अबुराव : (मंत्र्याला फोन वर) मी लाचलुचपत खात्याचा अधिकारी बोलतोय. आपल्या माणसाने लाच घेतली आहे.
गब्बुराव : त्या बाबुरावने लाच घेतली. चौकशीत आम्हाला ओढू नका. या भेटायला, बोलू.
अबुराव : आम्हाला भेटायचेच आहे तुम्हाला.
गब्बुराव : सांगून भेटण्यात मजा नाही. अचानक या.
अबुराव : तसंच करतो. पण, त्यात सुदैवानं तुमचं नाव नसावं.
गब्बुराव : नाव असून काय करणार कोण. अंगावरचं शिंगावर घ्यायला लाऊ आम्ही.
अबुराव : म्हणजे हा घोटाळा तुमचा आहे तर? मांजराला उंदराची साक्ष. आलं लक्षात.
गब्बुराव : जुने लागेबांधे आहेत आपल्याशी आमचे. सांभाळून घ्या.
अबुराव : मी इथे आहे तोपर्यंत ते शक्य नाही. मला कारवाई करावी लागेल. तुमचा कॉल रेकॉर्ड झालाय. येतो थोड्याच वेळात.
गब्बुराव : मागच्या वेळी धाड घातलीत तो कर्मचारी बिचारा तुम्हाला हाय देऊन मेला. असली तळतळाटाची कामं कशाला घेता?
अबुराव : तळतळाट कोणाचा घ्यायचा हे ठरवणारे एकमेव खाते- लाचलुचपत खातं.
गब्बुराव : लाचलुचपत लसीकरण राबवतोय आम्ही. बाबुरावला म्हटले ट्रायलच्या आधी लस घे. पकडलं तर लस फेल झाली समज. म्हणून ड्रामा होता हो. काय विशेष नाही त्यात. करोडो रुपये घेतले का?
अबुराव : किती सफाई देताय. अशी लस असते काय? कोणाला गंडवता? मला द्या बघू ती लस. दूध का दूध, लस की लस्सी. होऊनच जाऊदे. सांगा कुठे घ्यावी लागते दंडावर की..?
गब्बुराव : हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख रुपये. विचार करा. वहिनींना विचारा एकदा. सांगून बघा दोन लाखांवर पाणी सोडलं. लस कशी घ्यायची त्याच सांगतील.
अबुराव : तुमची वहिनी म्हणजे माझी बायको खात्यात माझी वरिष्ठ आहे. आपली ही लस तिच्या कानावर घालतो. घ्या म्हटली तर उत्तम नाही म्हटली तर ती लस तुम्ही कुठे घेणार याचा आत्ताच विचार करून ठेवा.
गब्बुराव : ऑ! साहेब ते बिचार्या बाबुरावला वाचवण्यासाठी मी बोललो. माझं त्यात काही नाही. घेऊन जा त्याला.
अबुराव : आम्ही घेऊन जातो त्याला पण आमच्या दोन लसी तयार ठेवा. तुमचं नाव खोडतो. हा हा हा...
गब्बुराव : लयच डोक्याचं दही करता राव! या तयार आहेत लसी. घेऊन जा. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल!