बालदिन आणि मुलांना ऐकणारा समाज (Pudhari File Photo)
संपादकीय

Children's Day | बालदिन आणि मुलांना ऐकणारा समाज

चाचा नेहरूंनी म्हटलं होतं, ‘मुलं ही जिवंत फुलं आहेत’; पण ही फुलं फुलायची असतील, तर त्यांना प्रेमासोबत ऐकण्याचं पाणीही द्यावं लागेल.

पुढारी वृत्तसेवा

चाचा नेहरूंनी म्हटलं होतं, ‘मुलं ही जिवंत फुलं आहेत’; पण ही फुलं फुलायची असतील, तर त्यांना प्रेमासोबत ऐकण्याचं पाणीही द्यावं लागेल. खर्‍याअर्थाने बालदिन साजरा करावयाचा असेल, तर आजच्या काळात गरज आहे ती मुलांना ऐकणारा समाज घडविण्याची!

संभाजी लव्हटे

दरवर्षी 14 नोव्हेंबरला देशभरात रंगीत फुगे, मिठाई, गाणी, नृत्य आणि हशा यांच्या रूपात बालदिन साजरा केला जातो. शाळांची प्रांगणे फुलून जातात. मुलांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं; पण त्या हसर्‍या चेहर्‍यांच्या मागे अनेकदा काही आवाज असतात, ते आवाज आहेत अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांचे, न ऐकलेल्या प्रश्नांचे आणि न मांडता आलेल्या स्वप्नांचे. बालदिन म्हणजे फक्त सण नाही, तो चिंतनाचा दिवस आहे. आपण आपल्या मुलांचं खरंच ऐकतो का? त्यांना बोलू देतो का? त्यांच्या डोळ्यांतील प्रश्न समजून घेतो का?

भारतात 14 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर अतोनात प्रेम होतं. ते नेहमी म्हणायचे, ‘आजची मुले उद्याचा भारत घडवतील’. त्यांच्या निधनानंतर 1964 मध्ये भारत सरकारने ठरवलं की, त्यांच्या जयंतीला ‘बालदिन’ म्हणून साजरा करायचा. त्याआधी भारतात बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असे. कारण, तो दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेल्या ‘वर्ल्ड चिल्ड्रन्स डे’शी सुसंगत होता; पण भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 14 नोव्हेंबर-बालदिन- चाचा नेहरूंच्या मुलांप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून.

बालदिनाच्या निमित्ताने आपण जेव्हा ‘मुलांना ऐकणार्‍या समाजाची’ कल्पना करतो तेव्हा मुलांना ऐकणारा समाज म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवं. मुलांना ऐकणारा समाज म्हणजे फक्त त्यांचे बोलणे ऐकणे नव्हे, तर त्यांच्या भावना, कल्पना आणि स्वप्नांना महत्त्व देणारा समाज अपेक्षित आहे. आपण त्यांना नेहमी शिकवतो; पण त्यांच्याकडून शिकतो का? आपण त्यांना बोलतो, आदेश देतो, पण ऐकतो का? मुलांना ऐकण म्हणजे होयं, ‘तुझं मत महत्त्वाचं आहे’ अस सांगणं. मुलं बोलतात; पण केवळ शब्दांत नाही, तर त्यांच्या नजरेत, खेळात आणि शांततेतही ती आपल्याला काही सांगतात. जो समाज हे ओळखतो, तोच खर्‍याअर्थाने प्रगत होतो.

मी प्राथमिक शिक्षक म्हणून अनेक वर्षे काम करतोय. दररोज माझ्या वर्गात मी शेकडो निरागस चेहरे पाहतो. काही उत्साही, काही घाबरलेले, काही दडपलेले. दररोज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, बर्‍याचदा पालकांची स्वप्नं मुलांच्या खांद्यांवर जड ओझी बनून राहतात. मला तो प्रसंग अजून आठवतो. चौथीतला एक विद्यार्थी अभ्यासात थोडा मागे होता. त्याचे पालक नेहमी म्हणायचे, ‘तो पहिल्या तीन मध्ये आला नाही, तर मला लाज वाटते’. तो विद्यार्थी एकदा मला म्हणाला, ‘सर, आई मला घरी खेळू देत नाही. ती म्हणते अभ्यासच आयुष्य आहे.’ त्या क्षणी मला जाणवलं, आपण मुलांना उंच भरारी शिकवतो; पण उडायला पंख देत नाही. अजून एक प्रसंग, वर्गात एक मुलगी गप्प, शांत आणि काहीतरी दडपणाखाली असल्यासारखी भयभीत असायची. मी तिला विचारलं, ‘तू एवढी गप्प का असतेस?’ ती म्हणाली, ‘सर, घरी मी बोलले तर बाबा म्हणतात, तुझं काम आहे फक्त ऐकायचं.’ त्या क्षणी मला जाणवलं बालहक्क म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, स्वतःचं मत मांडण्याचाही अधिकार आहे.

मी शालेय स्पर्धात्मक परीक्षांची मुलांकडून तयारी करून घेतो; पण मी कधीच मुलांवर ताण, भीती किंवा ओझं निर्माण केलं नाही. माझं स्पष्ट मत आहे, स्पर्धा म्हणजे संघर्ष नव्हे. ती आनंदाने घेतलेली संधी आहे. माझ्या मते, बालहक्क म्हणजे फक्त ‘शिक्षणाचा अधिकार’ नाही, तर आनंदाने शिकण्याचाही अधिकार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT