Captain Abhilasha Barak | कॅप्टन अभिलाषा बराक 
संपादकीय

Captain Abhilasha Barak | कॅप्टन अभिलाषा बराक

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

स्वप्नांना कोणताही लिंगभेद नसतो आणि नेतृत्व, धैर्य किंवा मानवतेची सेवा करण्याची इच्छा यामध्येही कोणताही भेद नसतो, हे अनेक महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर दाखवून दिले. यामध्ये भारतीय महिलांही मागे नाहीत, हेसुद्धा वारंवार सिद्ध झाले आहे. जागतिक पटलावरही भारतीय महिलांनी डंका वाजविला आहे. यामध्ये आणखी एका भारतीय महिलेचा समावेश झाला आहे, त्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट (लढाऊ विमानचालक) कॅप्टन अभिलाषा बराक होत.

शांतता मोहिमांमध्ये महिलांची भूमिका आणि त्यांचे दृष्टिकोन वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नुकतेच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या 'मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तुम्ही सेवा करत असलेल्या लोकांसाठी आणि तुमच्यासोबत सेवा करणाऱ्यांसाठी एक आदर्श मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हा पुरस्कार प्रदान करताना काढले आहेत. यावर अभिलाषा म्हणतात की, जगात शाश्वत शांतता तेव्हाच प्रस्थापित होऊ शकते जेव्हा प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक व्यक्ती सक्षम होईल.

अभिलाषा यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोनातून लष्करी कारवायांमध्ये महिला, शांतता आणि सुरक्षा विषयक अजेंडा पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी स्थानिक समुदायांसोबत दृढ संबंध निर्माण केले, ज्यामुळे पूर्व-इशारा देणारी यंत्रणा स्थापित करण्यात मदत झाली. यामुळे नागरिकांचे रक्षण करण्याची मोहिमेची क्षमता वाढली. अभिलाषा या हरियाणाच्या रोहतक येथील रहिवासी असून त्या एका निवृत्त कर्नलच्या कन्या आहेत. त्यांच्या वडिलांचे ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये शिक्षण सुरू असताना वेलिंग्टन (तामिळनाडू) येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्यांचा जन्म झाला.

अभिलाषा यांनी २०१६ मध्ये ‘दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी सशस्त्र दलाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केले. सप्टेंबर २०१८ मध्ये त्या ‘आर्मी एअर डिफेन्स कॉर्प्स’मध्ये सामील झाल्या. २८ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॉर्प्स ऑफ आर्मी एअर डिफेन्सच्या २५ वर्षांच्या सेवेनिमित्त ‘प्रेसिडेंटस्‌ कलर्स’ प्रदान केले. त्यावेळी अभिलाषा यांनी या तुकडीचे नेतृत्व केले होते. २०२२ मध्ये त्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला लढाऊ विमानचालक बनल्या. त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मधून ‘युनिट ६६५७ आर्मी एव्हिएशन कॉर्प्स’मध्ये आपले एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

मेजर सुमन गव्हाणी आणि मेजर राधिका सेन यांच्यानंतर प्रतिष्ठित ‘मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार’ मिळवणाऱ्या ३२ वर्षीय अभिलाषा या तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या. सध्या त्या ‘युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन’ (यूएनआयएफआयएल) अंतर्गत तैनात असलेल्या भारतीय बटालियनसोबत ‘एन्गेजमेंट टीम कमांडर’ आणि ‘जेंडर फोकल पॉईंट’ म्हणून सेवा बजावत आहेत. यूएनआयएफआयएलमध्ये सेवा बजावणाऱ्या सुमारे ६५० भारतीय शांततासैनिकांपैकी त्या एक आहेत, ज्यामध्ये १३ महिलांचा समावेश आहे. त्यांना मिळालेल्या बहुमानामुळे भारताचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT