डॉ. एस. एल. भैरप्पा  (Pudhari File Photo)
संपादकीय

Bhyrappa Writer | भारतीयत्वाला साद घालणारा साहित्यिक

कन्नड भाषेतून लिहिणारे भैरप्पा यांच्यासारखे साहित्यिक त्यांच्या लिखाणामुळे मराठी वाचकांनाही आपलेसे वाटतात. कधी कधी हा लेखक कन्नड आहे, यावर अन्य भाषिक वाचकांचा विश्वास बसत नाही.

पुढारी वृत्तसेवा

कोणत्याही भाषेतील अस्सल साहित्य हे कोणत्याही चौकटीत कधीही सीमित राहात नाही. मर्यादांच्या शक्यता ओलांडून ते रसिकमनांचा ठाव घेते. साहित्यातील अस्सल अनुभव वैश्विक पातळीवर झपाट्याने विस्तारतात. त्यातून साहित्यिक कलाकृती अमर्याद बनते. या कसोटीवर कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे साहित्य शंभर टक्के उतरते. नुकतेच भैरप्पा यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

शिवाजी शिंदे

कन्नड भाषेतून लिहिणारे भैरप्पा यांच्यासारखे साहित्यिक त्यांच्या लिखाणामुळे मराठी वाचकांनाही आपलेसे वाटतात. कधी कधी हा लेखक कन्नड आहे, यावर अन्य भाषिक वाचकांचा विश्वास बसत नाही. लेखणीतून भारतीयत्वाचा शोध घेणारा सरस्वती पुत्र म्हणजे लेखक भैरप्पा. चार दशके कन्नड साहित्यासह भारतीय साहित्य विश्वामध्ये स्वतःचा आगळा ठसा उमटविणारे डॉ. भैरप्पा हे भारतीय वाचकांच्या गळ्यातले ताईत. त्यांचे बंगळूरमध्ये नुकतेच निधन झाले आणि साहित्य विश्वावर दुःखाची कळा पसरली. अभ्यासक, संशोधक, वाचक, लेखक साहित्यिक डॉ. भैरप्पा हे साहित्य विश्वातले आणि कन्नड कादंबरी प्रांतातले महामेरू. कन्नड कादंबरी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. कन्नड साहित्याला पहिला सरस्वती सन्मान मिळवून देणार्‍या संतेशिवर लिंगनय्या भैरप्पा यांच्या अनेक कादंबर्‍या मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, तामिळ, इंग्रजीसह भारतातील बहुतेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.

भैरप्पा यांचा जन्म 26 जुलै 1934 रोजी हसन जिल्ह्यातील चन्नरायणपट्टण तालुक्यातील संताशिवरे नावाच्या गावात झाला. बालपणातच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीत गेले. बालपणी त्यांनी घरकाम, पौरोहित्य, हॉटेलकाम, अगरबती विक्रेता, सिनेमा थिएटरमध्ये गेटकीपर, रेल्वे स्थानकावर कुली म्हणूनही काम केले. डॉ. भैरप्पा यांनी 25 कादबंर्‍यांसह 35 पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या बहुतेक पुस्तकांच्या 33 हून अधिक आवृत्या प्रसिद्ध झाल्या.

सर्वाधिक खप असणार्‍या कादंबर्‍यांचा लेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांची पहिली कादंबरी भीमकाय ही 1958 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर बेळकु मुडीदु, धर्मश्री, दूर सरीदरू, निराकण, ग्रहण, दाटू, अन्वेषण, पर्व, नेले, साक्षी, अंचू, तंतू, सार्थ, मंद्र, आवरण, कवलू, यान, उत्तरकांड, मतदान, वंशवृक्ष, जलपात, नाही नेरळु, तब्बलियु निनदे मगने, गृहभंग इत्यादी कादंबर्‍यांची रचना; ‘भीती’ हे आत्मचरित्र आणि सत्य आणि सौंदर्य (डॉक्टरेट प्रबंध), साहित्य आणि गद्य, कथा आणि कथानक इत्यादी साहित्य-तत्त्वशास्त्रांच्या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांवर चित्रपटांची निर्मिती झाली.

भारतीय संस्कृतीतील शाश्वत तत्त्वांचा मागोवा घेत मनुष्यत्वाचा खोलवर वेध त्यांच्या कादंबरीतील पात्रे घेतात. भारतीय संस्कृतीचा भव्य वारसा, तत्त्वज्ञान, वेद, उपनिषदे, मानवी संघर्ष, शाश्वत विचार यांच्या विचारमंथनातून त्यांनी कलाकृती साकारल्या. आधुनिक जीवनशैलीतून निर्माण झालेला गोंधळ, मानवी भावभावनांचा वाढता गुंता, आदीम तत्त्वांचा पडत जाणारा विसर; चंगळवादी, भोगवादी संस्कृतीचा वेगाने होणारा प्रसार आणि यातून मानवी नात्यात निर्माण होणारे संघर्ष ते हळुवारपणे कलाकृतीतून उकलून दाखवितात. त्यांच्या अनेक कादंबर्‍या मराठीमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. मराठी वाचकांच्या त्या पुस्तकांवर उड्या पडल्या. आश्चर्याची बाब म्हणजे भैरप्पा हे मराठीचेच लेखक आहेत, असे अनेकांना वाटते. खर्‍या अर्थाने भारतीयत्वाला साद घालणारा लेखक म्हणूनच त्यांची ओळख कायम राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT