विस्तारवादी, आक्रमक आणि अत्यंत धोकादायक देश अशी ओळख असलेल्या चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य हा चिंतेचा विषय बनला होताच, अणुऊर्जा विकास आणि नव्याने तैनात केलेली क्षेपणास्त्रे यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास काही दिवस बाकी असतानाच भविष्यकाळासाठी आम्ही सज्ज होत आहोत, अशी घोषणा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली होती. आता अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीनची लष्करी सामर्थ्य वाढवण्याची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे.
आण्विक शस्त्रे नियंत्रित करण्याबाबत वाटाघाटी करण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य नाही. या देशाने कोणालाही पत्ता लागू न देता आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे अज्ञातस्थळी तैनात केली आहेत. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ही एक रॉकेटचलित शस्त्र प्रणाली आहे. रॉकेटच्या साह्याने क्षेपणास्त्र प्रचंड गतीने वातावरणाच्या वरच्या थरात जाते. नंतर गुरुत्वाकर्षण व हवेच्या कक्षीय यांत्रिकी तत्त्वांनुसार, एका उंच कमानीच्या मार्गाने ते लक्ष्याचा भेद घेते. ते दूरवरचे लक्ष्य भेदू शकते आणि अणुबॉम्बही वाहून नेऊ शकते. हे क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मार्गदर्शित केले जाते. त्यानंतरचा त्याचा मार्ग हा पूर्वनिश्चित असतो आणि मग ते लक्ष्यावर बॉम्ब टाकते. ‘पेंटागॉन’ने चीनच्या अज्ञात स्थळावरील लष्करी हालचालींबाबत यापूर्वीच माहिती दिली होती; मात्र त्यावेळी तैनात क्षेपणास्त्रांबाबत कोणतीही आकडेवारी दिली नव्हती.
आता मात्र ही क्षेपणास्त्रे मंगोलियाच्या सीमेजवळ तैनात केल्याचे समोर आले. आण्विक शस्त्रांनी संपन्न देशांच्या तुलनेत चीन शस्त्रांचा साठा आणि त्यांचे आधुनिकीकरण अधिक वेगाने करत आहे. वास्तविक अण्वस्त्रसज्ज देशांनी जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असून, शस्त्र नियंत्रण अथवा निःशस्त्रीकरण याबाबतच्या जागतिक अथवा उभयपक्षी वाटाघाटींमध्ये सहभाग घेतला पाहिजे; परंतु चीन हा देश याबाबत कोणालाही जुमानत नाही. या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य काय आहे, हे चीनने स्पष्ट केलेले नाही. अण्वस्त्र निर्बंधांबाबत चीनशी चर्चा करू, असे ट्रम्प यांनी म्हटले असले, तरी त्यांच्या शब्दावर कोणाचाच विश्वास नाही.
चीनकडे 600 पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत आणि येत्या पाच वर्षांत ही संख्या हजारावर जाईल. यातील बहुतेक अण्वस्त्रे तत्काळ वापरासाठी सज्ज असतील. चीन हा पाकिस्तान आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी मदत करत आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांकडे प्रत्येकी 170च्या आसपास अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तान दिवाळखोर बनला असला, तरीदेखील चीनकडून भीक मागून, तो विनाशकारी शस्त्रे खरेदी करत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून जगातील दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला पाठबळ पुरवायचे, ही चीनची दुहेरी नीती.
अणुशक्तीपासून अण्वस्त्रेही विकसित करता येतात आणि अणुऊर्जादेखील तयार करता येते. चीनने स्वच्छ आणि सुरक्षित अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानात मोठे यश मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी चीनने जगातील पहिली थोरियमवर चालणारी अणुभट्टी यशस्वीरीत्या लाँच केली. अणुऊर्जेसाठी थोरियम वापरण्याच्या जागतिक स्पर्धेत देशाने मोठी आघाडी मिळवली. गांसू प्रांतातील वुई शहरातील गोबी वाळवंटात थोरियम मोल्टन सॉल्ट रिअॅक्टर प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यात आतापर्यंत 44 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा प्रकल्प थोरियमवर आधारित अणुऊर्जेचा जगातील पहिला प्रकल्प. 2030 पर्यंत चीन अशा दहा अणुभट्ट्या उभारणार आहे. चिनी शास्त्रज्ञांनी कार्यान्वित असलेल्या थोरियम मोल्टन सॉल्ट अणुभट्टीत यशस्वीरीत्या नवीन इंधन टाकले आहे. त्यामुळे ही जगातील एकमेव चालू असलेली थोरियम अणुभट्टी मानली जाते. कमी किरणोत्सर्गी कचरा, वापरण्यास सुरक्षित, वितळण्याचे धोके कमी हे थोरियमचे विविध फायदे. भविष्यातील ऊर्जा प्रणालींसाठी ते एक उत्तम पर्याय ठरू शकते. चीनने या प्रकल्पात पुढाकार घेतला असला, तरी भारत अनेक दशकांपासून थोरियम संशोधनात आघाडीवर आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्रामध्ये भारताने गेल्यावर्षी पहिल्यांदाच ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एन्ट्री व्हिइकल’ (एमआरआयव्ही) तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणी यशस्वी केली होती. या यशामुळे भारताच्या अण्वस्त्र सज्जतेला आणि न्युक्लियर ट्रायड किंवा अण्वस्त्र प्रक्षेपक त्रिकूट यास अधिक बळ मिळाले आहे. भारताने सर्वप्रथम 1974 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेत, आण्विक क्षमता सिद्ध केली आणि तिला ‘स्मायलिंग बुद्ध’ असे नाव देण्यात आले. 1998 मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाच आण्विक चाचण्या पोखरण येथेच केल्या गेल्या.
आण्विक क्षमतेचा शांततेसाठी वापर, हेच उद्दिष्ट भारताने यामधून अधोरेखित केले. अण्वस्त्र प्रक्षेपणाची क्षमता सिद्ध करण्यासाठी स्ट्रॅटेजिक बॉम्बर, लांब पल्ल्याची आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि पाणबुड्यांच्या साह्याने प्रक्षेपित करत येणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे या तीन गोष्टींची आवश्यकता असते. ‘एमआरआयव्ही’ तंत्रज्ञान जमिनीवरून मारा करता येणार्या क्षेपणास्त्र प्रणालींशी निगडित असणारे तंत्रज्ञान आहे. त्याच्या माध्यमातून एकाच क्षेपणास्त्राद्वारे विविध लक्ष्यांवर एकसमयी शस्त्रमारा करता येतो. या तंत्रज्ञानाचा सर्वात पहिला वापर अमेरिकेने ‘मिनिटमन-3’ या क्षेपणास्त्रात केला होता. यावरूनच पुढे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीत क्रांती घडली आणि सैन्यदलांचे सामर्थ्यदेखील वाढले.
अमेरिका, ब्रिटन, चीन आणि रशिया हे देश क्षेपणास्त्रांमध्ये ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान वापरत आहेत. पाकिस्ताननेही 2017 मध्ये हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला होता. डीआरडीओने दि. 19 एप्रिल 2012 रोजी पहिल्यांदा अग्नी-5 या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. पाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता या क्षेपणास्त्राकडे आहे; मात्र भारत आणि चीन यांच्यात मूलभूत फरक असा की, भारत हा शांततावादी देश आहे, उलट चीनने उत्तर कोरिया, पाकिस्तान या युद्धखोर देशांनाही अण्वस्त्रसाह्य करण्याचा उपद्व्याप केला आहे. म्हणूनच चीनबाबत भारताला नेहमीच सावधगिरी बाळगून सदैव दक्ष राहावे लागणार आहे.