तानाजी खोत
जगातील सर्वात वेगवान आणि अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून जेव्हा ‘ब्रह्मोस’चे नाव घेतले जाते, तेव्हा भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो; मात्र या महाविनाशक अस्त्राच्या जडणघडणीत ज्या व्यक्तीचा मेंदू आणि तांत्रिक दूरद़ृष्टी कार्यरत होती, ते दिग्गज रशियन क्षेपणास्त्र डिझायनर अलेक्झांडर लिओनोव्ह (वय 74) यांचे 5 एप्रिल रोजी निधन झाले. अलेक्झांडर लिओनोव्ह हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्रांतीचे अग्रदूत होते. रशियाच्या विख्यात ‘एनपीओ माशिनोस्ट्रोएनिया’ या एयरोस्पेस कंपनीचे सीईओ आणि मुख्य डिझायनर म्हणून त्यांनी अनेक दशके काम केले. त्यांची खरी ओळख ‘झिरकॉन’सारख्या महाविनाशक हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे जनक म्हणून असली, तरी भारतासाठी ते ‘1ब्रह्मोस’चे मुख्य शिल्पकार आणि मार्गदर्शक होते. लिओनोव्ह यांचे भारताशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते होते.
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी असलेली त्यांची मैत्री हा जागतिक संरक्षण इतिहासातील एक सोनेरी अध्याय आहे. 90 च्या दशकात जेव्हा भारतावर अनेक जागतिक निर्बंध होते, तेव्हा ब्रह्मोस प्रकल्पाचे स्वप्न पाहणार्या या दोन महान शास्त्रज्ञांनी तासन् तास एकत्र काम केले. लिओनोव्ह अनेकदा अभिमानाने सांगायचे की, ‘ब्रह्मोस हे केवळ रशियन पोलादाचे यंत्र नाही, तर त्यात डॉ. कलाम यांची स्वप्ने आणि भारतीय शास्त्रज्ञांची अफाट जिद्द सामावलेली आहे.’ ते जेव्हा जेव्हा भारतात येत, तेव्हा इथल्या लोकांच्या आदरातिथ्यामुळे भारावून जात. ‘रशियात हाडे गोठवणारी थंडी असली, तरी भारतीयांच्या मनातील ऊब मला काम करण्याची नवी ऊर्जा देते,’ असे ते मिश्कीलपणे म्हणत. ब्रह्मोसच्या नामकरणामध्ये या दोन्ही महान शास्त्रज्ञांची भूमिका अत्यंत कळीची होती. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन महान नद्यांच्या नावावरून ‘ब्रह्मोस’ हे नाव निश्चित करून त्यांनी या संयुक्त प्रकल्पातून दोन्ही देशांतील अतूट मैत्रीचा संगम घडवून आणला.
भारताचा मिसाईल प्रोग्रॅम आज ज्या उंचीवर आहे, त्यात ‘ब्रह्मोस एरोस्पेस’चा वाटा सिंहाचा आहे. लिओनोव्ह यांनी रशियन तंत्रज्ञान आणि भारताची भौगोलिक गरज यांचा असा काही अचूक मेळ घातला की, त्यातून ‘ब्रह्मोस’चा जन्म झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ असो वा सीमांवरील तणाव, ब्रह्मोसमुळे भारताचे पारडे नेहमीच जड राहिले. भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच भारताला जागतिक स्तरावर एक ‘संरक्षण निर्यातदार’ देश म्हणून ओळख मिळवून देण्यात लिओनोव्ह यांच्या मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे.
ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करण्याची क्षमता असलेल्या ब्रह्मोसचा ‘महावेग’ हेच शत्रूचे सर्वात मोठे आव्हान आहे. हे अस्त्र ‘डागा आणि विसरा’ या तत्त्वावर काम करते. कमी उंचीवरून उडण्याची क्षमता आणि लक्ष्यावर नेमका मारा करण्याची अचुकता यामुळे क्षेपणास्त्र शत्रूच्या बंकरचा किंवा आधुनिक युद्धनौकेचा काही सेकंदांत चुराडा करते. लिओनोव्ह यांच्या निधनामुळे रशियाने एक कल्पक डिझायनर गमावला असला, तरी भारताच्या भात्यात त्यांनी दिलेले ‘ब्रह्मोस’ नावाचे अस्त्र पिढ्यान् पिढ्या देशाच्या सीमांचे अभेद्य रक्षण करत राहील.