युवराज इंगवले
एप्रिलमध्ये अमेरिकेची युनायटेड एअरलाईन्स सेवेची 100 वर्षे पूर्ण करणार आहे आणि त्याचवेळी महिलांच्या विमानचालन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा साजरा करत आहे. अमेरिकेतील 64 वर्षीय कॅप्टन क्रॅस्टन विल्सन या जगातील आघाडीच्या युनायटेड एअरलाईन्समधील 18 हजार वैमानिकांमध्ये सर्वात वरिष्ठ महिला वैमानिक बनणार आहेत. ही कामगिरी अत्यंत खास आहे. कारण, या एअरलाईनच्या 100 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणतीही महिला या पदावर पोहोचलेली नाही.
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिला वैमानिकांचे प्रमाण केवळ सुमारे 6 टक्के आहे, तिथे विल्सन यांचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. त्यांचे यश हेच सिद्ध करते की, जबर इच्छाशक्ती असेल, तर कठोर परिश्रमाच्या जोरावर दरवर्षी सुमारे 3.70 कोटी रुपये म्हणजेच 4 लाख डॉलर इतके उत्पन्न मिळवता येऊ शकते. क्रॅस्टन यांचा प्रवास त्या 9 वर्षांच्या असताना सुरू झाला, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा विमानाच्या खिडकीतून जग पाहिले. त्या सांगतात की, ‘त्या दिवशी माझे वडील मला फोटोग्राफीसाठी एका छोट्या हवाई प्रवासावर घेऊन गेले होते. मी खूपच आनंदी होते.’ वडिलांनी आनंदाचे कारण विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘मोठी झाल्यावर मी हेच काम करणार!’ विल्सन यांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच उड्डाण प्रशिक्षण सुरू केले. त्यांनी स्टुडंट पायलट सर्टिफिकेट, प्रायव्हेट पायलट लायसन्स आणि अन्य आवश्यक उड्डाण परवाने मिळवले.
त्यांचे ‘फ्लाईंग अवर्स’ हेच त्यांचे खरे शिक्षण ठरले. त्या सांगतात की, पहिल्यांदा नोकरीसाठी अर्ज करताना त्यांना स्वतःवर विश्वास नव्हता. ‘मला वाटत होते की माझी निवड होणे अशक्य आहे; पण, केवळ 22 व्या वर्षी माझ्यातील कौशल्यामुळे मी कॉकपिटमध्ये स्थान मिळवले.’ त्यानंतर को-पायलट ते पायलट असा प्रवास करत त्या गेली 31 वर्षे कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सोपा नव्हता.
सुरुवातीच्या काळात त्यांना कुटुंबापासून दूर राहावे लागले. त्या म्हणतात की, ‘पायलट असणे म्हणजे मुलांचे वाढदिवस किंवा त्यांच्या खेळांचे सामने चुकवणे होय, जर तुम्हाला प्रत्येक सणाला घरी राहायचे असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य नाही.’ आज त्या बोईंग 787 उडवतात आणि महिन्यातील सुमारे 12 दिवस प्रवासात घालवतात. क्रूसाठी त्यांचा एकच मंत्र आहे, ‘आपण इतकी सुरक्षित लँडिंग करायची की दुसर्या दिवशी बातम्यांमध्ये नव्हे, तर प्रवाशांच्या मनात आपली जागा निर्माण व्हावी.’ अमेरिकेतील एअरलाईन्समध्ये केवळ कॉकपिटच नव्हे, तर केबिन क्रूच्या भूमिकांमध्येही लिंगभेद होता. काही एअरलाईन्समध्ये पुरुषांना केवळ वरिष्ठ पदे मिळायची, ज्यामध्ये अधिक जास्त वेतन आणि फायदे मिळत. कॅप्टन विल्सन म्हणतात की, ‘माझ्यापूर्वी या क्षेत्रात आलेल्या महिलांचे मी आभार मानते. त्यांनी या पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांचा मार्ग मोकळा केला, ज्यामुळे मला आज येथे पोहोचता आले.’