वाढत्या ‘पाऊसहानी’चे आव्हान Puhdari File Photo
संपादकीय

वाढत्या ‘पाऊसहानी’चे आव्हान

पुढारी वृत्तसेवा
रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

केरळमधील वायनाडनंतर त्रिपुरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि महापूर आला आहे. वास्तविक, देशाबरोबरच जगातील अनेक भागांत अतिवृष्टीच्या घटना घडत आहेत. या घटना निसर्गाचे रौद्ररूप सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिमुसळधार पाऊस पडण्यामागे प्रचंड उष्णता हेच मुख्य कारण आहे आणि परिणामी पृथ्वीला एका तप्त भट्टीचे रूप आले आहे. या कारणामुळे झालेले प्रचंड बाष्पीभवन हे कोठे ना कोठे मुसळधार पाऊस पाडणारे होते.

यंदाच्या प्रचंड पावसामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर आणि नंतर उत्तराखंडमध्ये हाहाकारच उडाला नाही, तर केरळच्या वायनाडपासून आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा आदी ठिकाणी निसर्गाने प्रकोप पाहावयास मिळाला. वाढत्या तापमानवाढीची ही देणगी आहे. प्रचंड पाऊस पडला की, आपल्या पायाभूत सुविधांची दाणादाण उडते. अशा स्थितीत भविष्यात पायाभूत सुविधा योग्यरीत्या उभारल्या गेल्या नाही, तर नुकसानीचे प्रमाण आणखी वाढू शकते. प्रत्यक्षात आपण पर्यावरण अनुकूल पायाभूत विकास करण्यापासून कोसो दूर आहोत. पायाभूत सुविधा आणताना याच मुद्द्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आता चांगल्या पद्धतीने पायाभूत विकासाचा पाया रचण्यासाठी सर्वंकष धोरणाची गरज आहे. या जोरावरच नव्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करता येईल. खर्‍याअर्थाने गेल्या एक दशकात महापूर आणि प्रचंड पावसामुळे सर्वाधिक नुकसान पायाभूत सुविधांचेच झाले आहे.

आता अतिवृष्टीमुळे मालमत्तेसह मनुष्यहानीही होत आहे. यावेळी पावसाने गेल्या काही दशकांच्या तुलनेत सर्वाधिक फटके दिले आहेत. देशातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र पावसाच्या तडाख्यात सापडले. वायनाड येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन तेथे मृतांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे. अनेक गावे दबली गेली आहेत. बिहार आणि पंजाबममध्येही पावसाने प्रचंड हानी झाली. उत्तराखंडमध्ये तर लोकांचे बळी गेले, तर हिमाचलमध्येही मनुष्यहानी झाली आहे. हिमाचलमध्ये तर एक गाव पूर्णपणे गडप झाले. आता त्रिपुरात हलकल्लोळ उडाला आहे. पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरची शेत जमीन संकटात सापडली आहे. आर्थिक नुकसानीचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. किती जणांनी जीव गमावले आणि किती वित्तहानी झाली, त्याची आकडेवारी आता पाऊस शेवटच्या टप्प्यात आल्यावरच कळेल. अर्थात, त्याचा दोष अनियंत्रित विकासकामांना दिला जात आहे. तसेच जंगलतोड आणि पर्यावरण नियमांची पायमल्लीही कारण सांगितले जात आहे. या गोष्टी सर्वांनाच आणखी चांगल्या रितीने समजून घ्याव्या लागतील.

सुख-सुविधांसाठी पृथ्वीच्या पोटातून गरजेपेक्षा अधिक स्रोतांचा उपसा करत आहोत. यामुळे पृथ्वीच्या तापमानात अधिक वाढ नोंदली गेली. साहजिकच समुद्रावर अधिक परिणाम झाला. पृथ्वीवर समुद्राची व्याप्ती अधिक असल्याने ते उष्ण झाल्याने अल-निनोसारखे परिणाम समोर येत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम अधिक जाणवतात. प्रचंड उष्णता आणि महापूर हा आजघडीला जगातील बहुतांश शहरांची समस्या बनली आहे. पूर्वी त्याचा फटका ग्रामीण भागाला बसायचा; मात्र यावेळी शहरांनाही सोडलेले नाही. शहरात पूर येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रस्त्यावर पाणी साचणे. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे. कारण, ती व्यवस्था उभी करताना कमी काळात प्रचंड पाऊस पडेल, याची कल्पना केलेली नसते. 10 वर्षांपूर्वी शहरात एवढा पाऊस पडत नसे. यामागचे कारण म्हणजे, शहरात वाढत्या तापमानामुळे निर्माण होणारा दबाव हा पावसाचे प्रमाण कमी ठेवायचा; परंतु काळानुसार हवामान बदलामुळे आता कोणीही सुरक्षित राहिलेले नाही, हे स्पष्ट झाले. अर्थात पावसाच्या भीतीने आपण विकासापासून दूर राहू शकत नाही. मानवाच्या विकासासाठी या गोष्टी अनिवार्य आहेत. हिमालय क्षेत्रापासून दक्षिण भारतापर्यंत हाच मुद्दा लागू आहे; पण एक मर्यादा ठेवत निसर्गाला धक्का लावण्याचे काम थांबवावे लागेल. अर्थात, हे काम सर्व देशांनी एकत्र येऊन करायला हवे. कारण, एक देश सजग झाला, तरी संकट टळणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT