युरोपियन लोक सागरी सत्तेचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करीत होते. स्वराज्याच्या निर्मिती आणि विकासात अडथळा आणू शकणार्या युरोपियन कंपन्यांपासून महाराज नेहमीच सावध होते. मात्र, त्यांच्यासोबत व्यापार करण्याचे फायदे त्यांना माहीत होते. युरोपियन कंपन्यांबरोबरचा व्यापार हा स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गरजेचा होता.
भारतात सागरी मार्गाने आलेल्या युरोपियन लोकांमध्ये सर्वात अगोदर पोर्तुगीज होते. दक्षिण भारतातील कालिकत बंदरात पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा सन 1498 मध्ये पोहोचला. त्यानंतर अल्पावधीतच 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर नियंत्रण प्रस्थापित केले. पोर्तुगीज लोकांचा हिंदी महासागरात इतका दबदबा वाढला की, त्यांनी भारतीय जहाजांना ‘कार्ट्झ’ नावाचे व्यापारी परवाने देण्यास सुरुवात केली. तथापि, हा प्रभाव फार काळ राहिला नाही. तो हळूहळू कमी होऊ लागला. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, भारतीय महासागरात युरोपियन लोकांच्या व्यापारी कंपन्यांचे आगमन हे होय. नंतर आलेल्या कंपन्या जास्त आधुनिक होत्या. तसेच, जास्त आक्रमक व्यापारी धोरण राबवणार्या होत्या. पोर्तुगीजांनंतर इंग्रज आले. नंतर डच कंपनी आणि अगदी शेवटी फ्रेंच व्यापारी कंपनी आली. छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ताबा मिळवायचा होता. जंजिर्याच्या सिद्दींना हरवायचे होते. हे करण्यासाठी एका कार्यक्षम आरमाराची निर्मिती करणे आवश्यक होते. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर विजय मिळवण्यासाठी आक्रमण केले. त्यावेळेस त्यांना पश्चिम किनार्यावर युरोपियन सागरी सत्तांचे व्यापारी, लष्करी आणि आरमारी तळ असल्याचे लक्षात आले. उच्च प्रतीची आधुनिक शस्त्रास्त्रे आणि जहाजांमुळे समुद्रकिनार्यावरील व्यापार युरोपियन सत्तांच्या अधिपत्याखाली होता. सर्व युरोपियन लोक आपल्या सागरी सत्तेचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करीत होते.
सागरी सत्तांचा प्रभाव आणि व्यापार याचा विचार करता तत्कालीन सत्तांशी याचा संबंध येणे नैसर्गिक होते. परिणामी, पश्चिम भारतात व्यापार आणि राजकीय कुरघोड्या करणार्या युरोपियन कंपन्यांचा संबंध शिवाजी महाराजांशी आला. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यनिर्मितीमुळे युरोपियन कंपन्यांच्या राज्याभिलाषेला आळा बसला. शिवाजी महाराजांनी दख्खनमधील प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकला होता. त्यावर आपले सार्वभौमत्व प्रस्थापित केले होते. महाराज सतत स्वराज्याची पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात मग्न होते. असे असताना पोर्तुगीज, डच आणि इंग्रज आपला व्यापारी, तसेच राजकीय प्रभाव विस्तारण्याचा प्रयत्न करीत होते. शिवाजी महाराजांनी एक संघटित आणि स्वदेशाभिमानाने प्रेरित झालेले सैन्य निर्माण केले होते. ज्याचा वापर करून महाराज युरोपियन कंपन्यांच्या वसाहती किंवा वखारींवर लष्करी दबाव निर्माण करू शकत होते. याचे एक उदाहरण म्हणजे, 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची वखार हादरून गेली. 1658 पर्यंत शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार स्थापन केले होते. किनारपट्टी आणि समुद्रावरही आपली सार्वभौम सत्ता निर्माण करण्याचा त्यांचा निश्चय होता. त्यामुळे समुद्री सत्ता असलेल्या युरोपियन कंपन्यांसोबत संघर्ष आणि सहकार्य हे दोन्ही करावे लागणार याची महाराजांना जाणीव होती.
शिवाजी महाराजांची युरोपियन लोकांबद्दल सावधगिरीची भूमिका असली, तरी त्यांच्यासोबत व्यापार करण्याचे फायदे त्यांना माहीत होते. युरोपियन कंपन्यांसोबतचा व्यापार हा स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गरजेचा होता. शिवाजी महाराजांचा उल्लेख असणारे गोवा पुराभिलेखागारातील सर्वात जुने पत्र 28 नोव्हेंबर 1657 रोजीचे आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, शहाजीराजेंचे पुत्र शिवाजीराजे यांनी चौल बंदराचा ताबा घेतला आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा आरमाराचा उल्लेख 1659 सालच्या एका पोर्तुगीज अधिकार्याच्या पत्रामध्ये आढळतो. अधिकारी लिहितो की, चौल आणि वसई परिसरावर आदिलशाही दरबारातील बंडखोर सरदार शहाजीराजे यांच्या पुत्राने विजय मिळवला आहे. तो अतिशय बलवान झाला आहे. त्याने वसई तालुख्यातील भिवंडी, कल्याण आणि पनवेल बंदरांमध्ये काही युद्धनौका तयार केल्या आहेत. आता आम्हाला सावध राहणे सक्तीचे झाले आहे. युद्धनौकांचा वापर रोखण्यासाठी आम्ही पोर्तुगीज कॅप्टनला त्यांना बंदरातून बाहेर येऊ देण्यास मनाई केली आहे. पत्राच्या मजकुरावरून हे स्पष्ट होते की, शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केल्यामुळे पोर्तुगीज जागे झाले होते.
शिवाजी महाराजांचा आणि इंग्रजांचा पहिला राजकीय संबंध अफजलखानाच्या प्रकरणानंतर आला. इंग्रजांनी 1658 मध्ये राजापूर येथे वखार स्थापन केली होती. 10 नोव्हेंबर, 1659 रोजी महाराजांनी अफजलखानाला ठार केले. या घटनेनंतर महिन्यातच राजापूर वखारीचे अधिकारी हेन्री रेव्हिंग्टन व रँडॉल्फ टायलर या दोन व्यापार्यांनी शिवाजी महाराजांचे सैन्य आणि इंग्रजांमध्ये झालेल्या चकमकीचे वर्णन आपल्या पत्रात केले आहे. या प्रकरणात शिवाजी महाराजांनी इंग्रजांना नमवले. मार्च 1661 मध्ये मराठ्यांनी इंग्रजांच्या राजापूर वखारीवर हल्ला केला. ईस्ट इंडिया कंपनीने पन्हाळगडच्या वेढ्यामध्ये विजापूरच्या आदिलशहाची बाजू घेतली होती. इंग्रज सैनिकांच्या एका छोट्या पलटणीने इंग्लंडचा झेंडा लावून या युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. शिवाजी महाराजांनी या विद्रोही कृत्याचे प्रतिउत्तर म्हणून कंपनीच्या अधिकार्यांना कैदी बनवले. डोईजड खंडणी दिल्यावरच त्यांना मुक्त केले गेले. परिणामतः, राजापूर वखार बंद पडली. 1664 साली महाराजांच्या सुरत आक्रमणाच्या वेळीही इंग्रजांचे नुकसान झाले. पोर्तुगीज किंवा इंग्रजांच्या तुलनेत डच लोकांचा शिवाजी महाराजांसोबत आलेला संबंध काहीसा वेगळ्या स्वरूपाचा होता. 1637 मध्ये डचांनी कोकण किनार्यावर वेंगुर्ला येथे वखार स्थापन केली होती. शिवाजी महाराजांचा पहिला उल्लेख 5 मे, 1660 रोजी वेंगुर्ल्यातील डच अधिकार्याने त्यांच्या मुख्यालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये येतो. हे पत्र अफजलखान शिवाजी महाराजांना फसवून ठार मारण्याच्या हेतूने आला होता, याचा स्पष्ट उल्लेख करते.