सहा महिन्यांवर आलेली बिहार विधानसभेची निवडणूक पुन्हा जुन्याच राजकीय वळणावर जाताना दिसते. यावेळीही केंद्रस्थानी आहेत संयुक्त जनता दलाचे नेते, मुख्यमंत्री नितीश कुमार. त्यांना सोबत घेण्याशिवाय भारतीय जनता पक्षासमोर पर्याय दिसत नाही; तर, तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सत्ताधार्यांसमोर आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
एकेकाळी तिसर्या आघाडीचे नेतृत्व करणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांना सोबत घेऊन बिहारमधील ‘लालू पर्वा’ला धक्के देण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय जनता पक्षासमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. राज्याला पुढे नेईल आणि पक्ष संघटना वाढवेल, असे खंबीर नेतृत्व तयार करण्यात अपयश आल्याने पुन्हा नितीश कुमार यांनाच सोबत घेत भाजपला निवडणुकांचा डाव मांडावा लागत आहे; तर नितीश कुमार या संधीचा लाभ उठवण्याच्या तयारीत आहेत. सत्तेचा नवा प्रयोग त्यांनी न केला तरच नवल!
गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाने लालूप्रसाद यादव आणि त्यांचे राजकारण मोडीत काढण्याचे अनेक प्रयत्न केले. लालूप्रसाद हे निमित्त असले तरी जनता दल आणि डाव्यांचे राजकारण पक्षाला संपवायचे आहे. तिसर्या आघाडीच्या सरकारच्या काळात जनता दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर जनता दलाचे अनेक तुकडे झाले. चारा घोटाळ्यात अडकलेले लालूप्रसाद आणि मंडळींना वेसण घालण्यासाठी नितीश कुमार यांच्यासारखा राज्यावर पकड असणारा नेता हाताशी लागल्याने भाजप राज्यात पद्धतशीरपणे विस्तारला. गेल्या विधानसभा निवडणुकीत 78 जागा मिळूनही 45 जागा मिळवलेल्या संयुक्त जनता दलाला सत्तेची सूत्रे देताना नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची माळ भाजपने घातली. भाजपची ही राजकीय अपरिहार्यता संपली आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. त्याचे कारण संपूर्ण बिहारवर राजकीय पकड असलेला एकही नेता पक्षाकडे नाही. संघटनात्मक स्तरावर फारसे काम झालेले नाही, जे आणि जसे आहे तेथेच आहे. त्यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोडीला पुन्हा निवडणुकीची धुरा शिरावर घ्यावी लागते आहे. पक्षाध्यक्ष नड्डा यांच्यासह या दोघांनीही निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून नुकताच झालेला मंत्रिमंडळ विस्तार हा त्या मोहिमेचाच भाग. नितीश कुमार यांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, याचे भान ठेवत पंतप्रधान मोदी ‘लाडला मुख्यमंत्री’ असा त्यांचा उल्लेख करायला विसरलेले नाहीत.
मात्र, हा ‘लाडला मुख्यमंत्री’ भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचे डावपेच लढतोय की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालटात त्यांनी आपल्या संयुक्त जनता दलाच्या खात्यांना आणि मंत्र्यांनाही कोणताच धक्का लावलेला नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुन्हा आपल्यालाच समोर करावे, यासाठी ते रणनीती आखत आहेत. चिरंजीव निशांत कुमार याचे ‘पॉलिटिकल लाँचिंग’ त्यांना निवडणुकीतच करायचे आहे. भाजपला आतापासूनच खिंडीत पकडण्यासाठी विरोधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू पुत्र तेजस्वी यादव यांच्याशीही त्यांनी हातमिळवणी सुरू केल्याचा आरोप होतो. राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातही ‘पलटूराम’ अशी प्रतिमा असलेले आणि एनडीएत भाजपबरोबर काम करताना स्थानिक राजकारणात इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संधान बांधणारे नितीश कुमार यांची सत्तेची भूक संपलेली नाही. कधी एनडीए तर कधी महागठबंधन (इंडिया)सोबत त्यांनी सरकार बनवल्याचा ताजा इतिहास आहे. ते यावेळी काय करणार हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नितीश कुमार हेच असतील, असे त्यांचे पुत्र सांगत आहेत. त्यामागे त्यांचीच रणनीती आहे, हे लपून राहिलेले नाही. भाजपने निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे जाहीर केले असले तरी खरी परीक्षा आहे ती जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची. नितीश कुमार त्यासाठी कसे तयार होणार हा प्रश्न आहे.
अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची भाषा करण्याच्या तयारीत ते आहेत. भाजपला स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी 122 जागा आणाव्या लागतील. सध्याच्या 78 जागांवरून ही मोठी झेप घ्यावी लागेल. दोन्ही जनता दल आणि भाजप अशी झालेली राज्याची त्रिशंकू कोंडी फोडण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. राजकारणावरील प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा भारतीय जनता पक्षासाठी त्रासदायक ठरतो आहे. प्रादेशिक अस्मिता आणि राज्याच्या जातीय उतरंडीत विभागलेल्या राजकारणात राष्ट्रीय अस्मिता जागवण्यात पक्षाला अपयश आले आहे. कोणी करिष्मा घडवण्याची ताकद असणारा नेताही येथे दिसत नाही. पक्षाने प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांचा ‘एक व्यक्ती एक पद’ धोरणानुसार मंत्रिपदाचा अलीकडेच राजीनामा घेतला. त्यांना महसूल मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पूर्ण वेळ निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिमंडळातील फेरबदल आणि त्यात पक्षाच्या नव्या चेहर्यांचा समावेश केला असला तरी येत्या सहा महिन्यांत हे नवे मंत्री काय काम करणार आणि समाजाला कसे जोडणार हा प्रश्नच आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू पुत्र तेजस्वी यादव निवडणुकीत आक्रमकपणे उतरतील असे दिसते.
भारतीय जनता पक्षाइतकेच पक्षीय बलाबल (79) या पक्षाकडे आहे आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते शोधत आहेत. भाजपच्या केंद्रीय यंत्रणांना त्रासलेल्या लालूप्रसाद यादव मंडळींना त्यातून कोणत्याही परिस्थितीत सुटका हवी आहे. राज्याची यंत्रणा ताब्यात ठेवण्यासाठी नितीश कुमार यांना सोबत घेण्याशिवाय त्यांच्यासमोरही पर्याय नाही. एका आघाडीच्या राष्ट्रीय माध्यम संस्थेने केलेले निवडणूकपूर्व प्राथमिक सर्वेक्षण राष्ट्रीय जनता दलाच्या बाजूने जाताना दिसते. बिहारी जनतेला आणखी एक संधी तेजस्वी यादव मागत आहेत. विधानसभा निवडणुकांतून सपाटून मार खाणारी काँग्रेस यावेळीही काही चमकदार कामगिरी करू शकेल असे चित्र नाही. काँग्रेसकडे केवळ 19 आमदार आहेत. ते टिकवून ठेवता आले तरी खूप झाले. पंतप्रधान मोदी, शहा यांच्या दौर्यांमुळे पाटण्याची हवा तापू लागली आहे. गेली 45 वर्षे सक्रिय राजकारणात असलेले, एकेकाळी पंतप्रधानपदाचे दावेदार, माजी केंद्रीय मंत्री आणि सर्वाधिक सातवेळा मुख्यमंत्रिपदावर राहिलेले नितीश कुमार किती काळ पंतप्रधानांचे ‘लाडके’ राहणार हे पाहावे लागेल!