सोन्या-चांदीला झळाळी Pudhari File Photo
संपादकीय

सोन्या-चांदीला झळाळी

पुढारी वृत्तसेवा

गुंतवणुकीसाठीचे अनुकूल धोरण, उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे येत्या काही वर्षांत भारतात दरवर्षी 100 अब्ज डॉलर एफडीआय म्हणजेच परदेशी गुंतवणूक आकर्षित होईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभागाने दिली आहे. केंद्र सरकारने देशातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी संरक्षण, रेल्वे, विमा आणि दूरसंचार यासारख्या क्षेत्रांचे नियम सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. काही क्षेत्रे वगळता बहुतांश क्षेत्रांमध्ये एफडीआयला विनाशर्त परवानगी आहे. गेल्या दहा वर्षांत विदेशांतून 667 अब्ज डॉलर इतका निधी भारतात आला. त्याआधीच्या दहा वर्षांत तो याच्या निम्म्यापेक्षाही कमी होता. तैवानमधील फॉक्सकॉन कंपनी भारतात सुमारे एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. स्मार्ट फोन डिस्प्ले मोड्युल जोडणी प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यासाठी तिच्यामार्फत गुंतवणूक केली जाऊ शकते. देशाच्या द़ृष्टीने या सर्व सुवार्ताच असून, त्यातच आता सोन्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव प्रतिगॅ्रम 90 रुपयांनी वधारून तो 77 हजार 850 रुपयांवर पोहोचला आहे. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोला तीन हजारांची उसळी घेऊन 93 हजारांवर गेला आहे. आता नवरात्र जवळ आले असून, विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य लोक आणि खासकरून गृहिणी सोन्या-चांदीची खरेदी करतात अथवा थेट सुवर्णालंकार घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात.

ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीचे भाव चढे आहेत. ‘एमसीएक्स’ या कमोडिटी बाजारावर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 1.33 टक्क्यांनी वाढून 76 हजार 950 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव प्रतिकिलोला 419 रुपये म्हणजेच सुमारे अर्धा टक्क्याने वाढून तो 91 हजार 974 रुपयांवर गेला आहे. जागतिक धातू वायदे मंच ‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रतिअंस 2,681 डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. मुळात अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे व्यापार-उद्योग क्षेत्रात कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. भारतात सेन्सेक्स आणि निफ्टीचे उच्चांकी शिखर गाठले जात आहे. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने लेबनॉनवर तुफानी हल्ले सुरू केले आहेत. उद्या लेबनॉनकडून आणखी प्रतिहल्ले होऊ शकतात. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदार अधिक आकर्षित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिअंस 3,200 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सोन्याने वायदे बाजारात प्रतिदहा ग्रॅमला 76 हजार रुपयांची पातळीही गाठली आहे. थोडक्यात, आगामी काळात सोन्याच्या भावातील तेजी कायम राहणार आहे. यंदाच्या वर्षात सोने आणि चांदी या दोन मालमत्ता अनपेक्षितपणे तेजीत आल्या. याचे कारण, रशिया-युक्रेन युद्ध आणि गाझापट्टीतील इस्रायलचे बॉम्ब हल्ले. ज्या ज्या वेळी युद्धे होतात, तेव्हा सोन्या-चांदीमध्ये लोक जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात. शिवाय शेअर बाजारात मागच्या तीन महिन्यांत दोन वेळा फ्लॅश करेक्शन्स किंवा तीव्र घसरण झाली. मिड व स्मॉल कॅप प्रवर्गातील शेअर्सची जोरदार विक्री झाली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. अशावेळी लोक गुंतवणुकीचा पर्यायी मार्गही पसंत करतात, त्याचवेळी सोन्याने डॉलरच्या चलनात विक्रम केला आणि चांदीही 30 टक्क्यांहून अधिक वाढली होती.

अगदी मेअखेरीसही अशी स्थिती होती की, निफ्टी, सेन्सेक्स किंवा बँक निफ्टी या निर्देशांकांपेक्षा सोने-चांदी या धातूंनी जास्त परतावा दिला होता. म्हणजे गुंतवणूकदारांची चांदी झाली होती. सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून आपली संपत्ती बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन आणि सोने-चांदीसारख्या कमोडिटी मार्केट अशा विविध ठिकाणी गुंतवली जाते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यास शेअर बाजारात ‘करेक्शन’येईल, अशी भीती यापूर्वीच होती. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच कमोडिटीचे आकर्षण वाढले होते. त्यात गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केली; पण कपातीबाबतच्या या अपेक्षा मागील वर्ष-सव्वा वर्षे कमोडिटी बाजारात धमाल घडवून आणत होत्या. सोन्या-चांदीचे भाव भडकतात, तेव्हा आभूषणांचे म्हणून जे खरेदीदार असतात, त्यांच्या द़ृष्टीने खिशाला मोठीच कात्री लागते. उलट जे गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे बघतात, त्यांना ती विक्रीची सुवर्णसंधी वाटते. सरकारचे सॉव्हरिन गोल्ड बाँडस् असून, त्यात प्रचंड संख्येत लोक गुंतवणूक करतात. आता तर रिझर्व्ह बँकेच्या अ‍ॅपवरून त्यात थेट गुंतवणूक करता येते. त्यामुळे भाव तेजीत असताना विक्रीची संधी मिळू शकते.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार उझबेकिस्तान आणि थायलंडने मे महिन्याच्या अगोदरच विक्रमी किमतीचा लाभ घेऊन सोने विक्री केली. उद्या जगातील युद्धजन्य स्थिती काबूत आली आणि भू-राजकीय स्थैर्य येऊ लागले, तर अन्य देशही सोने विक्री करण्याची शक्यता आहे. अशावेळी सोन्या-चांदीचे दर वेगाने घसरू शकतात. भारतात गेल्या आर्थिक वर्षात सलग एकूण 5,500 कोटी रुपयांच्या ‘गोल्ड ईटीएफ’च्या खरेदीनंतर एप्रिल 2024 मध्ये 440 कोटी रुपयांची ईटीएफ विक्री झाली. लहान गुंतवणूकदारांना सोन्याच्या तुलनेत चांदी कमी पैशात जास्त मिळत असल्यामुळे चांदी घेणे त्याला आवडते. भारत व अन्य विकसित देशांमध्ये चांदीच्या वस्तू आणि चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढू लागली आहे. जगभर सौर ऊर्जेकडे लोक वळत असल्यामुळे त्यामध्ये वापरण्यात येणारी पॅनेल्स, मायक्रो चिप्स, सेमीकंडक्टर यांचा वापर असलेल्या अतिउच्च तंत्रज्ञान क्षेत्रात चांदी वापरली जाते. म्हणजेच चांदीचा औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणात होतो. एक गुंतवणूक म्हणूनही सोन्यापेक्षा चांदीची खरेदी ही ईटीएफद्वारे केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. केवळ दसरा-दिवाळीत सोने खरेदी करायची या परंपरेच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराचा सावधगिरीने विचार करणे श्रेयस्कर राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT