प्रा. डॉ. शरद गायकवाड
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यविश्वात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा गाढ आदर आणि अभिमान ठळकपणे व्यक्त होतो. आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती, त्यानिमित्त...
फुले-शाहू-आंबेडकरांचा ऐतिहासिक असा इतिहास विषयाचा वसा आणि वारसा सत्यशोधक, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून प्राणपणाने अत्यंत निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे चालविला. अण्णा भाऊंच्या समग्र साहित्यात बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या मानवमुक्ती लढ्याची क्रांतिबीजं जशी सापडतात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या अभिमानाचीही गौरवगाथाही साकारलेली दिसते. शिवाजी महाराजांची रणनीती, राजनीती, शस्त्रनीती, धोरणनीती, महाराजांचे अफाट आणि अलौकिक कार्यकर्तृत्व या साऱ्यांचा अण्णा भाऊंना प्रचंड आदर आणि अभिमान वाटत होता. तो सार्थ अभिमान त्यांनी अक्षर वाङ्मयाची निर्मिती करून वेळोवेळी लिखित स्वरूपात समाजमनासमोर साकारलेला आहे.
अण्णा भाऊंचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. वाटेगावच्या मातंगांनी स्वराज्य उभारणीत दिलेले योगदान अतुलनीय आहे. वाटेगावच्या या वीर बहाद्दूर मातंगांच्या पराक्रमी शौर्यावर बेहद खूश होऊन दस्तुरखुद्द छ. शिवाजी महाराजांनी स्वत:च्या हाताने मानाची तलवार देऊन या मातंगांचा गौरव केला होता. ती तलवार फकिराच्या घरात होती. वाटेगावच्या जोगणीच्या जत्रेत सारे गावकरी सवाद्य मिरवणुकीने तिचे सामूहिक पूजन करीत असत, असा सारांश त्यांच्या वास्तववादी 'फकिरा' कादंबरीमध्ये (१९५९) आहे. अण्णा भाऊंनी महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांपर्यंत शाहिरी पोवाड्यांद्वारे शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व प्राणपणाने पोहोचवलेच, शिवाय १९६१ मध्ये ते रशियाला गेले तेव्हा तिथेही महाराष्ट्र, मराठी भाषा आणि छ. शिवाजी महाराजांचे शिवचरित्र शिवपराक्रम सांगितला. अण्णा भाऊंची ‘अग्निदिव्य’ कादंबरी छ. शिवराय आणि रणझुंजार अशा प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित आहे. शिवकालीन समाजव्यवस्था, शिवकालीन भाषाशैली रितीरिवाज या साऱ्यांचा दस्तावेज यात दिसतोे. कादंबरीत शिवरायांची यशोगाथा सांगताना एका पोवाड्यात ते म्हणतात-
मेघापरी हाक देते झाले शिवाजी| मग उठे तानाजी|
बहिर्जी नि येसाजी, हंबीरराव आणि बाजी
मालुसरे आणि सूर्याजी| दोन मावळे मर्द रणगाजी!
अग्निदिव्यमध्ये ते पुढे म्हणतात, महाराजांच्या हाकेने अवघा महाराष्ट्र देश खडबडून उठला होता, त्याला नवा जोम आला होता. त्यामुळे दिल्लीचा औरंगजेब पिसाट झाला होता. आदिलशाहीचे माथे फिरले होते. त्यांना शिवाजी महाराजांचे अस्तित्व असह्य झाले होते. मराठी भाषा, महाराष्ट्र आणि छ. शिवाजी महाराज हाच अण्णा भाऊंचा श्वास आणि ध्यास असल्याची प्रचिती अण्णा भाऊंचे शिवप्रेम वाचल्यावर येते. त्यांंचा जन्म वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. 'वैर' या कादंबरीत अण्णा भाऊंनी प्रस्तावनेत म्हटले आहे की, 'साताऱ्याच्या मातीत तिथं कष्टाची कृष्णामाई अखंडपणे वाहते. तिथं देशभक्तीची कोयना नवजीवन निर्माण करते नि तिथं त्यागाचे महान कुंड सदैव धगधगत असते. ती माती शिवरायांच्या घोड्याच्या टापांनी पुनित झालेली आहे. तिथं मराठा सैनिकांची तलवार तळपली आहे आणि मराठी साहित्यिकांच्या प्रतिभेनं इंद्रधनुष्य निर्माण केले आहे.' संयुक्त महाराष्ट्रावरच्या गीतांचा संग्रह या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अण्णा भाऊ म्हणतात, 'महाराष्ट्रावरचा घोर अन्याय निवारणार्थ आमची प्रतिभा कारणी लागली. शिवरायांचे कीर्तिगीत गाणाऱ्या अग्निदासाची परंपरा आम्ही पुढे नेली, याचे समाधान आम्हा शाहिरांना नक्कीच लाभेल.' चिरानगर, घाटकोपर, मुंबई येथे राहत असताना अण्णा भाऊंनी छ. शिवाजी महाराजांचे कीर्तिगीत गाणारे आम्ही शाहीर आहोत, असे छातीठोकपणे सांगितलेले आहे. ‘खुळवाडी’ या कथा संग्रहाच्या प्रस्तावनेत आचार्य प्र. के. अत्रे म्हणतात, 'छत्रपतींच्या घोड्याची सातारच्या मातीत रुजलेली पाऊलखूण आपल्या छातीवर अभिमानाने मिरवणारे अण्णा भाऊ साठे इतरांपेक्षा निराळ्या तेजाने डोळ्यांत भरतात.'
शिवाजी महाराजांविषयीचा अण्णांचा अत्यंत गाजलेला पोवाडा म्हणजे ’महाराष्ट्राची परंपरा’ हा. या पोवाड्यात अण्णा भाऊ म्हणतात,
ते वीर मावळे गडी धन्य जाहले|
स्वातंत्र्यसंगती करी शस्त्र घेतले|
आणि प्रतिकारांचे कुंड पेटवून दिले|
गिरीकंदराला उठविले| गड कोटांना हलविले|
शिवराय त्यात रणधिर| त्यांनी घणघोर|
कपारीतुंग शिंग फुंकिले॥ जी... ॥
औरंगजेब नमविला| दिलेरखान दमविला|
शाहिस्तेखान शासिला|
मर्द मावळा निर्भय लढला| बुरूजां-बुरूजांला|
महाराष्ट्राची परंपरा ती| पुढती नेण्याला... जी...॥
तर ‘उठला मराठी देश’ पोवाड्यात अण्णा म्हणतात-
कडे कपारी दऱ्या न दरडी| डोंगर नदिनाले|
पदस्पर्शाने शिवरायाच्या| जे पावन झाले|
घोडदौड पाहून मावळे बळ ज्यांना आले|
महाराष्ट्रा वळुनी बघ जरा पोवाड्यात ते म्हणतात-
शिवबाच्या कीर्तिचे झडती चौघडे|
गडकिल्ले अजुनीही गाती पवाडे|
दरी खोरे वीर कथा सांगे पठारा|
शौर्याची तव परंपरा| महाराष्ट्रा वळुनि बघ जरा॥१॥
सिंह गडी अमरपडी ताना पडला|
अन्याया तुडवित संताजी दौडला|
आगऱ्यांनी जागविले अरबी सागरा|
शौर्याची तव परंपरा| महाराष्ट्रा वळुनी बघ जरा॥२॥
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया| या पोवाड्यात अण्णा भाऊ सांगत आहेत-
ही मायभूमी धीरांची| शासनकर्त्या वीरांची|
घामाची आणि श्रमाची| खूरप्याची आणि दोरीची|
संतांची, शाहिरांची| त्यागाच्या तलवारीची|
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया|
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया॥धृ॥
अण्णा भाऊंनी गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि हैदराबादमुक्ती संग्रामातही योगदान दिले. मराठी भाषा बोलणारा, गुजरातमधील डांग प्रदेश, संपूर्ण विदर्भासह निपाणी, बेळगाव, डांग, उंबरगाव यासह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी अण्णा भाऊंनी अतोनात परिश्रम घेतले. यालाच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा आजच्या भाषेत सीमालढा असे म्हणतात. स. का. पाटील, मोरारजी देसाई, बाळासाहेब खरे आणि इतर मंडळींचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रचंड विरोध होता. अण्णा भाऊ त्या अर्थाने त्यांचे शत्रू होते म्हणून अण्णांच्या लालबावटा कलापथकावर बंदी घातली. पकड वॉरंट काढले, त्यांना अमरावतीच्या जेलमध्ये बंदिस्त केले. अण्णा भाऊंनी रूपक वापरले आणि निपाणी कर्नाटक राज्यात गेली आणि महाराष्ट्र नावाचा नवरा १ मे १९६० रोजी स्वतंत्र झाला. या पार्श्वभूमीवर 'माझी मैना गावाकडं राहिली' ही अप्रतिम, अजरामर छक्कड लावणी लिहिली. या छक्कडमध्येसुद्धा शिवाजी महाराज आणि त्यांना मानणारा मराठी माणूस म्हणजे शिवशक्ती असा शब्दप्रयोग केला आहे-
गावाकडं माझी मैना| भेट नाही तिची|
तीच गत आहे या खंडित महाराष्ट्राची|
बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर,
मालकी दुजांची| धोंड खडणीची| कमाल दंडेलीची
चीड बेकीची| गरज एकीची|
म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची
आता वळू नका| रणि पळू नका| कुणी चळू नका
बिनी मारायची अजून राहिली|
माझ्या जीवाची होतिया काहिली...
मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य आणि छ. शिवाजी महाराज यांच्यासाठी जीवाची काहिली होणारा महान प्रतिभाशाली कलावंत, सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!