Balochistan conflict: बलुचिस्तानातील बंडाळी  Pudhari
संपादकीय

Balochistan conflict: बलुचिस्तानातील बंडाळी

गेल्या सत्तर वर्षांपासून अधिक काळ चिघळलेला बलुचिस्तानमधील संघर्ष आता फारच पेटलेला आहे

पुढारी वृत्तसेवा

गेल्या सत्तर वर्षांपासून अधिक काळ चिघळलेला बलुचिस्तानमधील संघर्ष आता फारच पेटलेला आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील एक प्रांत असून, स्वातंत्र्याच्या अभिलाषेपोटी तेथील असंख्य लोकांनी शस्त्रे हातात घेतली. पाकिस्तानी सैन्यदल आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांच्यात तुंबळ चकमकी सुरू आहेत. बीएलएने ‌‘ऑपरेशन हेरॉ‌’च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान दोन शहरांमध्ये एकाच वेळी तुफानी हल्ले केले. या लढाईत पाकिस्तानी सैन्यदल, पोलिस आणि फ्रंटियर कोअरच्या दोनशेहून अधिक सैनिकांना मारल्याचा व 17 जणांना ताब्यात घेतल्याचा दावा बीएलएने केला आहे.

स्थानिक बलूच नागरिकांनी शत्रूपासून दूर राहावे आणि परिसरात सक्रिय असलेल्या आपल्या सैनिकांना मदत करावी, असे आवाहन बीएलएने केले आहे. उलट बीएलएसोबत सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 70 जणांना कंठस्नान घातल्याचा दावा पाकिस्तानी प्रशासनाने केला आहे, तर खारन, मस्तुंग, दलबंदीन, तुमप आणि पसनी येथील टार्गेट पूर्ण करून आपले सैनिक माघारी परतल्याचा दावा बीएलएने केला. विशेष म्हणजे, बीएलएने पहिल्यांदाच या हल्ल्यात महिला फिदायीन मैदानात उतरवल्या. बलूच महिलांशी लढणे किती कठीण आहे, हे तुहाला समजेल, असे आव्हानदेखील त्या करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. बीएलएवर केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर बिटन आणि अमेरिकेतही बंदी असून अमेरिकेने बीएलएला ‌‘जागतिक दहशतवादी संघटना‌’ म्हणून घोषित केले आहे.

बीएलएच नव्हे, तर बलुचिस्तानमधील अन्य संघटनाही पाकिस्तानविरोधातील आक्रमक पवित्रा सोडायला तयार नाहीत. स्वातंत्र्याच्या मागणीसाठी हे गट रेल्वे मार्ग, लष्करी तळ, सुरक्षादले यांना सातत्याने लक्ष्य करत आले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ग्वादर बंदर, वेगवेगळे महामार्ग व ऊर्जा केंद्रे यांच्यावर बॉम्बफोक केली जात आहे. बलुचिस्तानमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असली तरीदेखील आपले केवळ शोषण केले जात आहे, अशी तेथील स्थानिकांची भावना असल्याने केवळ पाकिस्तानच्या सरकारी आस्थापनांवरच नव्हे, तर चीनची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांवरही हल्ले केले जात आहेत. गेल्या वर्षी तिथे क्वेटा येथून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेवर हल्ला करत पूर्ण रेल्वे बलुची सैनिकांनी पळवून नेली. एकूण पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे सामर्थ्यच बलुची क्षमतेपुढे कमी पडत आहे, हे दिसते.

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या बलुचींना ताबडतोब सोडून द्या, अशी मागणी होती. त्यापूर्वीदेखील बलूच सैनिकांनी रॉकेट आणि रिमोट कंट्रोलने बॉम्ब फेकून रेल्वे रूळ उद्ध्वस्त केले होते. खरे तर, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मार्च 1948 पर्यंत बलुचिस्तान स्वतंत्रच राहिला होता. 14 ऑगस्ट 1947 ते मार्च 1948 या कालावधीपर्यंत ‌‘पाकिस्तान‌’ या नव्या राष्ट्राशी त्याचा मैत्री करार होता. पाकिस्तानच्या स्थापनेवेळी या प्रांतातील प्रमुख नेता मीर अहमद यार खान हे बलुचिस्तानचे प्रमुख होते. त्यांना बलुचिस्तान स्वतंत्र देश म्हणूनच हवा होता. 11 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणादेखील केली आणि पाकितानमध्ये सामील होण्यास नकार दिला; परंतु पाक सैन्याकडून दबाव आल्यामुळे त्यांनी सामिलीकरणाच्या करारावर सही केली, तरीदेखील या प्रांतातील स्वातंत्र्याची आकांक्षा कायम राहिली. गेल्या काही दशकांत तर असंख्य राष्ट्रवादी बलूच आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा दलांकडून हत्या झाली.

