Beaver animals | बीव्हर प्राण्याच्या पाणथळ जागा शोषतात मोठ्या प्रमाणातील कार्बन 
संपादकीय

Beaver animals | बीव्हर प्राण्याच्या पाणथळ जागा शोषतात मोठ्या प्रमाणातील कार्बन

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ‘निसर्गाचा अभियंता’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘बीव्हर’ (इशर्रींशी) या प्राण्याने बांधलेल्या पाणथळ जागा आता हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. एका नवीन संशोधनानुसार, बीव्हर्समुळे तयार होणारी परिसंस्था एका वर्षात उत्सर्जित होणार्‍या कार्बनपेक्षा जास्त कार्बन शोषून घेते, ज्यामुळे ती एक ‘नेट कार्बन सिंक’ बनली आहे.

‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनासाठी स्वित्झर्लंडमधील एका प्रवाहाचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांना असे आढळले की : बीव्हर्सनी तयार केलेली पाणथळ जागा दरवर्षी 98 ते 133 मेट्रिक टन कार्बन शोषून घेते. हे प्रमाण सुमारे 832 ते 1,129 बॅरल तेलाच्या वापरामुळे होणार्‍या उत्सर्जनाइतके आहे. स्वित्झर्लंडमधील संभाव्य बीव्हर वस्त्यांचा विचार केल्यास, ते देशाच्या एकूण वार्षिक कार्बन उत्सर्जनाच्या 1.2 टक्के ते 1.8 टक्के वाटा भरून काढू शकतात. 2010 मध्ये या भागात बीव्हर्स येण्यापूर्वी हा परिसर केवळ एक पूरग्रस्त जंगल होते.

बीव्हर्सनी झाडे तोडून ‘धरणे’ बांधल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचला आणि लहान वनस्पतींची वाढ झाली. शास्त्रज्ञांनी पाणी, माती, वनस्पती आणि मृत लाकडांमधील कार्बनचे मोजमाप करून हा निष्कर्ष काढला आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठातील मुख्य संशोधक लुकास हॉलबर्ग यांच्या मते, ‘बीव्हर्स एकटे हवामान बदलाची समस्या सोडवू शकत नाहीत. परंतु, हे ‘नैसर्गिक अभियंते’ कोणत्याही महागड्या पायाभूत सुविधांशिवाय नदीकाठच्या परिसंस्थेत अनेक दशकांसाठी कार्बन साठवण्यास मदत करू शकतात.’ युरोपमध्ये एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राण्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचे मोठे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नैसर्गिक प्रक्रियेशी जुळवून घेणे हे केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर आर्थिकद़ृष्ट्याही फायदेशीर असल्याचे या अभ्यासातून दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT