Goa casino crisis | गोव्यावर कॅसिनो संकट 
संपादकीय

Goa casino crisis | गोव्यावर कॅसिनो संकट

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

कॅसिनोंमुळे गोव्याची शांतता आणि सांस्कृतिक ओळख हळूहळू बाजूला पडत चालली आहे. पर्यटन विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे जीवनच विस्कळीत होत असेल, तर त्या विकासाला अर्थ काय, हा प्रश्न आता विचारला जात आहे.

गोवा हे केवळ समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वैविध्य यासाठीच नव्हे, तर त्याच्या मुक्त आणि रंगतदार नाईट लाईफसाठीही जगभर ओळखले जाते. या नाईट लाईफमध्ये कॅसिनोंनी मोठी भर घातली आहे, हे नाकारता येणार नाही. पर्यटन उद्योगाच्या द़ृष्टीने कॅसिनो हे महसूल आणि रोजगाराचे मोठे साधन बनले आहे; मात्र या चमकदार बाह्यरूपामागे अनेक गंभीर प्रश्न दडलेले आहेत. विशेषतः पणजी शहर आणि मांडवी नदी परिसरासाठी कॅसिनो आता एक मोठे संकट बनत चालले आहे.

रात्रीच्या वेळी पणजीतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. कॅसिनोंजवळ वाहनांची संख्या इतकी वाढते की, स्थानिकांना स्वतःच्या शहरात प्रवास करणे कठीण होऊन बसते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती, लक्झरी बससेवा आणि विविध ऑफर्स देण्यात येतात; पण त्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण किंवा पार्किंग व्यवस्थेची जबाबदारी घेतली जात नाही.

कॅसिनोंविरोधात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. पणजीकरांनी मोर्चे काढले, निवेदने दिली, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; पण परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. खुद्द पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीदेखील एकदा कॅसिनोंविरोधात मोर्चा नेला होता. निवडणुकीच्या काळात ‘100 दिवसांत कॅसिनो हटवू’ अशी त्यांनी दिलेली घोषणा आजही लोकांच्या स्मरणात आहे. बाबूश मोन्सेरात हे शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वेळा दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत; मात्र कॅसिनोंच्या बाबतीत त्यांचाही शब्द अपुरा पडला. यावरून कॅसिनो उद्योगामागील प्रचंड आर्थिक ताकद, राजकीय हितसंबंध आणि दबाव याची कल्पना येते.

आता तर परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मांडवी नदीत आणखी एक प्रचंड मोठे कॅसिनो जहाज आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले, तरी त्याबाबतची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगली आहे. मांडवी नदी ही गोव्याची ओळख आहे. या नदीने पणजी शहराला सौंदर्य दिले, संस्कृती दिली; पण आज या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठमोठ्या कॅसिनो जहाजांमुळे नदीतील जलप्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून होत आहेत. जहाजांमधून निर्माण होणारा कचरा, सांडपाणी, तेल गळती आणि इतर रासायनिक घटक नदीच्या पाण्यात मिसळत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत आहे. न्यायालयानेही या प्रश्नाची दखल घेत कॅसिनोजवळील पाण्याच्या गुणात्मक व परिणात्मकतेचा नव्याने अभ्यास करून जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

आता नवीन विशाल कॅसिनो जहाज मांडवीत आले, तर नदीतील जागेवर अधिक ताण निर्माण होईल. आधीच अनेक जहाजांमुळे नदीचे स्वरूप बदलले आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि सौंदर्य बाधित झाले आहे. आणखी एक प्रचंड जहाज आल्यास संपूर्ण खाडीच अडथळ्यांनी भरून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे केवळ पर्यावरणच नव्हे, तर नदीमार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात किंवा आपत्तीच्या काळात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. केवळ आर्थिक फायद्यासाठी मांडवी नदीचे आणि पणजी शहराचे भवितव्य धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही. गोव्याचा आत्मा त्याच्या निसर्गात, संस्कृतीत आणि लोकांच्या साधेपणात आहे. हा आत्माच हरवला, तर चमकदार रोषणाई आणि मोठमोठे कॅसिनो गोव्याला खर्‍याअर्थाने समृद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे कॅसिनो उद्योगाकडे केवळ महसुलाचे साधन म्हणून न पाहता त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT