तेजाचे पंख वाऱ्यावरि हलवित ती चालती शब्दपंक्ति,
देव्हारा शारदेचा उचलुनि गगनांतुनि ती नेत होती
असे कवी केशवसुतांनी ‘शब्दांनो! मागुते या!’ या आपल्या कवितेत सुरुवातीलाच म्हटले आहे. शब्द जर आपल्या मागे आले, तर ‘बहर मम मनीं तूल येईल फार!’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. सातारा येथे पार पडलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी शब्दांचा नाद दुमदुमला, याचा करोडो मराठी माणसाला आनंदच झाला आहे.
सध्या राजकारणाचा चिखल झाला असून, प्रत्येक क्षेत्रात राजकारण शिरले आहे. त्यामुळे मी मांडलेले विचार हे स्वतंत्र असतील. ते कोणा एका राजकीय संप्रदायाच्या बाजूचे आहेत की विरोधातले, असे ठरवण्याचा बादरायण खटाटोप कृपया करू नये, असे कळकळीचे आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांना करावे लागले. पाटील यांच्यातील कादंबरीकाराला याच सकस मातीने घडवले. पिण्याचे आणि शेतीचे पाणी, तसेच ग््राामीण भागातील उद्ध्वस्त माळराने या पार्श्वभूमीवर ‘पांगिरा’ ही कादंबरी पाटील यांनी फलटणच्या वास्तव्यात लिहिली. व्यंकटेश माडगूळकरांची ‘काळी आई’, आनंद यादव यांचा ‘गोतावळा’, उद्धव शेळके यांची ‘धग’, र. वा. दिघे यांची ‘आई आहे शेतात’ आणि सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ या साहित्यकृतींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या.
शेतीमालाला भाव नसण्याचे, शेतकऱ्याला झुंजवणारे वास्तव नेहमीच दिसते. ही भयानक अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे. बळीराजाच्या आत्महत्यांचे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचेच नव्हे, तर आम्हा लेखक-कलावंतांचेसुद्धा अपयश आहे, अशी कबुली पाटील यांनी दिली. साहित्यिकांनी समाजाला आरसा दाखवायचा असतो आणि आरशात स्वतःचे तोंडदेखील पाहायचे असते. पाटील यांनी मराठी साहित्यिकांच्या अपयशाकडे लक्ष दिले, हे बरे झाले. 13 कोटींच्या या महाराष्ट्रामध्ये मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीची फक्त 35 दुकाने आहेत, याकडे लक्ष वेधताना, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या कार्यालयांसमोर अगदी माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्याची सूचना त्यांनी केली.
अलीकडेच पुणे पुस्तक महोत्सवास साडेबारा लाख नागरिकांनी भेट देऊन 30 लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली. या महोत्सवात 60 टक्के सहभाग तरुणांचा होता. युवकांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला. केंद्र आणि राज्य शासनाने लेखक व प्रकाशक यांच्यावर 18 टक्के जीएसटी लावला आहे. तो तत्काळ रद्द करावा, अशी अत्यंत रास्त मागणी विश्वास पाटील यांनी केली. तसेच 2012 पासून राज्यातील मराठी शाळेच्या कोणत्याही नव्या तुकडीला शासकीय अनुदान मिळत नाही. म्हणजेच गेल्या 13 वर्षांत एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही, या धक्कादायक वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.
याउलट 2025 या एकाच वर्षात इंग््राजी माध्यमाच्या 65 नव्या शाळांना मंजुरी मिळालेली आहे. अभिजात मराठी भाषा म्हणत आपण ढोल वाजवतो; पण आपले वर्तन मायमराठीच्या विकासासाठी कसे घातक आहे, हे संमेलनाध्यक्षांनी पुराव्यानिशीच आपल्या भाषणात मांडले. शिवाय यापूर्वी तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळी आणि उडिया या सहा भाषांना आमच्या आधी ‘अभिजात भाषा’ हा दर्जा मिळालेला आहे. तिकडे त्यांच्या मातृभाषेतील शाळांच्या तुकड्या बंद करण्याचा आवाजसुद्धा काढायची कोणामध्ये धमक नाही. उलट आमच्याकडे मात्र गेल्या 35 वर्षांपासून शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खऱ्या अर्थी घरचे मारेकरी ठरले आहेत, अशी सणसणीत टीका पाटील यांनी करत संमेलनाच्या मंचावरून हे कटू सत्य मांडलेच आणि सुधारणेसाठी त्याबद्दलचा आग््राहही धरला. संमेलनाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल राज्यकर्त्यांनी घेतलीच पाहिजे.
मराठी भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी पायाभूत असे काही आपण करणार की नाही, असा रोखठोक सवाल मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनीदेखील आपल्या भाषणात केला. प्राथमिक स्तरावरील मुलांवर मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे ताराबाईंनी ठासून सांगितले. मात्र, महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच आहे. अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनात देऊन, जनतेला आश्वस्त केले. इंग््राजी, फ्रेंच, जर्मन अशा परदेशी भाषांना आपण पायघड्या घालतो; परंतु भारतीय भाषांना मात्र विरोध करतो, या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली. त्याचाही विचार करावा लागेल. शिवाय मराठीला बाजूला सारून इंग््राजी सक्तीचा अतिरेक करणाऱ्या इंग््राजी माध्यमातील शाळांना बडगा दाखवला पाहिजे.
मराठीची सक्ती आहे, हे खरेच पण; तेवढ्याने चालणारे नाही, मराठी शाळा, विद्यार्थी, पालक, सरकार, धोरण असा सर्वच अंगाने विचार झाला पाहिजे. दलित लेखन हा मराठी साहित्याचा आत्मा आहे. दलित साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून मराठी साहित्य इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग््रास्थानी राहिले, अशी प्रशंसा ज्येष्ठ हिंदी लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांनी संमेलनाचे उद्घाटनपर भाषण करताना केली. मात्र, आज मराठीतील दलित साहित्याचा प्रवाह पूर्वीइतका जिवंत नाही. उलट हिंदीमध्ये अजय नावरियांसारखे तरुण लेखक आपल्या ‘तिसरी दुनिया’ वगैरे लघुकथांमधून दलितांसमोरील आव्हाने मांडत आहेत.
मराठी साहित्य व समीक्षा व्यवहारातून प्रकट होणारे स्त्रीरूप हे पुरुषी नजरेने पाहिलेले आहे. ही घडवलेली स्त्रीप्रतिमा तसेच घडवलेला स्त्रीवाद तोडण्याची गरज अव्वल कवयित्री अनुराधा पाटील यांनी साहित्यसंमेलनात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केली. संमेलनाचे सूप वाजले असले तरी या निमित्ताने सामान्य माणसाने सांस्कृतिक विकासाचाही विचार जाणिवेने केला पाहिजे. भाषा आणि साहित्य हे सांस्कृतिक अभिवृद्धीचे महत्त्वाचे साधन आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास, साहित्य संमेलन हे केवळ उत्सवी स्वरूपातच जिवंत राहील. हा सांस्कृतिक वारसा टिकवण्याची हाक संमेलनाने दिली. तिच्याबद्दलचा हा कळवळा हेच संमेलनाचे संचित!