ब्रेन कॉम्प्युटिंग आणि नैतिक चिंता (Pudhari File Photo)
संपादकीय

Brain Computing, Neurotechnology | ब्रेन कॉम्प्युटिंग आणि नैतिक चिंता

आता मशिन फक्त तुमचा चेहरा, आवाज किंवा हालचाली ओळखत नाही, ती तुमच्या मनात उमटणारे विचार तरंग देखील वाचायला शिकत आहे. जगात एक नवी तंत्रज्ञान क्रांती घडते आहे.

पुढारी वृत्तसेवा

कधी तुम्ही नुसता विचार करता ‘आज फेमस हॉटेलची पावभाजी खायची आहे’ आणि क्षणात तुमच्या फोनवर फूड अ‍ॅपकडून कॉल येतो. ‘तुम्ही पावभाजीचा विचार करताय, ऑर्डर करू का?’ एखाद्या पौराणिक कथेप्रमाणे अडचणीत आलेल्या भक्ताने देवाचा मनात धावा करावा आणि देव प्रत्यक्षात समोर उभा राहावा, इतकं ते चमत्कारिक आहे. ऐकायला ही कल्पना जादूसारखी वाटते; पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे ते अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. हीच ती सीमारेषा आहे, जिथे विज्ञान मानवी मनाच्या दाराशी पोहोचले आहे.

आता मशिन फक्त तुमचा चेहरा, आवाज किंवा हालचाली ओळखत नाही, ती तुमच्या मनात उमटणारे विचार तरंग देखील वाचायला शिकत आहे. जगात एक नवी तंत्रज्ञान क्रांती घडते आहे. ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस. म्हणजे मानवी मेंदूचा आणि संगणकाचा समन्वय. याच्या साहाय्याने पक्षाघात झालेल्या रुग्णांना केवळ विचारांच्या जोरावर रोबोटिक हात नियंत्रित करता येतात, तर पार्किन्सन्ससारख्या विकारांवर डीप ब्रेन स्टिम्युलेशन परिणामकारक ठरत आहे. ही झेप निश्चितच मानवी जीवनासाठी वरदान आहे; पण आता हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडून बाजारपेठेत उतरले आहे. स्मार्ट हेडबँडस्, हेडफोन्स आणि स्मार्ट वॉचसारखी परिधान करता येण्यासारखी उपकरणे मेंदूतील संकेत ‘न्यूरल डेटा’ गोळा करू लागली आहेत. विज्ञानाची ही क्षमता म्हणजे माणसाच्या खासगीपणाच्या हक्काच्या अंतिम भिंतीला दिलेली धडक मानली जात आहे.

अमेरिकेतील न्युरालिंक आणि सिंक्रॉनसारख्या कंपन्या या तंत्रज्ञानाच्या मानवी चाचण्या वेगाने करत आहेत. चीन, युरोप आणि इस्रायल या देशांनीही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. यापुढे ज्याच्या हातात ‘मनाशी संवाद साधणारे तंत्रज्ञान’ असेल, त्याच्याकडे निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याची ताकद असेल. युनेस्कोच्या एका अभ्यासानुसार 2014 ते 2021 या काळात जगात ब्रेन कॉम्प्युटिंग क्षेत्रातील गुंतवणुकीत 700 टक्के वाढ झाली आहे.

पण, या तंत्रज्ञान क्रांतीमुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत. मेंदूतील विचारच ‘डेटा’ म्हणून साठवले जाऊ लागले. त्याचे व्यापारीकरण झाले, तर मानवी स्वायत्तता आणि विचार स्वातंत्र्य धोक्यात येईल.

मानसिक पाळत ठेवणे हा शब्द आता विज्ञान कथांपुरता राहिलेला नाही. तो वास्तवातला धोका बनला आहे. याच पार्श्वभूमीवर युनेस्कोने नुकतेच न्यूरोटेक्नॉलॉजीवरील नैतिक शिफारशी स्वीकारल्या आहेत. या शिफारशींनुसार, न्यूरोटेक्नॉलॉजीचा विकास मानवी विचार स्वातंत्र्य, मानसिक गोपनीयता आणि स्वायत्तता अबाधित ठेवून व्हायला हवा. कोणतेही उपकरण वापरण्यापूर्वी व्यक्तीची समजून उमजून दिलेली संमती आवश्यक असावी. ‘न्यूरल डेटा’ हा अत्यंत खासगी असल्याने त्याचे व्यावसायिक शोषण किंवा गुप्त संकलन टाळले पाहिजे. मानवी इतिहासात प्रत्येक वैज्ञानिक क्रांतीने माणसाला पुढे नेलं; पण त्याचबरोबर नैतिकतेची प्रश्नदेखील निर्माण केले. म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती केवळ गतीने नव्हे, तर शाश्वत मानवी मूल्यांच्या प्रकाशात व्हावी, ही काळाची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT