संपादकीय

बालमजुरीचे व्हावे समूळ उच्चाटन

Arun Patil

[author title="डॉ. जयदेवी पवार" image="http://"][/author]

बालमजुरीची समस्या केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आहे. गरिबीमुळे या मुलांना काम करावे लागते, असा युक्तिवाद पूर्वी केला जात होता; मात्र नव्या संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, गरिबीमुळे बालमजुरी नव्हे, तर बालमजुरीमुळे गरिबी वाढते. प्रौढ व्यक्तींपेक्षा अधिक काम कमी मोबदल्यात करून घेता येत असल्यामुळेच प्रौढांना काम न देता मुलांचा वापर केला जातो. आज बालमजुरी दिनाच्या निमित्ताने!

वातानुकूलित कार्यालयात बसून अनेकजण पगार कधी वाढेल, याची प्रतीक्षा करीत असतात, त्याच वेळी जगातील 15 कोटी लहान-लहान मुले ओझी वाहत असतात, मोलमजुरी करीत असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. पोटासाठी राबणारी, असुरक्षित जागेत काम करणारी ही मुले 5 ते 17 वयोगटातील आहेत. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने यासंदर्भात जारी केलेली आकडेवारी घाबरवून सोडणारी आहे. या संघटनेने 2002 पासून जागतिक बालमजुरीविरोधी दिवस पाळण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी संघटनेच्या हाती लागलेल्या आकडेवारीनुसार, 15.2 कोटी मुले जगभरात बालमजूर म्हणून राबत आहेत. त्यांपैकी निम्म्या मुलांकडून त्यांच्या वयाच्या मानाने किती तरी अवजड, न झेपणारी कामे करवून घेतली जात आहेत. या अवजड कामांत खाणकाम, कारखान्यातील मजुरी, माल वाहून नेणे अशी कामे समाविष्ट आहेत. अशा कामांमुळे एका सर्वसाधारण बालकाचा विकास खुंटण्याची भीती असते. आपल्या देशात तर या बाबतीत भयावह स्थिती आहे.

'एनसीआरबी'च्या मते, बालकामगारांना कारखान्यात, खाणीत काम करताना जीव गमवावा लागल्याच्या घटना वाढत आहेत. बिहार, झारखंड, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यांत कामावरील मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. 18 वर्षांखालील मुलांना काम करावे लागू नये आणि त्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे, हे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे उद्दिष्ट आहे. गरिबीमुळे बालमजुरी वाढते, असे वाटत असेल, तर तो एक भ्रम आहे. वस्तुतः नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे.

म्हणजेच, बालमजुरीमुळे जगात गरिबी वाढत आहे. ही वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला यासंदर्भातील आणखी काही आकडेवारी तपासावी लागेल. बिगरसरकारी आकडेवारीनुसार, जगभरात आजमितीस 16.8 कोटी मुले मजुरी करतात. ही आकडेवारी 5 ते 17 वयोगटातील मुलांच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के आहे. भारतातील 2011 च्या जनगणना अहवालानुसार, देशात सुमारे 1 कोटी बालमजूर आहेत. बिगरसरकारी आकडेवारीनुसार मात्र देशात 5 कोटी मुलांकडून मजुरी करून घेतली जात आहे.

गरिबीमुळे मुलांना काम करावे लागते, या तर्काच्या पुष्ट्यर्थ नेहमी असे विचारले जाते की, गरीब मुलांनी काम केले नाही तर ती खाणार काय? मुलांना बालमजुरीच्या खाईत लोटणारे दलालसुद्धा असाच युक्तिवाद करतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1950 च्या अनुच्छेद 24 नुसार 14 वर्षांखालील मुले-मुली यांना अल्प आर्थिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून त्यांचा शैक्षणिक अधिकार हिसकावून त्यांना सामाजिक, मानसिक, शारीरिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून, यामध्ये कायद्यानुसार योग्य शिक्षेची तरतूदही आहे; मात्र प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी म्हणजेच कारवाई होत नसल्याने बुरसटलेल्या विचारधारेच्या लोकांना अभय मिळत आहे.

SCROLL FOR NEXT