संपादकीय

राजकीय संघर्षाची नांदी

Arun Patil

कोल्हापुरात नव्या वर्षात राजकीय संघर्षाची गुढी उभारली गेली आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून नेत्यांमध्ये सुरू झालेला टोकाचा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत चालणार आहे. यामध्ये लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून संघर्षाची धग अधिक जाणवेल.

सध्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची तसेच जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा पारंपरिक संघर्ष आहे. हा संघर्ष नेहमीच धारदार असतो; मग निवडणूक विधानसभेची असो की, अन्य कोणती, हा संघर्ष धारदारच असतो. आतादेखील संघर्षाची धार पाहायला मिळत आहे. कारखान्याच्या सभासदत्वाच्या निकषावरून संघर्ष सुरू आहे. काही काळ पाटील, तर काही काळ महाडिक यांनी या संघर्षात एकमेकांवर मात केली. आता या संघर्षात बाजी कोण मारणार, हे सभासदच निश्चित करणार आहेत.

मतदारराजाचा कौल कोणाला मिळणार? यावर सारे काही अवलंबून आहे. सध्या परस्परांवर मात करण्यासाठी रात्रीचा दिवस करून नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. राजाराम कारखान्याच्या पॅनेल निश्चितीनंतर बाजार समितीच्या रणांगणाला खर्‍या अर्थाने गती येणार आहे. कारण, तेथील तडजोडीच बाजार समितीच्या पॅनेलला अंतिम आकार देणार आहेत. आता राजाराम कारखान्याच्या उमेदवारी अर्ज अवैधतेवरून सुरू झालेल्या संघर्षाचा निकाल लागल्यानंतरच याला गती मिळणार आहे.

बाजार समितीत हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संजय घाटगे, संपतराव पवार-पाटील एकत्र येतील, अशी शक्यता आहे. यामध्ये विनय कोरे, संजय मंडलिक हे काय भूमिका घेणार यावर बरेच राजकारण अवलंबून आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यासोबत विनय कोरे असतील, असे संकेत आहेत. अशी युती आकाराला आली, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येऊन त्यांना आव्हान देणार का? हा खरा प्रश्न आहे. यापाठोपाठ दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), सदाशिवराव मंडलिक, भोगावती, आजरा, इंदिरा महिला, सह्याद्री या साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. 'बिद्री'मध्ये के. पी. पाटील विरुद्ध प्रकाश आबिटकर अशा सरळ सामन्यात विधानसभेच्या राजकारणाची बीजे रोवली आहेत. या संघर्षात के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील हे कोणती भूमिका घेतात. यावर बरेच राजकारण अवलंबून आहे. मध्यंतरी ए. वाय. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. ए. वाय. हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. या भेटीची चर्चा होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ज्येष्ठांमार्फत ए. वाय. पाटील यांची समजूत काढण्यात यश मिळविले.

आता कारखाना आणि विधानसभा लढविण्यावरून मेहण्या-पाहुण्यांत तडजोड होणार का? यावर बिद्रीच्या पॅनेलची रचना अवलंबून आहे. यापाठोपाठ भोगावती कारखान्यात पी. एन. पाटील विरुद्ध सदाशिव चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला जिल्ह्यातील कोणकोणते नेते उघड किंवा छुपा पाठिंबा देणार यावर तेथील गणिते अवलंबून आहेत. कुंभी-कासारी कारखान्यात पी. एन. पाटील यांनी पॅनेल केल्याने चंद्रदीप नरके यांनी जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे.

सदाशिवराव मंडलिक कारखान्याची गतवेळी बिनविरोध निवडणूक झाली होती. यावेळी हाच पॅटर्न कायम राहणार की, कागलच्या राजकीय विद्यापीठातील साखरेचा गोड संघर्ष पाहायला मिळणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. आजरा कारखान्याच्या आजवरच्या निवडणुका चुरशीने झाल्या आहेत. तेथे अशोक चराटी, वसंतराव धुरे, मुकुंद देसाई, सुनील शिंत्रे, अंजना रेडेकर, जयवंत शिंपी यांच्यात कोणकोणाशी युती करणार, यावर पॅनेलची रचना अवलंबून आहे.

चंद्रशेखर माताडे 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT