उष्णतेच्या लाटा आणि समुद्रामध्ये उंच लाटा येऊ शकतात, असा अहवाल एस. एस. सिंग क्लायमेट चेंज रिझिलियन्स इन सेंट्रल इंडिया अॅग्रिकल्चर यांच्या रिसर्चमधून समोर आला आहे. यातून निसर्गरम्य कोकणच्या पर्यावरणीय असमतोलातून निर्माण झालेल्या स्थितीचे चित्र समोर आले आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणातील चार जिल्ह्यांमध्ये पर्यावरणीय र्हासामुळे ही स्थिती उद्भवू शकते.
सध्या होणारे पर्यावरणीय बदल, यामुळे चार जिल्ह्यांत दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा असे पर्यावरणीय बदल संभवतात, असे निष्कर्ष संशोधकांनी शोधनिबंधात मांडले आहेत. हा अहवाल आपण किती गांभीर्याने घेणार आहोत, काय उपाययोजना करणार आहोत, यावर या प्रदेशांचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.
कोकणची निर्मिती परशुरामाने समुद्र हटवून केली, असा पुरातन इतिहास सांगितला जातो. एका बाजूला पश्चिम घाट आणि दुसर्या बाजूला विशाल अरबी समुद्र अशा चिंचोळ्या पट्टीत उभे असलेले कोकण निसर्गरम्य प्रदेशांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर असा भाग यात समाविष्ट आहे. यावर्षी अवेळी आलेल्या पावसामुळे 40 टक्के उन्हाळी शेती नष्ट झाली. हातातोंडाशी आलेली बाग पाण्यात वाहून गेली. पिकाखालील क्षेत्राला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले. वातावरण बदलाचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत असला, तरी कोकणात आंबा, काजू, कोकम, मसाल्याचे पदार्थ, नारळी, पोफळी अशा बागायत शेतीमधून शेतकर्यांना उत्पन्न मिळते तसेच भातशेतीतून मोठे उत्पन्न मिळते.
वाडा कोलम, वालय वरंगळ अशा चविष्ट भाताच्या जाती या भागात प्रसिद्ध आहेत. कोकणातील बदलापूरचे जांभूळ, अलिबागचा पांढरा कांदा, देवगड-रत्नागिरीचा हापूस, सिंधुदुर्गचा काजू अशा पिकांना राष्ट्रीय मानांकनही मिळाले आहे. मात्र, सद्य:स्थितीत बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता इथल्या पिकांमध्ये नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करून नवी पीकरचना तयार करणे आवश्यक आहे. यामध्ये अतिवृष्टी तापमानवाढ किंवा दुष्काळासारख्या घटनांसाठी त्या पिकाची प्रतिकारक्षमता अधिक असणे आवश्यक असते; परंतु सध्याची पीकरचना ही या द़ृष्टीने सक्षम नसल्याचे चित्र संशोधनातून पुढे आले आहे. ‘रिजिनल इंडिकेटर बेस्ड अॅप्रोच अॅन्ड अॅग्रो क्लायमेट झोन मॅपिंग’ हा शोधनिबंध ‘इंटरनॅशनल जनरल ऑफ एन्रॉलमेंट अॅन्ड क्लायमेट चेंज’ या संशोधनात्मक पुस्तकात मांडण्यात आला आहे.
कोकणात प्रामुख्याने किनारपट्टी भागात वातावरणीय द़ृष्टिकोनातून होणारे बदल तिथल्या व्यवस्थेने स्वीकारलेले नाहीत. याचा परिणाम जीवसृष्टीवर आणि इथल्या पिकांवर होताना दिसत आहेत. प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन सुरू झाल्याने एका बाजूला पर्यावरणीय र्हास होत आहे, तर दुसर्या बाजूला वाढते विकास प्रकल्पही पर्यावरणीय र्हासाचे कारण ठरले आहेत. यामुळे कोकणला ही धोक्याची घंटा सतावू लागली आहे. जगभरात सध्या वाढत्या तापमानवाढीचे मोठे दुष्परिणाम होत आहे. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर तर होत आहेच, तसेच अन्य पशू-पक्षी यांच्यावरही पाहायला मिळत आहे. वाढती तापमान वाढ रोखण्यासाठी जगभरात अनेक परिषदा होत असून, यावर उपाययोजना सूचवल्या जात आहेत; पण त्याची कृतिशील अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे. वेळीच, या धोक्याच्या घंटेचा आवाज ऐकून त्यावर कायमस्वरूपी उपायोजना करणे आवश्यक आहे.