प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, लातूर
महात्मा गांधींनी राजकारणाला नीतिमत्तेची जोड असावी, असे ठामपणे प्रतिपादन केले होते. या तत्त्वावर शिवराज पाटील-चाकूरकर यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात गांधीवादी विचारांचे जिवंत उदाहरण साकार केले. त्यांनी सत्याशी कधीही तडजोड केली नाही. ते कायम सर्वप्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहिले.
मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, ती केवळ सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यामुळे नव्हे, तर चारित्र्य, नीतिमत्ता, संयम आणि मूल्यनिष्ठ आचरणामुळे अढळ स्थान प्राप्त करतात. अशाच दुर्मीळ, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी नेतृत्वामध्ये शिवराज पाटील- चाकूरकर यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणात चार ते साडेचार दशके सक्रिय राहूनही ज्यांनी आपले सार्वजनिक जीवन पूर्णतः निष्कलंक ठेवले, असा नेता विरळाच. आजच्या गोंधळलेल्या, सवंग आणि आरोप-प्रत्यारोपांनी भरलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जीवन अधिकच दीपस्तंभासारखे उजळून दिसते.
मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले शिवराज पाटील-चाकूरकर हे केवळ लातूरचे लोकप्रतिनिधी नव्हते, तर महाराष्ट्राचे आणि संपूर्ण देशाचे वैचारिक वैभव होते. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राचे केंद्रात समर्थपणे प्रतिनिधित्व करणार्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. 1967 पासून राजकारणात सक्रिय झालेल्या शिवराज पाटील-चाकूरकर यांनी सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला. नगरसेवकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास लोकसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती आणि अखेरीस देशाचे गृहमंत्रिपद अशा सर्वोच्च टप्प्यांपर्यंत पोहोचला.
1980 मध्ये पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या विद्वत्तेवर, प्रामाणिकपणावर आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड केली. ही निवड अनेक अर्थांनी फलदायी ठरली. पुढील काळात त्यांनी विविध केंद्रीय मंत्रिपदे भूषविली. लोकसभा सभापती म्हणून कार्य करताना त्यांनी संसदीय परंपरांना प्रतिष्ठा मिळवून दिली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव हा त्यांच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. सतत विजयाच्या शिखरावर असलेल्या या नेत्याने पराभव अत्यंत संयमाने स्वीकारला. देशाचे गृहमंत्रिपद त्यांना लाभणे, हे मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे महाभाग्यच मानावे लागेल.
गृहमंत्रिपदाच्या काळात देशासमोर दहशतवादासारखी गंभीर आणि आव्हानात्मक परिस्थिती उभी होती. मालेगाव, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी परिस्थिती हाताळताना धैर्य, संयम आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या काळात काही माध्यमांनी गौण मुद्द्यांना अवाजवी महत्त्व दिले; मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारच्या भावनिक उद्रेकाशिवाय वस्तुस्थिती स्पष्ट केली आणि आपले लक्ष देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर केंद्रित ठेवले. राष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही शिवराज पाटील -चाकूरकर यांची प्रतिमा अत्यंत सुसंस्कृत, अभ्यासू आणि संतुलित नेत्याची होती.
भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, मध्यपूर्व आणि आग्नेय आशियातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांच्या विषयाच्या सखोल अभ्यासामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक उजळली. लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. राजकारणात श्रेय घेण्याची स्पर्धा असताना, ‘श्रेय नामावलीत मी कुठेच नाही’ हा भाव अंतःकरणात जपणारा असा नेता विरळाच. नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांनी आपले वैचारिक वैभव, संयम आणि संतुलन टिकवून ठेवले. चारित्र्य, नीतिमत्ता आणि सार्वजनिक जीवनातील शुचितेचे प्रतीक म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. राजकारणाला कलंकित करणार्या असंख्य घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवराज पाटील-चाकूरकर यांचे जीवन भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.