China Propaganda | चीनचे कुटिल माहिती युद्ध 
संपादकीय

China Propaganda | चीनचे कुटिल माहिती युद्ध

पुढारी वृत्तसेवा

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

बांगला देशातील अस्वच्छ वस्त्यांचे चित्रीकरण करून ती नवी दिल्लीची दृश्ये असल्याचे भासवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा उद्योग चीनकडून सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि कूटनीतीत प्रतिस्पर्धी राष्ट्राची प्रतिमा मलीन करण्यासाठी माहिती युद्धाचा वापर होणे काही नवे नाही. परंतु, अलीकडच्या काळात चीनने या माहिती युद्धाची पातळी इतकी खाली नेली आहे की, ती केवळ अनैतिकच नव्हे तर हास्यास्पदही ठरत आहे. बांगला देशची राजधानी ढाका येथील झोपडपट्ट्या, अस्वच्छ गल्ल्या आणि गटारे यांचे चित्रीकरण करून ती नवी दिल्लीची दृश्ये असल्याचे भासवण्याचा जो उद्योग चिनी समाजमाध्यम प्रभावकांनी ( इनफ्ल्युएन्सर) सुरू केला आहे, तो चीनच्या वैफल्याचे आणि असुरक्षिततेचेच द्योतक आहे, असे म्हणावे लागेल. बांगला देशातील आघाडीचे वृत्तपत्र ‌’प्रोथोम आलो‌’ याने या संपूर्ण कारस्थानाचा पर्दाफाश केल्यानंतर जागतिक स्तरावर चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भारतविरोधी प्रचारकी मोहीम राबवण्यासाठी तिसऱ्या देशाच्या भूमीचा आणि तेथील गरिबीचा वापर करण्याची ही चिनी क्लृप्ती अत्यंत कुटिल, संधिसाधू आणि तीव्र निषेधार्ह आहे.

ढाका शहरातील उत्तरा सेक्टर बारा आणि टेकपाडा यांसारख्या दाट लोकवस्तीच्या व गरीब भागांत सध्या दीडशेहून अधिक चिनी व्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्स सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. हे लोक हातात दोन भ्रमणध्वनी घेऊन गल्लीबोळांत संशयास्पदरीत्या फिरतात. एका भ्रमणध्वनीवरून थेट प्रक्षेपण सुरू असते, तर दुसऱ्या भ्रमणध्वनीच्या पडद्यावर लिहिलेली संहिता वाचून ते चिनी भाषेत भारताविरुद्ध गरळ ओकतात. स्थानिक दुकानदारांना ५०० ते १००० टकांचे आमिष दाखवून त्यांच्या दुकानांत भारतीय बनावटीच्या दैनंदिन वापरातील वस्तू ठेवल्या जातात. आधी या वस्तू दाखवून हा नवी दिल्लीचा बाजार असल्याचे भासवले जाते आणि लगेचच लगतच्या कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे व अस्वच्छता दाखवून भारताची राजधानी कशी बकाल व अविकसित आहे, असे चित्र रंगवले जाते. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर या वस्तू तिथेच सोडून दिल्या जातात, जेणेकरून दुसरा एखादा चिनी नागरिक येऊन पुन्हा त्याच वस्तूंचा वापर करून नवी चित्रफीत तयार करू शकेल. वीचॅट, टिकटॉक आणि वीबो या चिनी समाजमाध्यमांवर अशा शेकडो चित्रफितींचा पूर आला आहे. विशेषतः नोव्हेंबर २०२४ पासून या मोहिमेला वेग आला असून, त्यामागे एक सुनियोजित व संघटित यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट दिसते.

या संपूर्ण प्रकरणामागील चीनचा कुटिल हेतू समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या दशकभरात भारताने आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक आणि सामरिक क्षेत्रांत जी झेप घेतली आहे, ती चीनच्या डोळ्यांत प्रचंड खुपणारी आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताचे वाढते महत्त्व, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे चीनमधून भारतात होणारे स्थलांतर, देशांतर्गत पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास आणि जागतिक व्यासपीठांवर भारताला मिळणारा सन्मान यामुळे चीनची अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, चीनची स्वतःची अर्थव्यवस्था गंभीर मंदीच्या गर्तेत अडकली असून स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कोसळलेले व्यवहार, वाढती देशांतर्गत बेरोजगारी आणि तरुणांमधील असंतोषामुळे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या नागरिकांना आशिया खंडात केवळ चीनचाच विकास झाला असून भारत अत्यंत मागासलेला, गरीब आणि अस्वच्छ देश आहे, हे दाखवून देण्याची गरज चिनी साम्यवादी पक्षाला भासत आहे. भारताचा विकास हा केवळ दिखावा आहे आणि प्रत्यक्षात तिथे प्रचंड दारिद्र्य, अस्वच्छता आहे, असा आभास निर्माण करून चिनी जनतेचे लक्ष देशांतर्गत समस्यांवरून विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

ढाक्याच्या गल्ल्यांत फिरणारे हे लोक फक्त समाजमाध्यम प्रभावक किंवा हौशी पर्यटक नसून, ते चिनी गुप्तचर यंत्रणेचे प्यादे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाच प्रकारचे चित्रीकरण महिनोन्‌महिने सुरू राहणे, त्यासाठी भारतीय उत्पादने जाणीवपूर्वक बाळगणे, स्थानिक भाषा येत नसताना भाषांतर उपयोजनांचा वापर करून व्यवहार करणे आणि विरोध करणाऱ्या स्थानिकांना पैसे देऊन गप्प करणे, हे सर्व एखाद्या सामान्य प्रवाशाच्या आवाक्याबाहेरचे आहे. चीन सरकारचा छुपा पाठिंबा, मार्गदर्शन आणि निधी असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण भारतात जाऊ शकत नाही, म्हणून बांगला देशात जाहिरातींचे चित्रीकरण करत आहोत, अशी लंगडी सबब हे चिनी नागरिक स्थानिकांना देत आहेत. परंतु, त्यांच्या कृतीतून त्यांचा खरा भारतविरोधी अजेंडा आणि दक्षिण आशियातील अन्य राष्ट्रांबद्दलचा तुच्छतावाद लपून राहिलेला नाही.

या प्रकारामुळे बांगला देशातील सामान्य नागरिकही प्रचंड संतापले आहेत. सुरुवातीला किरकोळ पैशांच्या मोबदल्यात सहकार्य करणाऱ्या स्थानिकांना जेव्हा यामागील कारस्थान समजले, तेव्हा त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. हे चिनी नागरिक केवळ रस्त्यावर चित्रीकरण करून थांबले नाहीत; तर स्थानिकांच्या घरांत विनापरवाना घुसून ते काय खातात, काय परिधान करतात याचेही चित्रीकरण करू लागले. हा प्रकार स्थानिकांच्या खासगीपणावर घाला घालणारा होता. शिवाय, आपल्या देशाच्या गरिबीचा वापर करून दुसऱ्या देशाची बदनामी करणे ही बाब बांगला देशच्या स्वाभिमानाला आणि सार्वभौमत्वालाही धक्का लावणारी आहे. ढाका पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित चिनी नागरिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत सरकारची या सर्व बनावट चित्रफितींवर बारीक नजर असून, चीन आणि बांगला देश या दोन्ही देशांकडे हा मुद्दा अधिकृतपणे आणि कठोर शब्दांत उपस्थित करण्यात आला आहे.

बांगला देशातील माध्यमांनीच चीनचे हे बिंग फोडल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची मोठी नाचक्की झाली आहे. एकीकडे स्वतःला जबाबदार महासत्ता म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे समाजमाध्यमांवर खोट्या चित्रफिती पसरवून शेजारील देशाची बदनामी करायची, हा चीनचा दुटप्पीपणा जगासमोर उघड झाला आहे. भारताची प्रगती ही कोणाच्या खोट्या चित्रफितींमुळे किंवा अपप्रचारामुळे थांबणारी नाही. जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान भक्कम केले आहे आणि लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याच्या तयारीत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी यान उतरवण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी डिजिटल पेमेंट क्रांतीपर्यंत भारताने अनेक क्षेत्रांत स्वतंत्र मोहोर उमटवली आहे. भारताची ही भक्कम वस्तुस्थिती चीनच्या बनावट चित्रफितींनी तसूभरही बदलणार नाही. मात्र, भारताने आणि दक्षिण आशियातील शेजारील राष्ट्रांनी सावध होण्याची नितांत गरज आहे. चीनचे माहिती युद्ध हे केवळ सीमेवरील संघर्षापुरते मर्यादित नसून ते सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावरही अत्यंत सूक्ष्मपणे लढले जात आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये परस्परांविषयी अविश्वास निर्माण करणे, प्रादेशिक ऐक्य कमकुवत करणे आणि भारताची प्रतिमा डागाळणे, हे चीनचे दीर्घकालीन धोरण आहे. या छद्मयुद्धाला तोंड देण्यासाठी भारतानेही आपली आंतरराष्ट्रीय संवाद यंत्रणा आणि माहिती तंत्रज्ञान आघाडी अधिक सक्षम करायला हवी. चिनी बनावट प्रचाराचा तत्काळ प्रतिवाद करणारी व्यवस्था उभारणे काळाची गरज आहे. बांगला देशसारख्या शेजारील देशांनी आपल्या भूमीचा वापर अशा भारतविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT