मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्राच्या राजकारणात वाढत चाललेली नैतिक अधोगती आणि भोंदूबाबांच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक बनली आहे. भोंदूगिरी, सत्तेचा गैरवापर आणि राजकीय संगनमत यांच्या विळख्यात अडकलेले राज्याचे चित्र धक्कादायक आहे.
महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर पोहोचले आहे. नाशिक येथे उघडकीस आलेले भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण या गलिच्छ प्रकाराचा कळसाध्याय म्हणावे लागेल. राजकीय स्पर्धेत तग धरून राहण्यासाठी मानवी शक्तीच्या पलीकडचे काहीतरी समवेत असावे, असे नेत्यांना वाटत असावे. उमेदवारी मिळवणे, निवडून येणे, मग आमदार होणे, आधी मंत्री, मग मुख्यमंत्री होणे. आघाडी सरकारच्या स्पर्धेत ते पद टिकवणे अशा अनेक समस्यांत नेते अडकले असतात. अशा वेळी अशोक खरातसारखे या अस्वस्थतेला चुचकारतात. त्यातून आर्थिक लाभ करून घेतात. भारताच्या राजकारणाने चंद्रास्वामीसारखे अशोक खरातपेक्षाही बडे तांत्रिक पाहिले. मात्र खरात प्रकरणातील भयावहता अशी की, यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश. या नेत्यांना स्वतःच्या नादी लावत खरात याने महिलांचे केलेले शोषण, राजकीय आणि प्रशासकीय कारभारात केलेला हस्तक्षेप हे यातील आक्षेपाचे मुद्दे. खरातच्या मोबाईलचे जुने रेकॉर्ड हस्तगत झाले. यात कोण कोण कशासाठी त्याच्याकडे जात होते, किती रक्कम खर्च केली जात होती, अशी सर्व माहिती बाहेर येणार आहे. या नेत्यांचा काळा पैसा खरात फिरवे. हवालात टाके. वासना पूर्ण करण्यासाठी महिलांना गुंगीचे औषध देऊन भोगे. याची कुणालाही कल्पना असू नये, हे कसे शक्य आहे? ही घाण आहे. त्याची सफाई करायची वेळ आली आहे. सरकार स्थिर आहे. खरातला अटक करण्याचे आदेश देणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या सफाईचे एक अभियान या निमित्ताने हाती घ्यायला हवे.
महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रूपाली चाकणकर जर या बाबाच्या नादी लागून तो महिलांचे शोषण करीत असतानाही त्याकडे डोळेझाक करत होत्या आणि या बाबाची चौकशी होऊ देऊ नका, अशा प्रकारचा दबाव टाकत होत्या तर ते भयंकर आहे. महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशाताई मिरगे यांनी चाकणकर यांच्यावर केलेली आगपाखड पुरेशी बोलकी आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीपर्यंत लोक खरातकडे जात असतील, त्याच्या पूजा विधींमध्ये सहभागी होत असतील तर ती अत्यंत शरमेची बाब आहे. कल्पना असती तर आम्ही तेथे गेलो नसतो, असे माजी गृहराज्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी दीपक केसरकर म्हणाले आहेत. नागरिकांना चारित्र्याचे दाखले मागणार्या राज्यकर्त्या व्यक्तींना कोण काय करतेय याची माहिती नसेल तर ही मंडळी कुठेतरी डोळे झाकून तरी बसली आहेत किंवा विचार करायची क्षमता त्यांच्यात अजिबात नाहीये. यातले कुठलेही सत्य हे त्रासदायक आहे. तपासातून संपूर्ण तथ्य बाहेर यावे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही पाठीशी न घालता योग्य तो तपास आणि त्यानुसार दोषींना योग्य ती सजा होते की नाही याकडे जातीने लक्ष द्यावे. महाराष्ट्रावरचे हे लांच्छन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने उशिरा का होईना, रूपाली चाकणकर यांना महिला अध्यक्षपदावरून खाली आणले ते बरेच झाले. चाकणकर निर्दोष असतील तर कायदा त्यांना तसे सिद्ध करण्याची मुभा देतो. पण एखाद्या गॉडमॅनला हाताशी धरून पूजा विधीनिमित्त हजारो लाखो-करोडो रुपयांची उलाढाल करणार्या राजकारण्यांवर अंकुश यायलाच हवा. खरात हा मुलीच्या प्रवेशासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेला, त्याचे छायाचित्र समोर आले. छायाचित्र काढा, असा आग्रह धरणे हा सध्याच्या राजकारणाचा धर्म झाला आहे. सोशल मीडियावर आम्ही या नेत्याला भेटलो, असे सांगण्यात सर्व समाजाला धन्यता वाटते आहे. यातून काय मिळते हे ज्याचे त्यालाच माहीत.
प्रादेशिक पक्षात अस्वस्थता
लोकसभेच्या निवडणुकांपाठोपाठ महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका येत असतात. सध्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक असे प्रादेशिक पक्ष स्वाभिमानाची लढाई देत आहेत. ते राष्ट्रीय पक्षांसमोर टिकून राहतीलच नव्हे तर त्यांना हरवतील, असे भाकीत सध्या विश्वासाने केले जाते आहे. देशात प्रादेशिक पक्षांना, तेथील जनतेच्या आशा-आकांक्षांशी नाते ठेवले तर, उत्तम भविष्य असते. महाराष्ट्राला तर प्रादेशिक पक्षांची मोठी परंपरा आहे. मात्र या प्रादेशिक पक्षांच्या राजकारणावरच सध्या महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर अस्वस्थता निर्माण झाली. पक्षाची दोन शकले झाली तेव्हापासूनच ती धुमसत होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांच्या पक्षावरील पकडीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दादांच्या निधनानंतर त्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेईपर्यंतचे सर्व निर्णय रद्द मानावेत, असे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. या पत्राचा अर्थ सुनेत्रा पवार यांचा काही मंडळींवर पूर्ण विश्वास नाही, असा आहे. त्यांचे खासदार पुत्र पार्थ यामागे असावेत अशीही चर्चा आहे. पार्थ हे लोकसभा निवडणुकीत वाईट रीतीने पराभूत झाले होते. पुण्यातील जमीन खरेदीच्या काही प्रकरणामुळेही ते चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत जुन्यांना न दुखावता नवी वाट शोधायचा कसरतीचा भाग त्यांना आणि सुनेत्रा पवार यांना पार पाडावा लागणार आहे. सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी कार्यक्रमात अजित पवारांचा फोटो न लावणे यापासून ज्याप्रकारे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले जाते आहे, त्याचा अर्थच दादांना मानणारा एक गट या दोघांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही असा आहे. अजित पवार गटाचे काही आमदार मधूनच विलीनीकरणावर भाष्य करत असतात. दोन शकले झालेली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या निधनानंतर विकल होण्याची भीती दिसते आहे.
सेनेतही अस्वस्थता
विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला अल्प यश मिळाल्यामुळे निवडून आलेले आमदार आणि खासदार पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतील अशी भाकिते सुरू झाली. भाजपला असे होत असेल तर ते आवडेल हे स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे स्वतःच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करायला हे घडवून आणतील हेही निश्चित आहे. प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर एखाद्या खासदाराने आपण आम्हाला भेटत नाही असे म्हणणे हे धक्कादायक आहे आणि ठाकरे कुटुंबातील नेतृत्वाला आव्हान दिले जाते आहे. या संबंधात छापून आलेल्या बातम्या खर्या असतील तर पक्ष कसा वाचवावा याकडे लक्ष देणे ही ठाकरे पिता-पुत्रांसमोरची मोठी समस्या ठरणार आहे.