राज वर्तक
देशातील विविध राज्यांतील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमधून भाजपची वाढती ताकद स्पष्ट होत आहे. काँग्रेससह प्रादेशिक पक्ष कमकुवत होत असताना भाजपची अनेक राज्यांत ‘शत प्रतिशत’कडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसते.
चालू वर्षभरात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, पाँडिचेरी अशा चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळात भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत तरी म्हणावे तसे पाऊल रोवता आलेले नाही. तथापि दक्षिण भारतातील कर्नाटकात भाजपने बस्तान बसवले आहे आणि तिथे काही काळ मित्र पक्षाच्या सहाय्याने सत्ताही मिळविली. दक्षिणेतील दुसरे राज्य आंध्र प्रदेशात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तेलगू देसम, जनसेना आणि भाजप यांच्या आघाडीने सत्ता मिळवली आणि दक्षिणेतील आणखी एका राज्यात कमळ फुलले. दक्षिणेतील तामिळनाडू आणि केरळातील विधानसभा निवडणुकीची परीक्षा भाजपसाठी कठीण असली तरी पश्चिम बंगालचा अपवाद वगळता अन्यत्र भाजपने शत प्रतिशतकडे जोरदार वाटचाल केल्याचे दिसत आहे.
गतवर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दल यांच्या आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. भाजपने 89 आणि जदयुने 85 जागा जिंकल्या होत्या आणि भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असूनही जदयुचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. आता सलग 20 वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणार्या नितीशकुमार यांनी पदत्याग केला असून त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपद आले असून जदयुचे दोन उपमुख्यमंत्री असतील. नितीशकुमार यांच्या मुलाला उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल. अर्थात बिहारची सारी सूत्रे आता भाजपच्याच हाती राहतील, हे स्पष्ट आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या मोठ्या राज्यांप्रमाणे बिहार या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रिपद भाजपकडे आले आहे. शत प्रतिशत भाजपच्या वाटचालीतील हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
तामिळनाडूमध्ये गेल्या निवडणुकीत 133 जागा जिंकत द्रविड मुन्नेत्र कळघमने सत्ता मिळवली होती आणि द्रमुकच्या आधारावर काँग्रेसला 18 जागा मिळवता आल्या होत्या. भाजपने चार जागा जिंकल्या. त्याआधी भाजपचा कोणी आमदार नव्हता. अण्णाद्रमुकला 70 जागा गमवाव्या लागल्या होत्या. तुलनेने द्रमुकची संघटनात्मक ताकद चांगली आहे आणि अण्णाद्रमुककडे तडफदार नेतृत्वाची उणीव आहे. तामिळनाडूत आपले संख्याबळ वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. संख्याबळ वाढणे हे भाजपला दिलासा देणारे ठरेल आणि शत प्रतिशतसाठी पक्षाला बळ मिळू शकेल.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या वेळी भाजपने तृणमूल काँग्रेसला जबरदस्त टक्कर देत 77 जागा जिंकल्या होत्या. तृणमूलने 215 जागा जिंकताना 48 टक्के मते घेतली होती. मात्र भाजपने 77 जागा जिंकताना 37 टक्के मते मिळवली होती. पश्चिम बंगालमध्ये येत्या निवडणुकीत भाजपची आगेकूच झाली तर आश्चर्य वाटायला नको. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे पुरेपूर पानिपत झाले होते व काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. काही राज्यांत काँग्रेस हद्दपार होत चालला आहे. पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकीत काँग्रेस सावरण्याची शक्यता कितपत, हे सांगणे कठीण आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. भाजप म्हणजे शहरी तोंडवळ्याचा पक्ष, असे एकेकाळी म्हटले जायचे. तथापि, भाजपने आपली ही कथित ओळख पुसून शहरी, नागरी नव्हे तर ग्रामीण भागातही आपले वर्चस्व असल्याचे या निवडणुकात दाखवून दिले आहे. मुंबईसह 19 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने तब्बल 1400 जागा जिंकल्या. गतवेळेपेक्षा भाजपने 301 जादा जागांवर कमळ फुलवले. भाजपचा स्ट्राईक रेट (विजयाची टक्केवारी) 63 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे भाजपपुढे तगडे आव्हानच नव्हते, असेच म्हटले पाहिजे. विरोधकांपैकी काँग्रेसने साडेतीनशे पार आणि उद्धव शिवसेनेने दीडशेपार मजल मारली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी काही ठिकाणी हातमिळवणी करूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 35 जागा मिळवता आल्या. भाजपप्रणीत महायुतीला दोन हजारांच्या घरात जागा मिळाल्या तर काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाचशेचा पल्लाही गाठता आला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जिंकलेल्या एकूण जागांमध्ये भाजपने साठ टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. यावरून नागरी भागातील भाजपने निर्विवाद वर्चस्व स्पष्ट होते.
बारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. एकूण 731 जागांपैकी 225 म्हणजे तीस टक्क्यांहून अधिक जागा जिंकत भाजपने ग्रामीण भागात आपला मतदार तयार केल्याचे दाखवून दिले. एकेकाळी ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेस असे समीकरण होते. पण लातूर, कोल्हापूर आणि सांगली वगळता अन्य नऊ जिल्ह्यात काँग्रेसला दोन आकडी जागाही कमावता आल्या नाहीत. अन्य जिल्हा परिषदांत काँग्रेसची पाटी कोरी राहिली. सांगली जिल्हा वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (आणि तेही यश आ. जयंत पाटील यांच्यामुळे) फारसे काही हाती लागले नाही. सांगली वगळता शरद पवारांच्या पक्षाला अन्य ठिकाणी अवघ्या आठ जागा मिळाल्या आणि उबाठाला कुठेही दोन अंकी आकडा गाठता आला नाही. ग्रामीण भागात भाजपने भक्कम जनाधार मिळवला आहे आणि साडेतीन वर्षांनी होणार्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज या आकडेवारीवरून करता येतो.
तामिळनाडू, केरळ वगळता भाजपची अन्य राज्यांत जोरदार घोडदौड चालली आहे आणि काँग्रेससारख्या राष्ट्रव्यापी पक्षाची ससेहोलपट सुरू आहे. त्याचबरोबर अनेक प्रादेशिक पक्षही दुर्बल होत चालले आहेत. पंजाबात एकेकाळी अकाली दल सत्ताधारी पक्ष होता. त्याची वाताहत झाली आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या प्रादेशिक पक्षांची ताकद घटल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उखडल्याचे दिसत आहे. ही पोकळी भाजप झपाट्याने भरून काढत आहे. काँग्रेस पक्षाकडे प्रभावी नेतृत्व नाही, संघटना विस्कळीत आहे, प्रादेशिक पातळीवरही मातब्बर नेतृत्व नाही. अनेक प्रादेशिक पक्षांची स्थितीही अशीच आहे. त्यामुळे येत्या काही काळात भाजपकडे इनकमिंग सुरू झाले तर आश्चर्य वाटायला नको.
खरे म्हणजे एके काळी काँग्रेसने प्रादेशिक पक्ष नामोहरम केले. त्या त्या पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये गेले. आता चक्राने उलटफेर घेतला आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होत असून भाजपची शत प्रतिशतकडे दमदार वाटचाल चालली आहे.