अलीकडील काळात बलूच सैनिकांनी पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंत्यांना बॉम्बफेक करून ठार मारले आहे. या प्रकल्पांचा स्थानिक बलूच नागरिकांना कोणताही फायदा नाही, अशी सार्वत्रिक भावना आहे. देशातील शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अत्यंत दुबळे आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी बलुचिस्तानमधील ग्वादर जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात 14 सैनिक ठार झाले. त्यापूर्वी खैबर पख्तुनख्वाँमधील डेरा इस्माईल खानमध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करत बाँबस्फोट करण्यात आले. बलुचिस्तान प्रांताच्या सीमा इराण आणि अफगाणिस्तानशी भिडलेल्या आहेत. सध्याच्या काळात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही फारसे सख्य नाही. उलट त्यांच्यात सीमेवर चकमकी घडत आहेत. त्यामुळेदेखील बलुचिस्तान हे पाकिस्तानसाठी अवघड जागेचे दुखणे आहे.

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे; मात्र पाकिस्तानमधील चार प्रांतांपैकी बलुचिस्तानची लोकसंख्या सर्वात कमी आहे. तेल व खनिजसमृद्ध असूनदेखील इतर प्रांतांच्या मानाने हा भाग मागास राहिला. पाकिस्तानवर तेथील पंजाब प्रांताचे वर्चस्व राहिले. बलूच नागरिकांच्या समस्या सोडवणे, हा खरा मार्ग आहे; परंतु गेली 75 वर्षे बलुची लोकांचा लढा निर्घृणपणे चिरडण्याचेच काम पाकिस्तानने केले. स्थानिक नागरिकांच्या सांस्कृतिक अस्मिता, त्यांच्या भावना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तेथे प्रचंड बेरोजगारी असून, सरकार त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. येथे विकास प्रक्रिया ठप्प असून, या प्रांताची केवळ पिळवणूक करून पाक सरकार तेथील जनतेला वाऱ्यावर सोडत आहे. बलुचिस्तान-पाकिस्तान संघर्ष नेहमीच धगधगत राहिलेला आहे, यामागे ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पाकिस्तानात नेहमीच अंतर्गत अस्थिर असतो. या संघर्षाची तीवता कमी-जास्त होईल; पण तो दीर्घकाळ चालत राहील, अशी चिन्हे आहेत.

सुरक्षा कारवाया, संसाधनांवरील नियंत्रण आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव यामुळे बलुचिस्तानमधील असंतोष टिकून राहील, किंबहुना आणखी उफाळण्याची शक्यता अधिक. या संघर्षाचा पाकिस्तानच्या आर्थिक प्रकल्पांवर (विशेषतः पायाभूत सुविधा) दबाव राहील, ज्याचे अप्रत्यक्ष परिणाम प्रादेशिक भूराजकारणावर दिसून येतील. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्वतःला ‌‘फिल्ड मार्शल‌’ म्हणवून घेतले आहे आणि तेथील शाहबाझ शरीफ सरकार त्यांच्या तालावर नाचत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमने उधळून अमेरिकेची लष्करी व आर्थिक मदत मिळवायची, त्यामधून भष्टाचार करायचा आणि केवळ बलुचिस्तानच नव्हे, तर पीओके, सिंध येथेही दडपशाही करायची, हे पाकिस्तानचे धोरण आहे. केवळ रणगाड्याच्या बळावर दडपशाही करणाऱ्या पाक सरकारसमोर आता हे आव्हान अधिक जटिल तर होत आहेच, शिवाय त्याने देश अस्थैर्याच्या फेऱ्यात ओढला जातो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT