Balochistan | बलुचिस्तानचा स्वातंत्र्यसूर (Pudhari File Photo)
संपादकीय

Balochistan | बलुचिस्तानचा स्वातंत्र्यसूर

पुढारी वृत्तसेवा

भारताकडून १९७१ च्या युद्धात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने धोरण म्हणून स्वीकारलेले सूत्र होते, ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्‌‍‌’. याचा अर्थ दहशतवादाचा वापर करून भारताला रक्तबंबाळ करून त्याचे तुकडे करणे. पाकच्या आजवरच्या राज्यकर्त्याने त्यानुसारच भारतविरोधी धोरणे राबवली; पण भारत अखंड राहिला आणि भिकेकंगाल झालेला पाकिस्तान आज स्वतःच नव्या फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. तेथील बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होत स्वतःला ‌'स्वतंत्र देश‌' म्हणून घोषित केले आहे. सोशल मीडियावर ‌'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान‌' या नावाने प्रसिद्ध झालेल्या पत्रात बलुचिस्तानातील स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी या क्षेत्राच्या तब्बल ८५ टक्के भागावर पूर्ण ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या आणि लष्कराच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या कथित व्हायरल पत्रात बलुचिस्तानने स्वतःचा नवा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, नवे चलन आणि प्रशासकीय व्यवस्था लागू केल्याचे म्हटले असून या भागातील सर्व गॅस, कोळसा आदी खनिजांवरही आता बलूच सरकारचे नियंत्रण असेल, असा दावा केला आहे.

पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमधील अनेक बलूच नागरिकांनी राजीनामा देत बलुचिस्तानला पाठिंबा दिला आहे. बलूच सैन्याने सोन्या-तांब्याच्या खाणी, १५० हून अधिक नैसर्गिक वायू क्षेत्रे आणि १२०० पेक्षा अधिक कोळसा खाणी ताब्यात घेतल्याचा दावा आहे. सुमारे पाच लाख सैन्य तयार असून वर्षअखेरपर्यंत पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानमधून हाकलून लावू, असेही त्यात म्हटले आहे. पंजाब, खैबर पख्तुनख्वाह आणि सिंध या अन्य तीन प्रांतांपेक्षा बलुचिस्तान क्षेत्रफळाने मोठा आहे. पाकिस्तानचा जवळपास ४४ टक्के भूभाग या प्रांताने व्यापला असून, तिथली लोकसंख्या सुमारे दीड कोटी आहे. पाकिस्तानी नौसेनेचे तीन तळ बलुचिस्तानात आहेत. या प्रांतातील चगाईमध्ये अणुचाचणी करूनच पाकिस्तान आण्विक शक्ती बनला. पाकिस्तानची २० टक्के नैसर्गिक संसाधने याच प्रांतात आहेत. बलूच हा पाकिस्तानातील वांशिक अल्पसंख्याक गट आहे. अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये या बलूच लोकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या सीमारेषा इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेल्या आहेत. हा संपूर्ण भाग नैसर्गिक साधनसंपत्ती, नैसर्गिक वायूंचे साठे असलेला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासात खूप मोठा असमतोल आहे. पंजाबचा विकास झाला आहे, तर बलुचिस्तान विकासापासून कोसो दूर आहे. बलुचिस्तानातील साधनसंपत्तीचे वारेमाप उत्खनन करून, त्याची लूट करून पंजाबचा विकास केल्यामुळे अनेक वर्षांपासून बलूच लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे; मात्र पाकिस्तान लष्करी वर्चस्वाच्या टाचेखाली या बलुची लोकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आला आहे.

२००५ मध्ये मोठा उठाव अत्यंत क्रूरपणाने आणि निष्ठूरपणे चिरडताना पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानचा नेता नवाब अकबर बुकटी याची हत्या केली. त्यानंतर बलुचिस्तानातील मुस्लीम नेते बाहेर पळाले. हे नेते इराण, अफगाणिस्तान किंवा इंग्लंडमध्ये राहून नेतृत्व करताहेत. बलुचींना स्वतंत्र बलुचिस्तान हवा आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए), बलुचिस्तान रिपब्लिकन, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट अशा सशस्त्र संघटना येथे कार्यरत आहेत. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या योजनेअंतर्गत जिनपिंग यांना चीनच्या पश्चिमेकडील शिन शियांग या प्रांताला बलुचिस्तानातील ग्वादार बंदर जोडायचे आहे. याद्वारे चीनला पश्चिम आशिया, आखाती प्रदेश तसेच मध्य आशियात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळेच चीनने बलुचिस्तानात आर्थिक परिक्षेत्रांंतर्गत साधनसंपत्तीचा विकास करायला सुरुवात केली आहे. बीएलएचा या विकासाला विरोध आहे. यामुळे केवळ पाकिस्तानचा फायदा होईल. भागात रस्ते, रेल्वे मार्ग झाल्यानंतर इतर प्रांतांतील लोक येतील आणि स्थानिकांचा रोजगार कमी होईल, अशी बलुची लोकांची भीती आहे. २०१७ मध्ये बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला झाला होता. त्यावेळीही बीएलएने विकासकामांना विरोध असल्याचा इशारा दिला होता. त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी जवळपास २० हजार चिनी इंजिनिअर बलुचिस्तान प्रांतामध्ये पाठवले आहेत. त्यांना पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण आहे.

पाकिस्तानी राज्यकर्त्यांची दबावशाही कोणत्याही स्थितीत मान्य करायची नाही, ही बलुची नेत्यांची भूमिका राहिली आहे. बलुचिस्तानात हजारो तरुण, विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बेपत्ता केल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेहेर बलूच या विषयावर सातत्याने माहिती समोर आणतात आणि या पीडित कुटुंबांना संघटित करतात. बलूच समाजात महिला सहसा पडद्यामागे असायच्या; परंतु मेहेर यांच्यामुळे बलुचिस्तानच्या राजकीय संघर्षात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्राच्या घोषणेचे पत्र कुणी व्हायरल केले, याचे गूढ उलगडले नाही. बलुचींच्या आंदोलनाला भारताची फूस असल्याचे रडगाणे पाकिस्तान पूर्वीपासून गात आला आहे. आपल्या नाकर्तेपणाचे खापर भारतावर फोडण्यात पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या पिढ्या सरल्या. त्यामुळे त्यात नावीन्य नाही. उलट बलुचिस्तानच्या आंदोलनाला शह देण्यासाठी आणि या मुद्द्यावरून देशातील नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान भारताविरुद्ध आगळिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानला त्यांच्या कूकर्मांची शिक्षा मिळणार, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आज ना उद्या बलुचिस्तान, सिंध प्रांत, पाकव्याप्त काश्मीर हे सर्व भाग फुटून पाकिस्तानची शकले होणार आहेत. त्यादृष्टीने हा देश आज ज्वालामुखीच्या टोकावर आहे. बीएलएने गेल्या वर्षी पाकिस्तानी लष्करावर केलेल्या ५२१ हल्ल्यांंत १०६० सुरक्षा जवानांना मारल्याचा दावा केला आहे. बलूच बंडखोरांना आता इस्रायली यंत्रणांकडून पैसा, तंत्रज्ञान आणि आधुनिक दळणवळणाची साधने मिळत असल्याची चर्चा आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्या तळांसाठी आणि हालचालींसाठी केला जात आहे. तथापि, कोणत्याही देशाला स्वतंत्र अस्तित्व मिळण्यासाठी अंतर्गत उठाव पुरेसा ठरत नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता महत्त्वाची असते. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सार्वभौमत्वाची व्याप्ती ही राजनैतिक संबंधांवर आणि जागतिक महासत्तांच्या भूमिकेवर अवलंबून असते. सध्याच्या घडीला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रबळ जागतिक शक्तीने अधिकृत पाठिंबा दिलेला नाही; पण येणाऱ्या काळात जागतिक समुदायाला याबाबत भूमिका घेणे भाग पडेल, हे निश्चित!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT