळा हा उपखंडातील आधुनिक नोंदींमधील सर्वात तीव आणि प्रदीर्घ उष्णतेच्या कालखंडांपैकी एक ठरणार आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वीच्या काळात तापमान वाढणे सामान्य असले, तरी यंदा भूप्रदेशावर स्थिर राहिलेल्या ‘अँटिसायक्लोन’मुळे निर्माण झालेल्या हवेच्या उच्च दाबामुळे उष्ण हवा एकाच ठिकाणी साचून राहिली. हवेची हालचाल मंदावल्याने जमीन अधिक प्रमाणात तापत चालली आहे. याशिवाय मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने जमिनीतील ओलावा संपला असून कोरडे वातावरण उष्णता अधिक वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. मानवी सहनशीलतेच्या मर्यादांची कसोटी लावणारा असा उन्हाळा गेल्या 50-60 वर्षांमध्ये अनुभवास आलेला नाही. नवतपा म्हणजेच उन्हाळ्यातील सर्वाधिक नऊ उष्ण दिवस असतात. 25 मेपासून सुरू झालेला नवतपा 2 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात सूर्य पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे तीव सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांनी टोक गाठलेले असते. उत्तर व पश्चिम भारतात या कालावधीत कमाल तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. यंदाच्या वर्षी अल निनो सक्रिय झाल्यामुळे 2026 आणि 2027 ही वर्षे आजवरची सर्वात उष्ण वर्षे ठरण्याचा अंदाज असून, यातील कोणतेही एक वर्ष सर्वोच्च तापमानाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटेची तीवता सुमारे 2 अंश सेल्सिअसने अधिक वाढली. जगातील सर्वाधिक उष्ण 50 शहरांच्या यादीमध्ये सर्व शहरे भारतातील होती. 25 मे रोजी महाराष्ट्रातील बह्मपुरीमधील तापमान 47.6 अंशांंवर पोहोचले. विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये याच समकक्ष तापमान आहे. राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या भारताच्या मुख्य उष्णता क्षेत्रामध्ये (कोअर हीटवेव्ह झोन) उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि कालावधी वाढला आहे. काही विशिष्ट क्षेत्रांत हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 8 अंशांनी जास्त आहे. राजस्थान आणि पाकिस्तानच्या वाळवंटी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 48 तासांत आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला. हे सर्व उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. पशुपक्ष्यांना, गुराढोरांनाही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात भीषण उष्णतेमुळे 600 वटवाघळांचा मृत्यू झाला. तीव उष्णतेमुळे आणि पाण्याअभावामुळे पक्षी हवेतून थेट खाली कोसळत आहेत. अनेक गरूड आणि कबुतरे बेशुद्ध अवस्थेत रस्त्यांवर आढळत असून भटक्या प्राण्यांमध्ये पोटाचे विकार आणि संसर्ग वाढले आहेत. महाराष्ट्रातील शेती आणि ग््राामीण अर्थव्यवस्था उष्णतेमुळे कोलमडली आहे. आंबे अकाली गळणे आणि उन्हामुळे डाग पडणे यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. टोमॅटो, मिरची, वांगी आणि कोबी या पिकांची फुले गळत असून, त्यांची गुणवत्ता खालावली आहे. उष्णतेमुळे गायी आणि म्हशींचा चारा खाण्याचा वेग मंदावल्याने दूध उत्पादनात घट झाली आहे. कुक्कुटपालन व्यवसायात कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ओडिशा आणि तेलंगणामध्ये उष्माघातामुळे 32 हून अधिक मृत्यू झाले. ‘द लॅन्सेट’ आणि इतर नामांकित वैद्यकीय नियतकालिकांमधील संशोधनानुसार, भारतात केवळ थेट उष्माघाताने मरणारे लोक कमी असतात; परंतु उष्णतेच्या लाटेमुळे हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार यांसारखे जुने आजार बळावून दगावणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. संयुक्त राष्ट्राच्या विविध पर्यावरण अहवालांनुसार, जागतिक स्तरावर हवामान बदलामुळे सर्वात जास्त मृत्यू घडवून आणणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ‘अतिउष्णता’ अग््रास्थानी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2000 ते 2019 या दोन दशकांत जगात दरवर्षी सरासरी 4,89,000 लोकांचा मृत्यू उष्णतेशी संबंधित कारणांमुळे झाला. यापैकी 45 टक्के मृत्यू एकट्या आशिया खंडात झाले.
गेल्या एका दशकात भारतातील उष्ण आणि दमट दिवसांची संख्या 14,086 वरून 16,970 इतकी वाढली आहे. भारतातील सरासरी आर्द्रतेचे प्रमाण 2015-2019 या काळातील 67.1 टक्क्यांवरून वाढून 71.2 टक्के झाले आहे. रात्रीच्या सरासरी तापमानात प्रतिदशक सुमारे 0.21 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षीही अनेक शहरांमध्ये रात्रीचे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. यामुळे दिवसाच्या उष्णतेतून सावरण्यासाठी आवश्यक असणारा थंड वेळ मिळेनासा झाला आहे. शहरांमध्ये काँक्रीट रात्रभर उष्णता सोडते. यामुळे रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा 5-7 अंश जास्त राहते. ग््राामीण भागातील माती आणि झाडे उष्णता परावर्तित करतात किंवा बाष्पीभवनाद्वारे वातावरण थंड ठेवतात. याउलट शहरांमधील बांधकामे ही उष्णता रात्री वातावरणात सोडू लागतात. शहरांमध्ये वाहनांची प्रचंड संख्या, कारखान्यांमधून निघणारा धूर आणि कोट्यवधी घरांमध्ये रात्रंदिवस चालणारे एसी तापमानवाढीत लक्षणीय भर घालत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, पूर्वीच्या दशकांच्या तुलनेत सध्या पृथ्वी सुमारे 2 अंश सेल्सिअसनी अधिक तापली आहे. या तीव उष्णतेचा फटका देशातील सुमारे 4 कोटी 40 लाख लोकांना बसला असून, यामुळे सुमारे 341 अब्ज डॉलर्सच्या आर्थिक व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घरातील तापमान 24 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू नये. कारण, त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि झोपेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही काळजीचा आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत भारतात उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटांच्या तीवतेत आणि वारंवारतेमध्ये 300 ते 400 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची भीती आहे. म्हणजेच आज आपण ज्या सुख-सुविधांनी समृद्ध असलेल्या जीवनशैलीला यशाचे शिखर मानत आहोत, तेच वास्तव उद्याच्या पिढ्यांसाठी बिकट स्थिती निर्माण करणारे ठरणार आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. विकासामागे धावताना वृक्ष लागवड, वन क्षेत्रवाढ, निसर्ग संवर्धनाला गतिमानता आणि प्राधान्य दिल्यास उंबरठ्यावर असलेला हाहाकार टाळता येईल.