मृणालिनी नानिवडेकर
मुंबई आमची हे आहे देशाचा कारभार हाकणार्या भाजपचे ध्येय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यासाठी समवेत घेतले जाईल; पण खरी जबाबदारी असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत नवे अध्यक्ष अमित साटम यांची!
अमित भास्कर साटम या तरुण आमदारावर भाजपने सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. भगव्या एकीत बेकी झाली. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप बरोबरीत पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असा बोध घेत वेगळी वाट चोखाळली, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करत असतात. तो खरा असो का खोटा; भाजप - शिवसेना संबंध ताणले गेले आणि पुढे महाभारत घडले. या भवती न भवतीची राजकीय किंमत त्या त्या पक्षांनी चुकवली, पुढेही चुकवत राहतील. आज शिंदे यांच्या बंडाने आक्रसलेली शिवसेना (ज्याला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे) आणि विस्ताराची भूक लागलेल्या भाजपदरम्यान महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड घमासान होणार हे स्पष्ट दिसते आहे. मुंबई कुणाची हा प्रश्न धसास लागणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून साम, दाम, दंड, भेद अशा सर्व आयुधांचा वापर केला जाणार हे निश्चित. बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशापासून तर मुंबई मराठी माणसाची इथवरचे सगळे मुद्दे ऐरणीवर येतील. शिवसेना हा मुद्दा भाजपला गौण होता, असे राजकीय विश्वाला दाखवायचे असेल तर मुंबई जिंकणे आवश्यक आहे. साटम या मावळ्यावर नियतीने सोपवलेली जबाबदारी त्यामुळेच फार मोठी आहे.
महाराष्ट्रात भाजपला व्यापक जनाधार देणार्या सर्वात महत्त्वाच्या नेत्याकडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून साटम काम पाहू लागले. भाजयुमोची जबाबदारी होतीच. ते पक्षात काम करत असतानाच मतदारसंघ बांधू लागले. नगरसेवक टर्म सुरू असतानाच ते अंधेरी पश्चिममधून निवडणुकीला उभे राहिले आणि 2014 साली साटम निवडूनही आले. 2014 साली विधानसभेच्या निवडणुका भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या लढवल्या होत्या. तरीही साटम निवडून आले. त्या मतदारसंघाचे पूर्वी प्रतिनिधित्व करणारे काँग्रेस नेते अशोक जाधव लोकप्रिय नेते आहेत. 2014 साली त्यांना कमी मते पडली. पण शिवसेनेचे उमेदवार जयवंत परब यांच्यापेक्षा जास्त. 2019 आणि केवळ काही महिन्यांपूर्वी झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकातही अशोक जाधव यांनी 50 हजारांवर मते मिळवली. शिवसेना मात्र मागे पडली. या दहा वर्षांत मुंबईच्या उपनगरात भाजपला प्रचंड यश मिळू लागले. साटम यांचा मतदारसंघही याच परिसरातला. मुंबईतल्या गरीब-श्रीमंतांना भावणार्या योजना साटम यांनी सुरू केल्या.
सिव्हिल सोसायटी या नावाने ओळखला जाणारा नागरिकसमूह हा साधारणत: भाजपच्या हिंदुत्ववादाशी फटकून वागणारा वर्ग. पण या वर्गातील चळवळ्या समाजहितैषींना समवेत घेऊन साटम यांनी जुहूचा जगप्रसिद्ध समुद्रकिनारा कचरामुक्त केला, सौंदर्यीकरण योजना राबवल्या. महानायक अमिताभ बच्चन हे साटम यांच्या मतदारसंघाचे रहिवासी. त्यांना समवेत ठेवून साटम यांनी काही उपक्रम राबवले. मतदारसंघातल्या प्रत्येक सोसायटीतल्या नागरिकांची माहिती असलेले सॉफ्टवेअर साटम यांनी विकसित केले. ते मराठा समाजातले मराठी तरुण आहेत. या तिन्ही गोष्टींचे भाजपला कमालीचे महत्त्व. राज्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा मते समवेत हवीत, मुंबई जिंकायची असेल तर मराठी चेहरा हवा. देशभर नेतृत्वात पिढीचा बदल घडवायचा असल्याने भाजपला तरुण चेहर्यांचा शोध असतो. स्थानिक आणि राष्ट्रीय अशा चाळणीत साटम बसले, अध्यक्ष झाले. त्यांना मोठे पद, अगदी शहर अध्यक्षपदही मिळू शकेल हे गेल्या काही वर्षांपासून गृहित धरले जात होते. तसे घडलेही. पद मिळाले की जबाबदारी वाढते, आव्हाने उभी राहतात. साटम यांच्या या उदयाने अस्वस्थ झालेल्या भाजपच्या बड्या नेत्यांची, आमदारांची संख्या कमी नाही. या सगळ्या मंडळींचे काम मोठे आहे. अतुल भातखळकर, पराग अळवणी, योगेश सागर, मनीषा चौधरी असे चांगले आमदार संघटनकौशल्य बाळगून आहेत. सुनील राणे यांना विधानसभा लढू दिली नाही. पण तेही प्रभावी नेते आहेत.
सहकाराच्या माध्यमातून भाजपला पडत्या काळात मविआ सत्तेत नसताना प्रचंड मदत करणार्या प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळेल असे बोलले जाई. ते मविआ सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते होते. त्यांना सत्ता आल्यानंतर मंत्री केले नाही तेव्हापासून ते मुंबईचे अध्यक्ष होणार असे गृहित धरले गेले होते. मात्र ते मनसेतून, बाहेरून आले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी असलेल्या प्रकाश सुर्वे यांना निवडणुकीत हरवता आले नाही. भाऊ प्रकाश दरेकर यांनाही महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यातच ते प्रमुख असलेल्या मुंबै बँकेसंबंधातील आरोपांची निकालात गेलेली प्रकरणे दिल्लीत पोहोचवली गेली. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने संधी नाकारली गेली, अशीही कुजबूज आहे. खरे कारण कोणतेही असो, अपेक्षित होते ते घडले नाही. दरेकर यांच्यावर अन्याय झाला असे काहींना वाटते. आता या सर्व बड्या नेत्यांना समवेत घेऊन साटम यांना अध्यक्षपद सांभाळत भाजपला मुंबई जिंकवून द्यायची आहे. मुंबईत भाजपने शिवसेनेसमोर दुय्यम भूमिका पत्करली. मुंबई, महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ आणि देशाच्या स्तरावर तुम्ही मोठे भाऊ असे शिवसेनेचे भाजपला सांगणे असे. त्यात 2014 नंतर मोदी पर्वात मोठा बदल झाला. पण त्यापूर्वी मुंबईत भाजपची मशागत किरीट सोमय्या, विनोद तावडे यांनी केली.
2010 नंतर 30 च्या वर नगरसेवक तावडे यांच्या व्यूहरचनेने निवडून आले. समाजवादी पक्षाच्या मदतीने मधू चव्हाण विधान परिषदेवर पोहोचले. 2017 साली या जागांत 51 ची वाढ नोंदवत भाजप 82 वॉर्डात निवडून आला. सेनेपेक्षा केवळ दोनने कमी. आता वॉर्डांचे सीमांकन झाले आहे. त्यात फार बदल नाही. शिवसेना फुटली आहे. उत्तर भारतीय मतदार काँग्रेसऐवजी भाजपकडे वळला आहे आणि स्थिरावलाही आहे. दुसरीकडे राज-उद्धव यांच्या संभाव्य युतीचा धोका आहे. तावडे यांच्यासमवेतच सक्रिय झालेल्या आशिष शेलार यांनी 2017 साली मजबुतीने मुंबईचे पक्षप्रमुखपद सांभाळले. त्यानंतर मंगलप्रभात लोढा त्या पदावर गेले. मग पुन्हा शेलार, आता साटम. गेल्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुंबईची सूत्रे सांभाळत होते. आताही ते असतीलच. त्यांनाही केंद्राला मुंबई जिंकून द्यायची आहे. बेकीचा हिशेब अद्याप बाकी आहे, असे भाजपला वाटत असेल तर मुंबईतील सत्तेचा लंबक ‘मातोश्री’वरून हलवण्याचे आव्हान साटम यांच्यासमोर आहे.