बंगळूर : जगभरातील पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि गाण्यांमध्ये अफाट विविधता पाहायला मिळते. बुलबुलची संगीतमय शिळ असो किंवा गाणाऱ्या इतर पक्ष्यांचे आवाज, प्रत्येक पक्ष्याचे गाणे वेगळे वाटते. मात्र, एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनातून पक्ष्यांच्या या संगीताबद्दल अत्यंत थक्क करणारा खुलासा झाला आहे. जगातील सर्व गाणाऱ्या पक्ष्यांचे संगीत केवळ ८ मूलभूत स्वरांवर आधारित आहे. फ्रान्स आणि अमेरिकेतील संशोधकांनी मशिन लर्निंग या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील ३,००० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींच्या १ लाखापेक्षा जास्त गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे विश्लेषण केले. या अभ्यासातून पक्ष्यांच्या गाण्यांचे हे ८ मुख्य घटक किंवा मूलभूत ध्वनी शोधून काढण्यात आले आहेत.
संशोधनानुसार, कोणताही पक्षी एका गाण्यात सरासरी या ८ पैकी ५ स्वरांचा वापर करतो. पक्षी कोणते स्वर निवडतात, हे त्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासावर अवलंबून असते. आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय घनदाट जंगलांमध्ये राहणारे पक्षी सोपी गाणी गाणे पसंत करतात. कारण, ही सोपी गाणी झाडांच्या घनदाट पालापाचोळ्यातून सहज आणि स्पष्टपणे खूप दूरवर प्रवास करू शकतात.
याउलट, युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या समशितोष्ण प्रदेशातील पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र लहान असते आणि त्यांचा प्रजननाचा काळही कमी असतो. त्यामुळे कमी वेळेत जास्त माहिती देण्यासाठी हे पक्षी अधिक गुंतागुंतीची आणि माहितीने समृद्ध गाणी गातात. मानवी भाषेप्रमाणेच पक्ष्यांची गाणीही विशिष्ट व्याकरण आणि स्वरांवर आधारित असतात. या संशोधनामुळे पक्ष्यांचे एकमेकांशी होणारे संवाद आणि हवामानानुसार त्यांच्यात झालेले बदल समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.