पुढारी तडका आर्टिकल Pudhari File Photo
संपादकीय

राजकारणाचा केंद्रबिंदू

पुढारी वृत्तसेवा

देशात किंवा जगात कुठेही भूकंप झाला, तर पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे केंद्रबिंदू कुठे आहे? लातूर जिल्ह्यात प्रलयंकारी भूकंप झाला होता, तेव्हा त्याचा केंद्रबिंदू किल्लारी या गावात होता. केंद्रबिंदू अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण सगळ्या घडामोडी तिथेच घडत असतात. सांप्रतकाळी निवडणुका जाहीर झाल्यामुळे आणि अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरलेले असल्यामुळे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू दिल्लीकडे सरकला आहे, असे दिसून येते.

दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे साहजिकच सगळ्या पक्षांचे मोठे नेते दिल्लीमध्ये आहेत. भाजप असो की काँग्रेस, या दोन्ही मुख्य पक्षांचे सर्वोच्च नेते दिल्लीमध्ये वास्तव्याला असतात. या सर्वोच्च संघाला हाय कमांड असे म्हणतात. इकडे कुणी उमेदवारी मागण्यासाठी राज्य पातळीवरील नेत्याकडे गेला तर राज्य पातळीवरील नेते हात वर करतात आणि सर्व काही हाय कमांडच्या हातात आहे, असे सांगतात. ही हाय कमांड नावाची संकल्पना कधी प्रत्यक्ष दिसते, तर कधी दिसत नाही; परंतु हे सर्व पक्षांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात.

असे म्हणतात की, दिल्लीची हवा फार अजब आहे. कधी कशी फिरेल, हे सांगता येत नाही. दिल्लीच्या हवेचा अंदाज घेण्यासाठी राज्य पातळीवरील नेते दररोज विमानात बसून दिल्लीला जात आहेत आणि एकेक यादी फायनल करून परत येत आहेत. विद्यमान सत्ताधारी पक्षांनी येणार्‍या काळात बंडखोरी करू शकणार्‍या लोकांना आधीच महामंडळे आणि तत्सम संस्थांची अध्यक्षपदे देऊन थंड करून ठेवले आहे. सर्वच पक्षांना बंडोबांना थंडोबा करण्याचे महाजिकिरीचे काम करावे लागणार आहे.

विचारधारा, बांधिलकी, पक्षनिष्ठा, तत्त्वे हे सर्व बासनात गुंडाळून ठेवलेले असल्यामुळे इच्छुक उमेदवार कुठूनही कुठेही जाऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजकारणात असणार्‍या प्रत्येकाला कधी ना कधी तरी आमदार व्हायचे असते. गेली किती तरी वर्षे तयारी करणारे मोठे राजकीय कार्यकर्ते कुणीच तिकीट दिले नाही, तर अपक्ष म्हणून पण उभे राहायला सज्ज आहेत. या लोकांनी मतदारसंघात भलीमोठी बॅनर्स लावली होती; परंतु त्यावर पक्ष चिन्ह नव्हते. याचा अर्थ यांना कोणीही वचन दिलेले नाही की, तुम्हाला तिकीट देऊ म्हणून. असे लोक राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतील आणि ते नच मिळाले तर सरळसरळ बंडाचा झेंडा उभारून अपक्ष म्हणून उभे राहतील.

अपक्ष मंडळींना हाय कमांड नसतो आणि ते त्यांच्या मनाचे स्वतःच ताबेदार असतात. पक्षाच्या मंडळींना मात्र हाय कमांडला विचारावे लागते आणि हाय कमांड दिल्लीमध्ये असल्यामुळे संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या दिल्ली झालेली आहे. येणार्‍या काळात दिल्लीवरून कोणत्या याद्यांना आणि कोणत्या व्यक्तींना मान्यता मिळते आणि कुणाला पक्षाचा एबी फॉर्म मिळतो, हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT