सुमारे दोन हजार वर्षांची परंपरा असलेला हा सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ‘ख्राईस्ट मास’ अर्थात ख्रिस्तजन्मानिमित्त केली जाणारी सामूहिक प्रार्थना म्हणजेच ख्रिसमस होय. ही प्रार्थना अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. प्रसंगी रक्त सांडून प्रेमभावना, जिव्हाळा जोपासण्याचा संदेश देणारा हा सण होय. आज नाताळ त्यानिमित्ताने..!
विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उत्सव-सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ख्रिस्ती धर्मीयांचा नाताळ अर्थात ख्रिसमस हा वर्षातील मोठा सण आहे. ख्रिस्ती समाजात तुलनेने खूपच कमी सण साजरे केले जातात. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा नाताळ आणि त्याच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ईस्टर हे दोन महत्त्वाचे सण होत. नाताळ हा प्रेमाचा संदेश देणारा सण आहे. संत युहान्ना यांनी लिहिले आहे, ‘परमेश्वराने जगावर एवढे प्रेम केले की, आपला लाडका पुत्र जगाला दिला. जेणेकरून त्याच्यावर जो विश्वास ठेवेल त्याचा नाश तर होणार नाहीच; उलट आत्यंतिक आनंदाची प्राप्ती त्याला होईल.’ नाताळ हा ईश्वराचे अनंत प्रेम, आनंद आणि उद्धाराची साक्ष देणारा आनंदसोहळा आहे. दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तेव्हापासून तो साजरा केला जात आहे.
सांख्यिकी तज्ज्ञांच्या आकडेवारीनुसार, जगाच्या 600 कोटी लोकसंख्येच्या एकतृतीयांश लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. यातील 60 टक्के लोक रोमन कॅथॉलिक, तर 40 टक्के प्रोटेस्टंट समुदायाचे आहेत. भारताच्या काही भागांत ख्रिस्ती समुदाय पहिल्या शतकापासून अस्तित्वात आहे. चेन्नईनजीक मईलापूर शहरात येशूच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे संत थॉमस यांची कबर आहे आणि आजही अनेक यात्रेकरू तिच्या दर्शनासाठी जगभरातून येतात. ईश्वराचा प्रेषित असणार्या येशूने क्रुसावर प्राण त्यागून ईश्वराचे असीम प्रेम प्रकट केले. या प्रेमाने प्रेरित होऊन लाखो लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि येशूच्या प्रेमाचा आणि शुभवार्तेचा संदेश प्रसृत करणे हेच आपले जीवितकार्य मानले. त्यासाठी प्रसंगी बलिदानही दिले. ‘प्रेम धैर्यवान आणि कृपाळू असते. प्रेम कधीही बढाया मारत नाही आणि गर्व करत नाही,’ असे संत पोलूस यांनी लिहिले आहे. पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 6 जानेवारी हा मानला जात असे. साडेसोळाशे वर्षांपूर्वी पोप यांनी 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस मानावा, असे निर्देश दिले. तेव्हापासून 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
24 आणि 25 डिसेंबरच्या मधील रात्र म्हणजे ख्रिसमसचा अपूर्व सोहळा साजरा करण्याची रात्र. ख्रिसमस ट्री दिव्यांनी सजविले जातात. लोक एकमेकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा देतात. घरेदारे तोरणांनी आणि रोषणाईने सजविली जातात. प्रसाद ग्रहण केला जातो. पूर्वी ख्रिसमस ट्री फक्त जर्मनीत होते. आता ते जगभर दिसतात. ख्रिसमसच्या वेळी कॅरोल्सचा समावेश सर्वप्रथम बि—टनमध्ये झाला, तर आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली, असे मानले जाते. ख्रिसमस कार्ड 1846 मध्ये प्रथम तयार केल्याचा उल्लेख आढळतो, तर 1868 मध्ये सांताक्लॉजचा उल्लेख सर्वप्रथम झाल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या वेळी लहान मुले आपला मोजा घराबाहेर अडकवून ठेवतात आणि सांताक्लॉज त्यात भेटवस्तू टाकून जातो, अशी ही परंपरा आहे. प्रेमाची देवाण-घेवाण करण्याचा हा दिवस आहे. निगर्वी प्रेम कधीच नष्ट होत नाही, असा या सणाचा संदेश आहे. प्रेमाची भावना जोपासल्यास सर्व पूर्वग्रह नष्ट होतील आणि सर्वप्रकारची हिंसा, दहशत या जगातून संपुष्टात येईल, असा आशावाद जागवणारा ख्रिसमसचा हा सण असून, जो धर्म प्रेमभावना वृद्धिंगत करू शकत नाही, तो धर्मच नष्ट होईल, असेही हा सण आपल्याला सांगतो. मानवजातीच्या उद्धारासाठी ईश्वराने केलेल्या कृपेची आठवण करून देण्याचा सण म्हणजे नाताळ! बायबलमध्ये त्यागाचा उल्लेख अनेकदा आढळतो. देहत्यागाचाही त्यात समावेश आहे.