कोकणचा रणसंग्राम सर्वांचीच सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोकणातील आहेत. त्यांना पक्ष भक्कम करायचा आहे. शिवसेना पक्षच मुळात कोकणच्या पाठबळावर उभा राहिला. त्यामुळे त्यांनाही बालेकिल्ला टिकवायचा आहे.
शशिकांत सावंत
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात राष्ट्रवादी-भाजप असे नवे स्नेहबंध तयार होत आहेत. रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकांत हे समीकरण तयार झाले आहे. याचीच पुनरावृत्ती महापालिका आणि जिल्हा परिषदेत होण्याची शक्यता आहे. कोकणात रायगडमध्ये 10, ठाण्यात 2, पालघरमध्ये 4, रत्नागिरीत 6, तर सिंधुदुर्गात 4 अशा नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने नवी राजकीय समीकरणे उदयाला येत आहेत. सिंधुदुर्गात भाजपविरुद्ध बाकी सर्व पक्ष एकत्र येण्याचे समीकरण काही नगरपालिकांत पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात आपले अस्तित्व दाखवण्यासाठी बाकी पक्ष झगडताना दिसत आहेत. विशेषत: सत्तारूढ शिवसेना-भाजपमध्ये अनेक भागात संघर्षाच्या ठिणग्या उडाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महायुती होईल, अशी घोषणा करत महायुतीच्या एकवाक्यतेचे प्रयत्न सुरू केले. रत्नागिरीत शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत विरुद्ध भाजप अशा समीकरणाचाही समेटाचा फॉर्म्युला समोर आला आहे. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरेंसोबत भाजपची युती असल्याने शिंदेंची शिवसेना एकाकी लढणार आहे. ठाण्यातील महत्त्वाच्या दोन नगरपालिकांमध्ये सेना विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळत आहे. बदलापूर आणि अंबरनाथ या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या आणि महत्त्वाच्या नगरपालिका आहेत. या नगरपालिकांमध्ये सत्तेतीलच दोन पक्ष आमने-सामने ठाकल्याने निवडणुकीत खर्या अर्थाने रंगत आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष याच जिल्ह्यातील आहेत; तर दुसर्या बाजूला शिंदे शिवसेनेचा बालेकिल्लाही ठाणेच आहे. त्यामुळे नगरपालिकेनंतर येणारी महापालिका आणि जिल्हा परिषद इथेही हाच फॉर्म्युला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातही सेना-भाजप नगरपालिकेच्या निमित्ताने आमने-सामनेच आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी एकत्र आली आहे, तर महायुती आमने-सामने आहे.
एकूण कोकणात सत्तारूढ पक्षांचे सूत जुळत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकांनंतर जिल्हा परिषद, त्यानंतर महानगरपालिका असा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यांतील राजकीय रणसंग्राम सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनला आहे. या निमित्ताने प्रत्येक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या पक्षाचे बळ वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्या पक्षाची तळागाळात व्यापक ताकद निर्माण होते, तोच पक्ष राज्यात पाय रोवून उभा राहात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे कोकणातील आहेत. त्यामुळे त्यांना कोकणात पक्ष भक्कम करायचा आहे. शिवसेना पक्षच मुळात कोकणच्या पाठबळावर उभा राहिला. त्यामुळे त्यांनाही कोकणचा बालेकिल्ला टिकविण्याचे आव्हान असणार आहे. एकूण कोकणचा हा रणसंग्राम सर्वांचीच सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याने महायुतीचे मानसिक बळ वाढले आहे; तर विरोधी पक्ष काहीसे चिंतेत आहेत. त्यामुळे सत्तारूढ पक्षाला विरोधी पक्षांची फारशी चिंता राहिलेली नाही.
याचाच परिणाम म्हणून महायुतीतील पक्ष आमने-सामने ठाकल्याचे दिसत आहेत. कोकणात भाजपचे दोन खासदार आणि जवळपास भाजपचे 15 आमदार आहेत; तर शिंदेंच्या शिवसेनेचे दोन खासदार आणि 14 आमदार आहेत. हे दोन्ही पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कोकणात एक खासदार व तीन आमदार आहेत. त्यामुळे कोकणातील ताकद वाढविण्यासाठी या पक्षाने भाजपशी हस्तांदोलन करणे पसंत केले आहे.