सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती
बुद्ध पौर्णिमा या पवित्र दिवशी भगवान गौतम बुद्ध यांच्या करुणा, अहिंसा आणि आत्मसाक्षात्काराच्या संदेशाची आठवण होते. बुद्धांनी जगाला शांततेचा मार्ग दिला. त्यांच्या शिकवणीतून प्रेम, संयम आणि सत्य यांचे महत्त्व स्पष्ट होते.
बुद्ध पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मंदिरांमध्ये उत्सव साजरे केले जात असताना, प्रत्येक घरात समृद्धी नांदो, अशी मी प्रार्थना करतो. बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व बंधुभगिनींना शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारताने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांमध्ये बौद्ध धर्म सर्वात अग््रास्थानी आहे. भगवान बुद्धांचे आयुष्य आणि शिकवण आजदेखील जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकत आहे. भारताने जगाला आत्मसाक्षात्काराचे महत्त्व शिकवले. बुद्ध या शब्दाचा अर्थच एक जागृत व्यक्ती असा आहे. मानवतेला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवणाऱ्या या महान विभूतीचा जन्म आणि त्यांना झालेला साक्षात्कार एकाच दिवशी होणे हेदेखील विशेष आहे.
राजपुत्र सिद्धार्थाचे बालपण अत्यंत ऐशोआरामात गेले. वयाच्या 29 व्या वर्षी आपला राजवाडा, पत्नी, पुत्र आणि सर्व ऐहिक संपत्तीचा त्याग करून आध्यात्मिक सत्याच्या शोधात त्यांनी घर सोडले. सहा वर्षांच्या कठोर आत्मक्लेशानंतर बोधगया येथील बोधी वृक्षाखाली त्यांना परमोच्च ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी बुद्धपद धारण केले. चार आर्य सत्यांचा साक्षात्कार आणि नैतिकतेच्या मार्गाचे आचरण यामधूनच एका नवीन तत्त्वज्ञानाचा आरंभ झाला, जे पुढे जागतिक इतिहासात भारताच्या स्थानासाठी अभिमान म्हणून अधिक बहरत गेले. वाराणसीजवळ सारनाथ येथे त्यांनी पाच तपस्वींना आपला पहिला उपदेश दिला. ‘धम्मचक्कप्पवत्तन सुत्त’ किंवा ‘धर्माचे चक्र फिरवणे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या शिकवणुकीतून बौद्ध धर्माचा पाया रचला गेला आणि बौद्ध धर्माचा अधिकृतपणे आरंभ झाला.
कालांतराने, अनेकजण त्यांच्या शिकवणीकडे आकर्षित झाले. मगधचे राजा बिंबिसार यांनी राजगीर येथील वेणुवन (बांबूचे वन) मठ दान केले. श्रीमंत अनाथपिंडिकाने मठ बांधण्यासाठी संपूर्ण जेतवन वनाला सोन्याच्या नाण्यांनी मढवले. अशा कृतींमधून भारतात अस्तित्वात असलेल्या धर्मावरील गाढ श्रद्धेचे दर्शन घडते. बौद्ध धर्माची पायाभूत शिकवण असलेल्या चार आर्य सत्यांचा प्रसार मठांद्वारे केला जातो : इच्छा हे दुःखाचे मूळ कारण आहे, इच्छेचा नाश केल्याने दुःखावर मात करता येते आणि अष्टांग मार्गाचे अनुसरण करून व्यक्ती दुःखापासून मुक्ती मिळवू शकते.
बुद्धांनी दिलेली शिकवण
भूतकाळात रमू नका, आपले मन वर्तमानावर एकाग््रा करा, सत्य हीच शक्ती आहे. आपले मन हे सर्व कृतींचे स्रोत आहे, म्हणूनच सकारात्मक विचारांची जोपासना करा. कठीण काळात मनाला भयग््रास्त होऊ देऊ नका. आयुष्याचा प्रवास हा अंतिमतः वैयक्तिक आहे - या प्रवासाला एका आध्यात्मिक मार्गाची जोड द्या. शब्द जखमा करू शकतात, म्हणूनच सौम्यपणे बोला. प्रेम आणि अहिंसा अत्यंत आवश्यक आहेत. नेहमी शिकत राहा - कधीच थांबू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. त्यांनी म्हटले होते की, भगवान गौतम बुद्धांनी दिलेला जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच होत असते, स्वतःवर मिळवलेला विजय हाच सर्वोत्तम विजय असतो, ही शिकवण गौतम बुद्धांनी आपल्याला दिल्याची जाणीव पंतप्रधानांनी आपल्याला करून दिली होती. आज जग ज्या तणाव आणि संघर्षातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर बुद्धांची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरली असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले होते.
समाट अशोकांच्या उदाहरणातून भगवान बुद्धांच्या शिकवणीने घडून येणारे परिवर्तन आपल्याला ठळकपणे दिसून येते. बुद्ध विचारांच्या प्रभावामुळे समाट अशोक यांच्यासारख्या एका युद्धखोर राज्यकर्त्याचे रूपांतर शांतीच्या पुरस्कर्त्यामध्ये घडून आले होते. समाट अशोक यांनी शिलालेखांच्या आणि स्तूपांच्या माध्यमातून बौद्ध विचारातील तत्त्वांचा देशभर प्रचार-प्रसार केला. आजही जगभरातील असंख्य लोक सांची आणि सारनाथ इथले स्तूप पाहण्यासाठी येतात. सारनाथ इथली सिंहमुद्रा ही तर आता भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. समाट अशोक यांनी, बौद्ध भिक्खू आणि स्वतःच्या कुटुंबासह मिळून, संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्म विचारांचा प्रचार-प्रसार केला. ‘महावंश’ या काव्यातील नोंदींप्रमाणे समाट अशोक यांचा पुत्र महिंदा याने भगवान गौतम बुद्धांची ही शिकवण श्रीलंकेपर्यंत नेली. असे मानले जाते की, बौद्ध भिक्खूंनी तामिळनाडूमध्येदेखील धर्म प्रसारासाठी मदत केली होती, आजही तामिळनाडूच्या अनेक भागांत बौद्ध धर्माच्या खुणा पाहायला मिळतात.
बौद्ध भिक्खूंनी कोणत्याही भेदाभेदाशिवाय मोफत वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी ‘त्रिपिटक’ यासारख्या पवित्र ग््रांथाची शिकवण दिली, ‘जातक’ कथाही त्यांनी शिकवल्या. त्याचवेळी लोकांमधील जनजागृती वाढावी, यासाठी लोकांना ध्यानसाधनेसाठी मार्गदर्शनही केले. दानधर्म, विशेषतः गरिबांना अन्नदान करणे, हे मूलभूत कर्तव्य मानले जात असे. भुकेलेल्यांना अन्न देणे म्हणजे एका अर्थाने जीवन देण्यासारखेच आहे, हीच भावना तमिळ साहित्याने मांडली आहे.
बौद्ध धर्माने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आणि ग््रांथालयांची उभारणी केली. पाचव्या शतकातच नालंदा विद्यापीठ हे शिक्षणाचे एक मुख्य केंद्र म्हणून विकसित झाले होते. येथे सुमारे 10,000 विद्यार्थी आणि 1,500 शिक्षक होते. तामिळनाडूतील कांचीपूरम येथेही प्रसिद्ध विद्यापीठ अस्तित्वात असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. विक्रमशिला आणि ओदंतपुरी यासारख्या विद्यापीठांनी असंख्य साहित्यकृतींसह देशाच्या बौद्धिक उंचीचे दर्शन जगाला घडवले. बौद्ध शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये संपूर्ण आशियातून अनेक विद्वान अध्ययनासाठी भारतात येत असत. चिनी भिक्खू फॅक्सियन/फा-हियान यांनी बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी तब्बल 15 वर्षांची प्रदीर्घ यात्रा केली होती. तर, चिनी भिक्खू ह्युएनसांग यांनी भारतात 16 वर्षे नालंदा येथे अभ्यास करण्यात आणि अनेक ग््रांथ संकलित करण्यात घालवली आणि त्यानंतर ते चीनमध्ये परतले. ह्युएनसांग यांच्या प्रवासवर्णनानुसार, त्यांनी तामिळनाडूतील कांचीपूरमलाही भेट दिली होती, जिथे त्यांनी एका बौद्ध विद्यापीठात वास्तव्य करून अध्ययन केले, हस्तलिखितांची प्रत तयार केली आणि विद्यापीठात विशेष व्याख्यानेदेखील दिली होती.
कठोर तपश्चर्येनंतर अशक्त झालेल्या बुद्धांविषयी करुणा बाळगून सुजातने त्यांना प्रेमाने दुधाची खीर अर्पण केली. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले आणि त्यांना बोधी वृक्षाखाली ध्यान करण्याची शक्ती मिळाली. ‘प्रेम हे आनंदाचा स्रोत आहे, प्रेम हे जगाचा प्रकाश आहे, प्रेम हीच सर्वात मोठी शक्ती आहे’ बुद्धांची ही शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. संपूर्ण जगात प्रेम आणि शांतता नांदो, हीच प्रार्थना.